गडचिरोली : गेली पाच दशके माओवादी संघटनेच्या विस्तारामध्ये सक्रीय भूमिका बजावणारा, माओवादी चळवळीतील पहिल्या फळीतील जहाल नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य कटकम सुदर्शन याचा ३१ मे रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. नक्षली चळवळीत कॉमरेड आनंद म्हणून तो ओळखला जात असे. माओवाद्यांचा थिंक टँक अशी त्याची ओळख होती. माओवाद्यांनीच पत्रक काढून त्याच्या मृत्यूची बातमी दिली.
सुदर्शनचा मृत्यू ३१ मे ला झाला. मात्र यासंबंधीची माहिती माओवादी संघटनेचे केंद्रीय समिती प्रवक्ता अभय याने काल सकाळी पत्रकाद्वारे प्रसारमाध्यमांना दिली. तब्बल पाच दशके नक्षली चळवळीत सक्रीय राहूनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासकट पाच राज्यांत एकूण अडीच कोटींचे बक्षीस लावण्यात आले होते. माओवादी चळवळीच्या अनेक मोठ्या घटनांमध्ये सहभाग असणार्या सुदर्शनचा मृत्यू माओवाद्यांसाठी मोठा धक्का आहे.
तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील बेलमपल्ली येथे जन्मलेल्या सुदर्शनने १९८० च्या दशकात पीपल्स वॉर ग्रुप मध्ये सामील होण्यापूर्वी वारंगलमध्ये पॉलिटेक्निक कोर्स केला. तो उत्तर तेलंगणा भागातील आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्यासाठी नक्षल चळवळीत सामील झाला. संघटनेचा सचिव म्हणून अथकपणे काम करत सुदर्शनने माओवादी चळवळीचे उत्तर तेलंगणापासून छत्तीसगडमधील दंडकारण्यच्या आदिवासी वस्तीपर्यंत नेतृत्व केले.
नक्षलवादी हल्ल्यात ७० हून अधिक जवान शहीद झालेल्या दंतेवाडा हत्याकांडाचा सुदर्शन सूत्रधार असल्याचे मानले जाते. २०१३ मध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेस नेत्यांवर झालेल्या हल्ल्याची योजना आखून त्याची अंमलबजावणी केल्याचाही त्याच्यावर संशय होता. सुदर्शनला २१ खटल्यांचा सामना करावा लागला, प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये, त्याच्यावर सुमारे १७ खटले दाखल आहेत. बहुतेक आरोप भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत खुनाशी संबंधित होते आणि त्याला पकडण्यासाठी अडीच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मागील काही वर्षांपासून त्याला मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या आजारांनी ग्रासले होते. अखेर ३१ मे रोजी त्याचा छत्तीसगडच्या जंगलात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.