Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककोलाजजयोस्तुते... स्वातंत्र्यवीर सावरकर!

जयोस्तुते… स्वातंत्र्यवीर सावरकर!

  • लक्षवेध: ह. भ. प. डॉ. वीणा खाडिलकर

भारत देशाच्या आधुनिक इतिहासातील एक सुवर्णपान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, ते हिंदुहृदयसम्राट, स्वातंत्र्यवीर, समाजसुधारक, प्रतिभावंत साहित्यिक व कवी आणि स्वातंत्र्य युद्धातील नेतृत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर होय!

“तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण” असे आपल्या मातृभूमीविषयी निर्व्याज प्रेम असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आजच्या काळामध्ये सुद्धा भारतीयांना मार्गदर्शक ठरतात. जाज्वल्य देशभक्तीबरोबरच प्रगल्भ प्रतिभाशक्ती, प्रेरक वक्तृत्व, तत्त्वनिष्ठ हिंदुत्ववादी, क्रांतिकारी नेतृत्व आणि कर्तृत्व असणारे, धर्माभिमानी व विज्ञानवादी समाजसुधारक अशा अनेक उच्चतम गुणांचा समुच्चय असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक बहुपैलू व्यक्तिमत्त्व होते.

अनेक क्रांतिवीरांनी मिळालेला मानव जन्म राष्ट्रासाठी अर्पिला, आपला सुखी संसार त्यागला, रात्रंदिवस फक्त आणि फक्त देशाचाच विचार केला. आज आपण अशा एका महान आणि काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या क्रांतिवीराबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने ब्रिटिश सरकारच्या पायावरच घाव घालून, त्यांना मातीत मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान अहोरात्र कोलू ओढला, दंडबेडी सहन केली, देशासाठी कठोर शिक्षा सहन केली. याचे देशप्रेमी नागरिकांना कधीच विस्मरण होणार नाही. अशा त्यागी क्रांतिकारकांमुळेच भारतात वेळोवेळी स्वातंत्र्याची मशाल पेटती राहिली. त्यामुळे इंग्रजांच्या काळात सातत्याने क्रांतिकारी उठाव होत राहिले. म्हणजेच काय तर भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी सतत कार्यरत राहायचे आहे, हा विचार तत्कालीन लोकांच्या मनावर बिंबत राहिल्याने तो विचार खोलवर रुजवला गेला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य कसे होते? हे पाहण्यासाठी मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला सहकुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक यांसह आवश्य भेट दिली पाहिजे. त्यानंतर देशासाठी आपण स्वतः काय करू शकतो? हे पाहिले पाहिजे.

१४० कोटी लोकसंख्येच्या या देशात देशासाठी कार्य करणाऱ्या लोकांची संख्या मूठभर आहे. स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगताना देशासाठीही जगायला शिकलो, तर पूर्ण देश हेच कुटुंब होईल. देशसेवा ही केवळ सुरक्षा दले, पोलीस यांत सेवा करणाऱ्यांची जबाबदारी आहे, असे मुळीच नाही. स्वतःला जमेल तसे समाजसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
कोलू, दंडबेडी म्हणजे काय, हे जुन्या लोकांना माहीत असावे. पण, ते आजच्या स्मार्ट फोनच्या विश्वातील टेक्नोसॅव्ही लोकांना माहीत असेल का? क्रांतिकारकांची माहिती शालेय शिक्षणापर्यंतच मिळते. त्यांनतर व्यावसायिक शिक्षण घेण्यात इतके व्यस्त राहिले जाते की, क्रांतिकारकांची जयंती, पुण्यतिथी येऊन गेली तरी त्याविषयी कल्पना नसते. मग विचार करा. ज्यांनी ब्रिटिशांची हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी आवाज उठवला. कुठे लाचखोरी, भ्रष्टाचार होत असेल तर त्या लोकांना चव्हाट्यावर आणण्यासाठी अशा जटिल समस्यांवर आवाज उठवण्याचे धाडस दाखवले जात नाही. म्हणजे काय तर कानाडोळा करून व्यवस्थेवर बोट ठेवले जाते. पण, मी काय करतो? याचा विचार करत नाही. क्रांतिकारक होणे सामान्य नाही. हे यावरून लक्षात येते. सांगण्याचे कारण हेच की, लोकशाहीतील अधिकारांचा उपयोग करून रितसर आवाज उठवू शकत नाही. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शरीराने कोलू ओढताना काय यातना भोगल्या असतील?

सावरकरांना दोन जन्मठेपेची, सलग पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेसाठी अंदमानच्या तुरुंगात नेण्याआधी त्यांना मुंबईच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या वेळी सावरकरांच्या सहधर्मचारिणी यमुनाबाई त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी यमुनाबाईंचे सांत्वन करून त्यांना धीर देण्यासाठी सावरकरांनी सांगितलेले शब्द सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा व्यक्त करतात. ते म्हणाले, ‘घाबरू नकोस. ईश्वराची इच्छा असेल तर आपण पुन्हा नक्कीच भेटू. केवळ घर वसवणं आणि मुलं जन्माला घालणं यालाच जगणं म्हणत असशील, तर चिमण्या आणि कावळेही असं जगतात. आपण माणसं आहोत. जगण्याचा खरा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे. मी आरंभिलेल्या या कार्यामुळे आज जरी आपल्या एकट्याच्या घरात दु:ख असले, तरी त्यामुळे लाखो देशवासीयांना सुख-समाधान मिळणार आहे. देश समृद्ध होणार आहे.’

भाषाप्रेम, भाषाशुद्धी या विषयांचा विचार करताना, एक नाव प्रकर्षाने आणि आदराने घ्यायलाच हवे. ते म्हणजे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे. सावरकर हे फर्डे वक्ते होते. मराठी भाषेवरचे प्रभुत्व आणि ओघवती वक्तृत्वशैली या जोरावर त्यांनी अनेक सभा गाजवल्या, अभिजात साहित्य लिहिले. मराठी बोलताना मराठीच शब्द वापरण्याबाबत आग्रही असलेल्या सावरकरांनी मराठी भाषेला शेकडो शब्द दिले. उदाहरणार्थ, मेयर-महापौर, सिनेमा-चित्रपट, फायर ब्रिगेड-अग्निशमन दल इत्यादी… इतर भाषेतले शब्द वापरल्याने झालेल्या भाषा संकरामुळे भाषा समृद्ध होते, असा एक विचार सातत्याने ऐकायला मिळतो. तो सावरकरांना मान्य नव्हता. तो योग्यच म्हणावा लागेल. एकदा एका भाषेत बोलणे चालू केल्यावर पूर्णपणे त्याच भाषेत बोलले पाहिजे. मराठी बोलत असताना मध्येच इंग्रजी, मध्येच हिंदी अशा प्रकारे बोलून कुठलीच भाषा धड बोलली जात नाही. भाषेविषयी अशी दयनीय अवस्था का? असा विचार होत नाही. त्यामुळे एकाही भाषेवर प्रभुत्व मिळवता येत नाही. ‘एक ना धड भाराभर चिंध्या,’ असे होते. दुर्दैवाने सध्या अशाच संभाषणाला हुशारी समजले जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीचे महत्त्व मराठी माणसांवर अंकित होण्यासाठी कठोर प्रयत्न केले, हे त्यांचे वेगळेपण आहे. अशा धडाडीच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वामुळे मराठी भाषा राजभाषा म्हणून सर्वमान्य आहे. ज्यांना मराठीचे मोल कळले ते ती भाषा बोलताना इकडून तिकडे याप्रमाणे अन्य भाषांवर उड्या मारत स्वतःचे हसे करून घेणार नाहीत. सावरकर ना केवळ क्रांतिकारक होते, तर ते भाषा तज्ज्ञही होते. हे विसरून चालणार नाही. असे भाषा प्रभू असलेले क्रांतिकारक महाराष्ट्राला, भारताला लाभले.

देशाच्या आणि त्यातही महाराष्ट्रातील जनतेच्या नसानसांत स्वातंत्र्यवीर सावरकर भिनलेले आहेत. त्यांच्या प्रखर विचारांच्या माध्यमातून आजही आणि पुढेही ते समाजमनात कायम राहणार आहेत. याविषयी शंकाच नाही. अहो, हिमालय पर्वताला कोणी इकडून तिकडे हलवू शकते का? अजिबात नाही. तेच स्थान वंदनीय सावरकरांविषयी जनमानसात आहे. जनतेच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करणे सोपे नाही. अनेकांनी सावरकरांना प्रत्यक्षात पाहिलेलेही नाही. मात्र त्यांच्या विचारांचा प्रभाव वर्ष २०२३ मध्येही कायम असणे हीच त्यांच्या नि:स्वार्थी देशसेवेची किमया आहे. हिंदुहृदयसम्राट, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शतशः नमन!!

vtkhadilkar@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -