Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीतळीये गावाची कर्मकथा

तळीये गावाची कर्मकथा

स्वाती पाटणकर

अलवार भिजलेली राखाडी रंगाची सडक, सोबतीला पोपटी गवताचे भारे घेऊन धावत होती. मधेच खळखळ वाहणारी नदी आकाशाचे प्रतिबिंब घेऊन धावत होती. सोबतीला वारा होताच. मन प्रफुल्लीत करणारे सगळे घटक एकत्रित असूनही माझे मन मात्र उदास होते. सुंदर निसर्ग माझी अस्वस्थता थांबवू शकत नव्हता. घाटाच्या त्या रस्त्यावरून आम्ही इच्छितस्थळी पोहोचलो. गाडीतून उतरायला मन राजी नव्हते. पण काही पावले चालले. पुढे माझे पाऊल उचलेना. कशी टाकू मी पाऊल? माझ्या पायाखाली कुणाचे कलेवर तर नसेल? या जाणिवेने माझा जीव गोळा झाला होता. आधारासाठी भवती बघितले. कमलेश आणि श्रीपाद चित्रीकरण करत होते. मी कमलेशला हाक मारली. भरल्या डोळ्यांनी मी त्याला प्रश्न विचारला, “माझ्या पायाखाली कुणी आई, बाप किंवा लेकरू तर नसेल ना?”

सगळेच सुन्न होतो. निसर्ग इतका निष्ठूर होऊ शकतो? काय उपयोग त्याच्या सौंदर्याचा? रक्षण करणारा तो उंच डोंगर भक्षक बनला होता. जननी मातेच्या मंदिराचे पवित्र स्थान शिरावर मिरवणारा तो डोंगर २२ जुलैच्या संध्याकाळी भक्षक बनला आणि ८०-८५ जणांना घेऊन गेला. त्याचाच आवाज, झपाटा इतका मोठा होता की, जाणाऱ्यांच्या किंकाळ्याही कुणालाही ऐकू आल्या नाहीत. मान्य आहे की, जन्माला आलेला देह मातीत मिसळतो, पण तो अशाप्रकारे? तळीये गावाची ही कर्मकथा.

‘रयतेचा दरबार’साठी आम्ही तळीयेमधल्या पुनर्वसनाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तिथे गेलो होतो. २२ जुलैचा घटनाक्रम ग्रामस्थांच्या तोंडून ऐकताना ढासळून गेलो होतो.

रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील तळीये या गावात २२ जुलै रोजी प्रचंड पावासामुळे डोंगराची दरड कोसळून या गावच्या दोन वाड्या नाहीशा झाल्या. यामध्ये ८०हून अधिक जणांचे प्राण गेले. ६५ अधिक घरे गाडली गेली. जननी मातेचा डोंगर. या डोंगराच्या पायथ्याशी भातशेती होती आणि मग त्याला लागून वस्ती होती. जननीमातेच्या डोंगराच्या शेजारी एक डोंगर आहे. दुपारी ३ वाजता या डोंगराची दरड कोसळली. ते बघायला त्या वाडीतील बरेचजण गेले होते. तिथे राहणाऱ्या २०-२२ माणसांना या साऱ्यांनी आपल्या घरी आणले… आणि मग ५ वाजता जननीमातेचा डोंगर घसरला. त्यावेळी राक्षसी पाऊस पडत होता. प्रचंड धुके होते. या डोंगरातून प्रचंड पाणी वाहायला लागले. त्या पाण्याबरोबर डोंगरही वाहायला लागला. मधेच दगडांनी तो प्रवाह अडला आणि मातीमिश्रत पाणी प्रचंड उंचावर उडाले. त्याचा दणका झाडांना आणि घरांना बसला. काही समजायच्या आतच ही दलदल प्रचंड वेगाने काही किलोमीटरपर्यंत पसरली. त्यात अनेक घरे आतल्या माणसांसह दबली गेली.

तळीये गावाचा स्मशानाकडे जाणारा रस्ता आम्ही बघितला. ग्रामस्थांनी सांगितले की, ही मंडळी स्मशानाकडे गेली असती तर, ती वाचली असती. तिथे नुकसान कमी झाले होते. अर्थात, या ‘जर-तर’ला काहीच अर्थ नसतो. कारण जननीमातेचा डोंगर तुमचा घास घेतोय आणि स्मशानाचा रस्ता तुम्हाला वाचवू शकतोय, हे खरेच अकल्पित आहे.

या जलसंहारातून वाचलेल्यांना आम्ही भेटलो. ‘‘माझा तीन वर्षांचा मुलगा हट्ट करत होता. त्याला आजी-आजोबांकडे पाठवलं. ते लांब राहतात आणि मी काही कारणानं गावात आलो. समोरून मातीचा प्रवाह आला. मी काही फूट त्यात कोलमडत गेलो. माझी मान फक्त वर होती. मी मदतीसाठी बोलावत होतो. एका मित्रानं मला महत्प्रयत्नानं बाहेर काढलं. मी वाचलो. पण माझे खूप नातेवाईक, साथीदार नाहीसे झाले, माझ्या डोळ्यांदेखत…’’ बोलता बोलता हमसून हमसून तो रडायला लागला. म्हणाला, ‘‘खूप वाईट स्वप्नं पडतात हो! झोपायचीच भीती वाटते.’’ या तरुणाचे पाय जायबंदी झाले आहेत. ऑपरेशनची गरज आहे. त्यासाठी सरकारी मदत मिळालीही आहे. पण मनातील भीती त्याला काहीच करू देत नाही. तो तसाच निपचित आहे, एकाच जागेवर… आता याचे सांत्वन काय करणार? पण मी त्याला म्हटले, ‘‘मारणाऱ्यापेक्षा जगवणारा भला असतो. तुम्हाला जीवदान मिळालंय. उभारी धरा. लेकरांकडे बघा. कुटुंबाकडे बघा. मनाला समजावा. उठून उभे राहा.’’

आठ वर्षांची एक छोटुली आम्हाला भेटायला आली. मी त्या दिवशी हे सगळं बघितले असं सांगत होती. ‘‘डोंगर घसरला म्हणून माझी दीदी डोंगराकडे बघायला गेले. मी, माझी आई आणि ५ वर्षांचा छोटा भाऊही तिच्यामागे गेलो. त्यावेळी माती आणि पाणी जोरात वाहत आलं. आम्ही तिथून पळून गेलो. पण माझ्या मैत्रिणी, त्यांचे आई-बाबा सगळे गेले.’’

तो पाच वर्षांचा चुणचुणीत मुलगाही बोलत होता. ‘‘काकू, माझे सगळे मित्र त्या पाण्यात गेले. आता कुणीच खेळायला उरलं नाही. आता पाऊस पडायला लागला की, खूप भीती वाटते. झोपेत खूप वाईट स्वप्ने पडतात. आम्ही ओरडतच उठतो.’’ इतक्या लहान वयात हा भयप्रद अनुभव घेऊन ही दोघे बहीण-भावंडे परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. मी भीतभीतच विचारले, ‘‘तुझी दीदी कुठे आहे?’’

‘‘गावाला गेली आहे.’’
‘‘आणि मम्मी-पप्पा?’’
‘‘ते कामाला गेले आहेत.’’

त्याचे संपूर्ण कुटुंब आहे, हे ऐकून खूप दिलासा वाटला. तेवढ्यात त्या बहीण-भावाला शोधत त्यांची आजी आली. ‘‘बाई, ही मुलं नजरेआड झाली की खूप भीती वाटते गं! ती जननी आमच्यावर कोपली. आयुष्यभर तिची सेवा केली. पण काय मिळालं? आमचं गणगोत वाहून गेलं.’’

‘‘आजी, पण तुमचं कुटुंब तुमच्याभोवती आहे ना?’’

‘‘आहे, पण सख्खे शेजारी गेले. गणगोत गेलं. लहान-लहान लेकरं गेली. आमचा सारा आनंद घेऊन गेली.’’

‘‘डोंगर घसरल्याची घटना समजल्यावर गावातले इतर रहिवासी इथे धावले. इथली परिस्थिती बघून सुन्न झाले. मातीच्या त्या पाण्यात ३ फुटांपर्यंत आम्ही बुडत होतो. पावसाचा जोरदार मारा होता, प्रचंड वारा होता आणि गडद धुक्याने समोरचं काहीच दिसत नव्हतं. जे हाताला लागलं ते ओढून काढलं. मी २३ मृतदेह एकट्यानं बाहेर काढले.’’ तळीये गावाचे सरपंच सांगत होते. स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनीही खूप मदत केली. दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ती प्रलंयकारी विनाशाच्या खुणा घेऊनच… आणि मग त्यानंतरचे काही दिवस गेले प्रचंड गर्दीचे, संवेदनाशून्य गर्दी. घटनेचे इव्हेन्ट करणारी गर्दी. यातून उभारी धरण्यासाठीची याचना. मदतीची याचना…

या साऱ्यांना परत उभे करायला पाहिजे ना! कबूल आहे की, निसर्गाने संपवले. पण आपण माणुसकीतून परत उभे करू शकतो ना? सरकारी पातळीवरूनही मदत केली जात आहे, हा विश्वास ठेवा. स्थानिक लोकप्रतिनिधी खूप मेहनत घेत आहेत. या साऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सारेजण सज्ज झाले आहेत. त्यांच्याबरोबर आपणही सहकार्य करायला पाहिजे, त्यांच्यावर विश्वास ठेवून… मी तुम्हाला निक्षून सांगते, ही जी मदतीची भावना असते ना, ती प्रत्येकात ओतप्रोत भरलेली असते. अशा कसोटीच्या क्षणी ही मदतीची गंगा भरभरून वाहायला लागते. हीच असते माणुसकी. वाहणाऱ्या डोळ्यांच्या साक्षीने! माणुसकीच्या नात्याचे हे बंध असेच राहतात… चिरकाल… ते सामावून घेण्यासाठी आपणही आपल्या हृदयातला गोफ विणूया, एकमेकांच्या साथीने, साक्षीने…!

rayatechadarbar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -