Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यखुदा करे के कयामत हो...

खुदा करे के कयामत हो…

श्रीनिवास बेलसरे

राल्फ वॅल्डो इमर्सन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे “It’s not the destination, it’s the journey.” त्यांना म्हणायचे आहे, ‘ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यात जो आनंद आहे, तो तिथे पोहोचण्यातसुद्धा नाही!’ हे वाक्य कितीही साहित्यिक असले तरी प्रेमिकांना ते पटणे जरा अवघडच! आपल्या प्रिय व्यक्तीची, विशेषत: ती दूर आणि अप्राप्य असताना, वाट पाहणे किती जीवघेणे असते, ते प्रेमात पडलेल्यांनाच माहीत! भेटीची शक्यता नसतानाही प्रेमात वाट पहिली जाते आणि एखादी क्षणिक भेट झालीच, तर पुन्हा वाट पाहत झुरणे जास्तच दु:खद बनते. असेच एक कैफी आझमी यांनी लिहिलेले अस्वस्थ प्रतीक्षेचे गाणे गायले होते लतादीदींनी. संगीत होते हेमंतकुमारांचे आणि ‘सर्वोकृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक’ मिळवणारा तो सिनेमा होता ऋषिदांनी दिग्दर्शित केलेला १९६६चा ‘अनुपमा’!

धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेकरार, कोई आता है,
यूँ तड़प के ना तड़पा मुझे बारबार, कोई आता है…
ही आतुरतेने केलेली प्रतीक्षा मोठी मजेदार असायची. प्रिय व्यक्ती येण्याआधीच वाट पाहणाऱ्याला तिचे भास होत. ‘अनुपमा’मध्ये सुरेखा पंडित पियानोवर हे गाणे गातेय. तिला आधीच त्याने वापरलेल्या अत्तराचा वास येऊ लागलाय. त्याच्या पावलांची चाहूल ऐकू येतेय. ती म्हणते ‘आता मी माझ्या प्रियासाठी सोळा शृंगार करूनच बसते कशी!’

उसके दामन की खुशबू हवाओं में है
उस के क़दमों की आहट फ़ज़ाओं में है
मुझको करने दे, करने दे सोलह सिंगार
कोई आता हैं…
तिला तो जवळ आल्याची खात्रीच झालीय. कानात तर लग्नाच्या मंजुळ सनईचे सूरही ऐकू येऊ लागले आहेत.

मुझको छूने लगी उसकी परछाईयाँ,
दिल के नज़दीक बजती हैं शहनाईयाँ,
मेरे सपनों के आँगन में गाता है प्यार
कोई आता हैं…
पण असे सुखद मिलन काही सर्वांच्या नशिबात नसते. अनेकदा वाट पाहण्यातच जीवन संपायला येते. यावर फैझ अहमद फैझ यांचा एक सुंदर शेर आहे –
“मरने के बाद भी मेरी आंखें खुली रहीं, आदत जो पड़ गई थी तेरे इंतजारकी!”

सिनेमा होता १९८५चा बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘तवायफ’. गीतकार हसन कमाल आणि संगीत रवीचे! सिनेमाला दोन फिल्मफेयर पारितोषिकेही मिळाली होती. सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचे डॉ. राही मासूम रझा यांना, तर सर्वोत्तम कथेचे आलीम मसरूर यांना! ऋषी कपूरचे प्रेम पूनम धिल्लनवर आहे, मात्र एका प्रसंगामुळे तो कोठीवर येतो आणि तवायफ असलेल्या रती अग्निहोत्रीच्या प्रेमात पडतो. जेव्हा रतीने प्राण कंठाशी येऊन केलेली त्याची प्रतीक्षा व्यर्थ जाते, तेव्हा तिच्या मनाची अवस्था सांगणारे, आशाताईंनी गायलेले हे अस्वस्थ गाणे खरे तर प्रियकराविषयी मूक तक्रारच आहे.

बहुत देर से दर पे आँखे लगी थी,
हुज़ूर आते आते बहुत देर कर दी!’
मसीहा मेरे तूने बीमारे गमकी,
दवा लाते लाते बहुत देर कर दी…

या एकतर्फी वाटणाऱ्या प्रेमात तिला काहीच मिळाले नाही. प्रेमाचे दोन शब्द किंवा प्रेमाच्या पूर्ततेच्या जाणिवेचा सुगंध! निखळ प्रेमात ती आसुसून त्याच्या प्रतिसादाची वाट पाहते आहे. तो तर प्रेमाची साधी कबुली द्यायलाही उशीर करतोय.

मुहब्बतके दो बोल, सुनने न पाए
वफाओके दो फूल, चुनने न पाये
तुझे भी हमारी तमन्ना थी ज़ालिम,
बताते बताते बहुत देर कर दी…

ती कोठीवरील गुंडाच्या तावडीत कायमची अडकली आहे, खरेच खूप उशीर झालाय, तिची आशा सरत चाललीय –
कोई पल में दम तोड़ देंगी मुरादें,
बिखर जाएँगी मेरे ख्वाबों की यादें,
सदा सुनतेसुनते खबर लेते लेते,
पता पाते पाते बहुत देर कर दी.

अनेकदा असे होते. एक झुरत राहतो आणि दुसरा इतका उशीर करतो की, सगळे संपून जाते. बी. आर. चोप्रांनी मात्र काहीसे वेगळे कथानक असलेल्या या सिनेमाचा शेवट सुखात्म केला होता.

जुन्याकाळच्या सिनेमातील मनस्वी, भाबडे प्रेम आणि त्यातून पहाव्या लागलेल्या प्रतीक्षेचे चित्रण प्रेक्षकांना अगदी भावुक करून टाकायचे. असेच एक बेधुंद गाणे एम. सादिक यांनी दिग्दर्शित केलेल्या १९६७च्या ‘बहुबेगम’मध्ये होते! स्वत:च एक मनस्वी प्रेमिक असलेल्या साहीरचे शब्द जिवंत केले होते आशाताईंनी.
हम इंतज़ार करेंगे तेरा क़यामत तक
ख़ुदा करे के क़यामत हो, और तू आए…
‘मी प्रलय होईपर्यंत तुझ्यासाठी थांबेन, पण देवाने आता जीवनाचा अंत करावाच आणि म्हणून तरी तू यावेस,’ असे प्रिया म्हणतेय. ती प्रेमालाच पूजा समजतेय. ती म्हणते, ‘मी तुझी पूजा करते. आता तरी माझे प्रेम तुला मान्य होवो आणि प्रसन्न होऊन तू मला दर्शन द्यावेस.’ किती वेडे हे प्रेम! किती मनस्वी प्रेमभावना!
क़ुबूल-ए-दिल की इबादत हो और तू आए
ख़ुदा करे कि कयामत हो…

समाजाची मानसिकता घडविण्यात कथा, कविता, नाट्य या कलाप्रकारांचा फार मोठा वाटा असतो. तो अमूर्त असला, त्याचा प्रभाव मोजता येत नसला, तरी तो असतो हे नक्की. त्यातूनच माणसाच्या परस्परसंबंधाचे आकृतिबंध तयार होत असतात. हे लक्षात घेतले, तर विचार येतो कल्पांतापर्यंत थांबायची तयारी असलेले ते पूर्वीचे प्रेम कुठे आणि सहा-सहा महिन्यांत संसार मोडणारे हल्लीचे हंगामी प्रेम कुठे! गेल्या काही वर्षांत आपल्याही समाजाच्या भावविश्वात केवढा बदल झालाय! आता खुदालाच न मानणारे त्याची कयामत कशाला मनातील आणि तोवर कशाला कुणाची वाट पाहतील? आपणच आपले अशा गाण्यातून त्या नॉस्टॅल्जिक जमान्यात जावे आणि मन रमवावे हे बरे!

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -