Monday, May 13, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सJanmavari : एकदा तरी अनुभवावी अशी 'जन्मवारी'

Janmavari : एकदा तरी अनुभवावी अशी ‘जन्मवारी’

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

२०१६ मध्ये राॅयल ऑपेरा हाऊस नामक, दक्षिण मुंबईतील बंद पडलेल्या नाट्यगृहाचा सांस्कृतिक वारसा प्रेक्षकांसाठी खुला झाला खरा; परंतु कोविडच्या संकटामुळे तो पुन्हा बंद झाला. पुन्हा सुरू करण्यात, आलेल्या अडचणींवर मात करत ऑपेरा हाऊस खऱ्या अर्थाने ‘राॅयल’ ठरलं आहे. दीड महिन्यापूर्वी ‘नाट्य-वेल्हाळ’ हा मराठी नाटकांचा आणि आता ‘नाट्यधारा’ हा बहुभाषिक नाट्यमहोत्सव आयोजित करून नाट्यक्षेत्रात वेगळेपण सिद्ध करणाऱ्या मराठी नाटकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न स्तुत्य तर आहेच; परंतु तो गौरवशाली आहे. या नाट्यधारेत जन्मवारी या मराठी रंगभूमीवर ठसा उमटवू पहाणाऱ्या समांतर नाट्याकृतीचा समावेश केल्याबद्दल अॅविड लर्निंग, क्युरेटेड क्लासिक्स, अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाईड यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

स्थूलमानाने नाटकाचे चार प्रकार पडतात, शोकात्मिका (ट्रॅजेडी), सुखात्मिका (काॅमेडी) क्षोभप्रधान नाट्य (मेलोड्रामा) आणि प्रहसन (फार्स), पैकी चारही नाट्यप्रकार गेल्या ३०-३५ वर्षांत उदयास आलेल्या समांतर नामक रंगभूमीशी अधिक जवळीक साधणारे आहेत. त्यामुळे लिखाणातून व्यक्त होताना समांतर रंगभूमीसाठी लिहिली जाणारी संहिता ही फार काटेकोरपणे दृष्यात्मकतेचा विचार करून लिहावी लागते. कारण समांतर नाट्याचा गुणधर्मच वैचारिक आणि दृष्यात्मकता यावर आधारभूत आहे.

मला एक कल्पना सुचते की, एखाद्या स्त्रीची वेश्यावृत्ती वैराग्य अवस्थेकडे मार्गक्रमण करीत असताना संत कान्होपात्रेची कथा त्यात मिश्रित करून आत्मन्भूतीचे अध्यात्म सादर केले तर? वरवर वाचताना देखील क्लिष्ट वाटणारी ही संकल्पना, (कदाचित मूळ संहिता पालीची मगर केल्यामुळे की काय) लेखन दृष्ट्या धडपडत, ठेचकाळत, लंगडत का होईना वारी पूर्ण करते. समांतर नाटकांत कथाबीज जरी एकसंध नसले तरी दृष्यांचा प्रवाह सहज असावा लागतो. तेव्हा आणि आता या कालमर्यादेवर नाटक जेव्हा उभे रहाते तेव्हा निदान वैचारिक भाष्य स्पष्ट असावे लागते. लेखन प्रक्रियेच्या वेळी अध्यात्माच्या आड लपण्याची लेखकास सवय लागली की, प्रत्येक प्रसंगात तो अध्यात्माच्या आहारी जाताना आढळतो. मग ते नाटक सर्वसाधारण प्रेक्षकवर्गाचे रहात नाही. लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकरांबाबत हेच म्हणावे लागेल.

संत कान्होपात्रेची आई नायकिण होती व तिला एखाद्या राजाला विकून तिच्या आयुष्याची भ्रांत मिटावी हा विचार करणारी आणि मंजिरी नामक शरीरविक्रिय करून आपल्या आयुष्याला बोल लावणारी वेश्या यांच्या मनोवृत्तीत टोकाचा फरक आहे. मग तो ओढूनताणून जोडायचा झाल्यास पात्ररूपी डिव्हाईस वापरण्यावाचून गत्यंतर नसते. कान्होपात्रेची दासी विठा आणि प्लॅटफाॅर्मवर योगायोगाने ओळख झालेली मुस्लीम ‘वृंदा’ हे ते दोन डिव्हाईस, खऱ्या अर्थाने आपणास वारी घडविण्यास कारणीभूत ठरतात. आणि मग ते कथानक अजून एका उपकथानकाचा पदर धरुन फरपटत जाते. मला जी कल्पना सुचली होती की, वेश्येच्या किंवा नायकिणीच्या तोंडून अध्यात्म वदवायचे, त्यास मग ठोस मोकळीक मिळते आणि दोन्ही कथांच्या समांतर कथाबीजान्वये साधलेल्या सुसंवादाला आपण स्टेपलर मारत बसतो. जीवनाचे सार ऐकत, अध्यात्माची कास धरत आपण जन्मवारी करत रहातो.

मात्र या नाटकाच्या अन्य तांत्रिक अंगांबद्दल लिहिणे तितकेच महत्त्वाचे आहे. संगीत हा या नाटकातील अत्यंत संवेदनशील घटक आहे. संत कान्होपात्रा आणि संत नामदेवांच्या अभंग चालींबरोबरच सद्यकाळातील संगीत व ध्वनिसंकेत एकत्रित मिश्र स्वरूपात पेश करणे हे अत्यंत अवघड काम होते. दोन निरनिराळे काळ डिझाॅल्व होण्यासाठी संगीतकार मंदार देशपांडे यांनी घेतलेली मेहनत दिसून येते. विशेषतः ध्वनिमुद्रित संगीताला ‘लाइव्ह’ करण्यासाठी टाळ या वाद्याचा वापर लक्षणीय आहे. तीच गोष्ट प्रकाशयोजनेबाबत म्हणता येईल. अमोघ फडके काही दृष्यांमधल्या भावना अंडरलाइन करताना जे लाइट सोर्स वापरतो त्यांस प्रेक्षागृहातून टाळ्या आल्याशिवाय रहात नाहीत. नटसंचाची कामगिरी पुढे नेण्यासाठी संगीतकार आणि प्रकाशयोजनाकारने आपले सर्वस्व पणाला लावले आहे.

शुभांगी भुजबळ, अमृता मोडक, कविता जोशी व शर्वरी कुलकर्णी बोरकर या आपापल्या जागी विविध भूमिकांत चपखलपणे आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना आढळतात. मात्र हेमांगी कवी या अभिनेत्री साकारलेली मंजिरी प्रेक्षकांच्या नक्कीच लक्षात रहाणारी आहे. एखाद्या कलाकाराला दिग्दर्शकाने भूमिका समजावल्यावर बिटविन द लाइन्स जागा काढणं म्हणजे काय असतं, याचा परिपाठ हेमांगी उभा करते. वेश्येच्या लकबी, वेश्येचे मॅनरिझम्स, शिवराळ भाषा या गोष्टी तिच्या नाट्य-अभ्यासाची साक्ष देतात. हेमांगीला मध्यंतरी थँक्स डिअर नामक थुकरट नाटकात काम करताना पाहिलं आणि हबकलोच. जी कलाकार आमच्यावर फुलराणी बनून अधिराज्य गाजवतेय, तिला मिळणाऱ्या ताकदीच्या भूमिका मिळणे बंद झाले की काय? या प्रश्नाबरोबरच जन्मवारीची ही भूमिका तिच्या पदरी पडली, ज्याचं तिने सोनं केलंय.

अल्लडपणा संपुष्टात येऊन अध्यात्माच्या प्रगल्भ वाटेवर चालण्याचा शर्वरी कुलकर्णींनी हेमांगी कवीचे ट्रान्सफाॅर्मेशन अलिप्तपणे प्रेक्षक बनून पाहावे. खूप शिकता येईल.

निर्माते सतीश आगाशे व शांभवी बोरकर यांच्या “जन्मवारी”च्या साहसास सलाम करावाच लागेल. समांतर नाटकास पोषक असे वातावरण नसताना, समांतर रंगभूमीसाठी नाट्यगृह हे उपलब्ध नसताना, चार पात्रांपेक्षा अधिकचा नटसंच परवडत नसताना, तरीही ओळखिच्या चेहऱ्यांना घेऊन नाटक करणे म्हणजे दिव्य आहे; परंतु नाट्यधारासारख्या उपक्रमांतून रवी मिश्रा आणि भाविक शहा यांनी नाट्यरसिकांना उपलब्ध करून दिलेली “जन्मवारी”ची संधी नक्कीच गौरवास्पद आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -