Share

‘ज्ञानेश्वरी’त माऊलींनी अठराव्या अध्यायातील सूत्र सांगताना म्हटले की, आत्म्याच्या ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की, रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाले, तरी आकाश हे त्याहून वेगळे असते. याविषयी माऊलींनी अनेक चपखल उदाहरणांनी समजावून सांगितले आहे.

ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

जन्माला आलेला प्रत्येक जीव काही ना काही कर्म करीत असतो. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पण त्याचा आत्मा मात्र या कर्मांना कारणीभूत नसतो. तो तटस्थ असतो. ही भगवद्गीतेतील शिकवण आहे. आपण ती ऐकली आहे. ती रसाळपणे, सोप्या उदाहरणांनी समजावून देण्याचं कार्य माऊलींचं! ‘ज्ञानेश्वरी’त ते सर्वत्र अशी चपखल उदाहरणं देतात की, त्याला तोड नाही. आता अठराव्या अध्यायातील हे सूत्र सांगताना दिलेले दाखले पाहूया.

‘आत्म्याच्या ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्मे अशा रीतीने होतात की, रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाले, तरी आकाश जसे त्याहून वेगळे असते.’ ओवी क्र. ३०७. किती साजेसा दृष्टान्त हा! किती सखोल! आत्म्याला दिली आहे आकाशाची उपमा. काय सारखेपणा आहे दोहोंत? दोन्ही अनंत, अविनाशी, अविकारी आणि आधारभूत. या आकाशात सूर्य उगवतो, दिवस सुरू होतो. तिथेच चंद्र उगवतो आणि रात्र सुरू होते. रात्र आणि दिवस आकाशात उत्पन्न झाली, तरी आकाश त्यापासून वेगळं आहे. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी शुभ किंवा अशुभ कर्म उत्पन्न होतात. यात अजून एक अर्थाचा पदर आहे. दिवस आणि रात्र हे परस्परविरोधी आहेत. दिवस म्हणजे तेज, प्रकाश तर रात्र म्हणजे संपूर्ण काळोख. या दिवसाप्रमाणे शुभ कर्म आहेत; तर अशुभ कर्म रात्रीप्रमाणे. आकाश या दोहोंपासून अलिप्त, त्याप्रमाणे आत्मा यापासून तटस्थ आहे.

पुढचा दाखला दिला आहे नावेचा. ‘पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवतो, परंतु त्या ठिकाणी उदक जसे काही एक न करता साक्षीभूत असते.’ ती ओवी अशी की,

‘नाना काष्ठीं नाव मिळे। ते नावाडिने चळे।
चालविजे अनिळें। उदक ते साक्षी॥ ओवी क्र. ३०९

‘काष्ठ’ शब्दाचा अर्थ आहे लाकूड, तर ‘चळे’चा अर्थ चालते आणि ‘अनिळे’ म्हणजे वाऱ्याने. इथे नावाडी म्हणजे वेगवेगळी कर्मं करीत असलेला जीव होय, तर उदक म्हणजे आत्मा. वाऱ्याच्या मदतीने नाव हाकत नावाडी पुढे चाललेला असतो. पाणी या सगळ्याला साक्षी असतं, पण ते अलिप्त असतं. या पाण्याप्रमाणे ‘आत्मा’आहे. या कल्पनेत पुन्हा एक सूचकता आहे. नावेत बसून पुढे जाणं म्हणजे प्रवास, गती आहे. त्याप्रमाणे ‘कर्म’ करीत जीव जीवनात पुढे सरकत असतो. तसेच आत्मा पाण्यासारखा यातही अर्थ आहे. पाणी हे शुद्ध, निर्मळ, पंचतत्त्वांपैकी एक महत्त्वाचं जीवनतत्त्व आहे.

आत्मादेखील असा शुद्ध, निर्मळ आहे. आत्मा हा कर्मापासून वेगळा आहे, अलिप्त आहे. याची अजून काही सुंदर उदाहरणं माऊली देतात. त्यामुळे हे तत्त्वज्ञान सामान्य माणसालाही अगदी सहज कळतं. माऊली डोळ्यांसमोर चित्रं उभी करतात. जसे इथे पाण्यातील नाव किंवा आकाशातील सूर्य, चंद्र यांमुळे होणारे दिवस-रात्र या घटना आहेत. या चित्रांमुळे सांगण्याचा विषय सुस्पष्ट होतो; शिवाय तो मनावर ठसतो. जास्त काळ लक्षात राहतो.

ही सारी किमया ‘माऊलीं’च्या कल्पकतेची. ‘तेणें कारणें मी बोलेन। बोलीं अरुपाचें रूप दावीन। अतीद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरवीं॥’’ ‘त्या योगाने मी बोलेन, आणि माझ्या बोलण्यात निराकार वस्तू सर्वांना प्राप्त करून देईन आणि जी वस्तू इंद्रियातीत आहे, ती इंद्रियांकडून भोगवीन.’अशी प्रतिज्ञा घेऊन ‘ज्ञानेश्वरी’चे लेखन करणारे ज्ञानदेव! अशा दृष्टान्तांनी अमूर्त गोष्टींना आकार देतात. आता आपण पाहिलेली तत्त्वज्ञानातील सूत्रं नुसती ऐकताना निराकार वाटतात. परंतु ज्ञानदेवांच्या प्रतिभेने ती सहज, सुंदरपणे साकार होतात.

manisharaorane196@gmail.com

Recent Posts

Chandrashekhar Bawankule : भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा!

सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात मुंबई :…

30 mins ago

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन…

38 mins ago

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त बीड : बीड शहरातील एक कोटी…

1 hour ago

Cinema Hall Shut Down : दहा दिवस चित्रपटगृह राहणार बंद!

जाणून घ्या नेमकं काय आहे कारण मुंबई : कलाविश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली…

1 hour ago

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा…

2 hours ago

Horoscope : दोन दिवसांत ‘या’ राशीत येणार राजयोग; होणार धनलाभ!

पाहा तुमची रास आहे का यात? मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसांनंतर अत्यंत शुभ राजयोगाची निर्मिती…

3 hours ago