Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकशेडी बोगदा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर; रस्ते व पूल रखडले

कशेडी बोगदा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर; रस्ते व पूल रखडले

खेड (प्रतिनिधी) : कोकणवासीयांनी पाहिलेले मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे स्वप्न पूर्ण होण्यास आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार याचे उत्तर मिळणे बाकी असले तरी खेड तालुक्यातील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही बोगद्यांची खोदाई आरपार पूर्ण झाली आहे. बोगदा पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मुंबई ते गोवा महामार्गावरील चौपदरी रस्ते व पूल उभारणीची प्रतीक्षा असताना कशेडी बोगद्यांची खोदाई पूर्ण झाल्याची ‘शुभवार्ता’ कोकणवासीयांना नक्कीच सुखावणारी आहे.

महामार्गावरील चौपदरीकरण बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच टोलनाके उभे राहिले आहेत. महामार्गावर वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरण कामाच्या दहा टप्प्यांतील अवघे तीन टप्पे पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, सात टप्पे अपूर्णावस्थेत आहेत. पूर्ण होत असलेल्या टप्प्यात खेड तालुक्यातील कशेडी ते परशुरामचा समावेश आहे.

कोकण रेल्वेनंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे स्वप्न कोकणवासीयांनी पाहिले होते. या महामार्गासाठी निधीची घोषणा झाल्यानंतर दोन वर्षांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र चार वर्षे होत आली तरी अर्धा महामार्गही पूर्ण झाला नाही. उलट त्यानंतर जाहीर झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईतून कोकणात अगदी गोव्यात जाताना वाहनचालकांना अवघड घाटांसह खाचखळग्यांतून अनेक वर्षे प्रवास करावा लागत होता. या मार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी ६ हजार १०० कोटी रुपये कंत्राटदारांसाठी तरतूद केली गेली. या महामार्गावरील उड्डाण पूल, नद्यांवरील १४ पूल, कशेडी बोगदा यासाठीही वेगळी तरतूद करण्यात आली. सन २०१७ ते २०१८ या कालावधीत प्रत्यक्ष या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली. त्यावेळी डिसेंबर २०१९ मध्ये या महामार्गाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु ते झाले नाही. त्यानंतर कोरोनामुळे सर्वच कामे ठप्प झाली होती. त्याचाही परिणाम या महामार्गाच्या चौपदरीकरणावर झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -