Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनोकरी परदेशी, बायको दुसऱ्याशी

नोकरी परदेशी, बायको दुसऱ्याशी

  • क्राइम : अॅड. रिया करंजकर

परदेशात नोकरी म्हणजे समाजात मान हा सध्याच्या घडीला एक नवीनच विचार रुजू लागला आहे व आजकाल तरुण मंडळी भरभक्कम पगारासाठी परदेशाची वाट धरत आहेत. परदेशी नोकरी करताना हे तरुण आपल्या कुटुंबाशी दूर होत चालले आहेत. तर काही तरुण परदेशात नोकरीला गेल्यावर आपल्या मायदेशी येण्याचं नावही घेत नाहीत.

सुधीर उच्चशिक्षित तरुण एअर फोर्समध्ये कार्यरत होता. त्याची पत्नी सीमा ही स्वतः उच्चशिक्षित होती व एका प्रायव्हेट कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होती. त्या दोघांना सोहम नावाचा एक चार वर्षांचा मुलगा होता. घरात आई-वडील व हे तिघे जण असा त्यांचा सुखी संसार चालू होता. एक दिवस सुधीर याला परदेशात नोकरी चालून आली म्हणून एअरफोर्समधील नोकरीचा त्याने राजीनामा दिला व परदेशात नोकरी करण्याचा विचार ठाम केला. आपली पत्नी सीमा व मुलगा सोहम याला आपल्या आई-वडिलांसोबत ठेवून तो परदेशात निघून गेला. परदेशात त्याला एअर फोर्सपेक्षा भरभक्कम पगार मिळत होता. त्यामुळे त्याचं जीवन एकदम आनंदी आणि सुख-सुविधा यांनी समृद्ध असं चाललेलं होतं. तो पगारातील काही रक्कम आपली पत्नी आणि आई-वडिलांना पाठवत होता. सीमा ही नोकरदार असल्यामुळे तिलाही चांगला पगार होता. सोहम हा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकत होता. सीमाने विचार केला की, सोहम याला पाचगणीमध्ये पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचं आणि त्याप्रमाणे तिने सोहमला पाचगणीला पाठवलं. आता सीमा व तिचे सासू-सासरे असे तिघेच राहत होते. परदेशात गेल्यानंतर सुधीर दोन वेळा भारतात येऊनही गेला. हळूहळू सीमाचं बोलणं सुधीरला वेगळ्याच पद्धतीचं वाटू लागलं होतं. पूर्वीसारखी ती आपल्याशी बोलत नाही की, वागत नाही याची चुणचूण सुधीरला लागून राहिली होती. सुधीर आपला परदेशातून इंटरनॅशनल कॉल करायचा आणि इकडे सीमा मला बोलायला वेळ नाहीये, मी कामात आहे, अशीच सतत उत्तर द्यायची. मुलांसाठी वेळ जात असेल, तर मुलगाही इथे नव्हता. मग सीमा एवढी बिझी का? हा प्रश्न सुधीरला पडू लागला. त्याने आपल्या आई-वडिलांना याच्याबाबत विचारले असता आई-वडिलांना ती घरी कमी, बाहेरच जास्त असते. काहीतरी तिचं काम असेल म्हणून ती बाहेर असेल, असं उत्तर मिळालं. तीही नोकरदार महिला आहे. त्याच्यामुळे आम्ही तिला जर विचारलं तर सासू-सासरे त्रास देतील असं ती बोलेल म्हणून आम्ही तिला काही विचारत नाही. आपल्या पत्नीच्या वागण्यात असं काय बदल झालेला आहे, हे सुधीरला समजेना.

सुधीरने अनेक वेळा तिला विचारण्याचा प्रयत्न केला. ती व्यवस्थित उत्तर सुधीरला देत नव्हती. म्हणून सुधीरने भारतात येण्याचा विचार केला. सीमाला याची कल्पना न देता तो भारतात आला. सुधीर घरी आलेला आहे. याचा आनंद सीमाचा चेहऱ्यावर सुधीरला आढळून आला नाही. बारीक लक्ष ठेवायला लागला. त्याला समजले की, त्याच्या पत्नीचे जावेद नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत आणि गेल्या वर्षभर हे प्रकरण चालू आहे आणि त्यालाही कळलं की त्याने पाठवलेल्या पैशातून सीमाने जावेदला आठ लाख रुपये काढून दिलेले होते. याबद्दल सीमाला विचारणा केली असता. ती सुधीर आणि त्यांच्या घरच्यांशी भांडू लागली व नको नको ते आरोप त्यांच्यावर करू लागली. सुधीरने तिला व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. तेव्हा सुधीर याने तू कायमची निघून जा, तुझा निर्णय तू घे, असं तिला सांगितलं. त्यावेळी सीमा हिने सुधीर आणि त्याच्या घरच्यांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल करून त्याच्याविरुद्ध नको नको ते आरोप करून ४९८ व टीव्ही मॅटर न्यायालयात दाखल केला.

सुधीर गेली अनेक वर्षं परदेशात असूनही त्याच्याविरुद्ध ४९८ व टीव्ही मॅटर दाखल केला. आपली बाजू कोर्टासमोर मांडली व तिचे परपुरुषाशी संबंध असलेले पुरावे त्यांनी कोर्टापुढे सादर केले. त्यामुळे कोर्टाने त्यांचा मुलगा सोहमसाठी सुधीरला मेंटेनेस सुरू केला आणि सुधीर आपला मुलगा आपल्या कस्टडीत कसा येईल यासाठी कोर्टात धडपडत आहे. सुधीर याने सीमा विरुद्ध घटस्फोट फाईल केलेला आहे.

सुधीर उच्चशिक्षित होता. एअर फोर्समध्ये उच्च पदावरही होता, तरीही भरभक्कम पगाराच्या लालसेपोटी त्याने ही नोकरी सोडून परदेशात नोकरी स्वीकारली व आपल्या सुखी संसाराची घडी विस्कळीत केली.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -