Thursday, May 2, 2024
Homeमहत्वाची बातमीKartiki Ekadashi : परंपरेत खंड न पाडण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन

Kartiki Ekadashi : परंपरेत खंड न पाडण्याचं मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन

कार्तिकी एकादशीच्या शासकीय पूजेवरुन झाला होता वाद…

पंढरपूर : कार्तिकीच्या (Kartiki Ekadashi) शासकीय महापूजेवरून पंढरपुरातील (Pandharpur) मराठा समाजामध्ये (Maratha Samaj) दुफळी निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरु आहे. याच कारणावरून काल दोन गट आमनेसामने आले. एका गटाने विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी केली तर दुसऱ्या गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला. या मुद्द्यावरुन दोन गटांमध्ये हमरीतुमरी देखील झाली. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला एक आवाहन केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आषाढी आणि कार्तिकी एकादशी ही महाराष्ट्राची समृध्द परंपरा आहे. विठ्ठलाच्या ओढीने लाखो भाविक आषाढीप्रमाणे कार्तिकी एकादशीलाही दर्शनासाठी पंढरपूरला येत असतात. कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

एकादशीच्या धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणे योग्य नाही. त्यामुळे या परंपरेमध्ये खंड पाडण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न करू नये. एकादशीला महाराष्ट्रात विठ्ठलनामाचाच गजर व्हायला हवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पूजेचा मान मिळण्याची शक्यता

दरवर्षी कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री व मानाचा वारकरी यांच्या हस्ते होत असते. यंदा दोन उपमुख्यमंत्री असल्याने कोणाच्या हस्ते पूजा होणार हा पेच निर्माण झाला होता. मात्र, काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या एकत्रित बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आज कोळी समाजाची बैठक आहे. त्यात कोळी समाजाचा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कार्तिकीच्या शासकीय पूजेचा मान मिळेल असंही सांगितलं जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -