Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीपोलीस अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून जमादाराची आत्महत्या

पोलीस अधीक्षकांच्या जाचाला कंटाळून जमादाराची आत्महत्या

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस जमादाराने गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू कोरडे (वय ५४) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून पोलिस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

पुसद येथील रहिवाशी असलेले कोरडे हे महागावला कार्यरत असताना लाचलुचपत प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते. चौकशीदरम्यान त्यांची बदली यवतमाळ पोलिस मुख्यालयात करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यावर बिटरगाव पोलिस ठाण्यात त्यांची बदली करण्यात आली. येथे कार्यरत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याने काही दिवस रुग्णालयात होते.

उपचारासाठी बराच खर्च झाल्याने आर्थिक अडचणीत होते. वाढते वय आणि दुखापतीमुळे त्यांनी पुसदला बदली देण्याची विनंती पोलिस अधीक्षकांकडे केली. वैद्यकीय खर्चाचे बिलही मंजूर झाले नाही. पोलिस अधीक्षकांना विनंती करण्यासाठी पत्नीसह गेले असता अपमान करण्यात आला. आपल्या मृत्यूस पोलिस अधीक्षकच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी चिठ्ठीत केला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कोरडे यांच्यावरील कार्यवाही तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळातील असल्याचे सांगितले. मृत्यूपूर्व चिठ्ठीतील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात येईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -