Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणअसा टिनपाट मुख्यमंत्री राज्याला मिळाला हे दुर्दैव

असा टिनपाट मुख्यमंत्री राज्याला मिळाला हे दुर्दैव

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेचे लक्ष नको तिथे वळविण्यासाठी ही अशी भाषणे करत आहेत. औरंगाबादचे हे भाषण बकवास आणि आकसाचे होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचा गेल्या ४९ वर्षांत मर्दपणा दिसला नाही आणि म्हणे मर्द! भाजप, आरएसएस यांच्या कार्यावर बोलण्याची तुमची लायकी तरी आहे काय? आधी तुम्ही काय काम केले ते सांगा. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तुम्ही टीका करता, तुमची लायकी तरी आहे काय? मुख्यमंत्री आणि शिवसेना नेता म्हणून तुम्ही काय कार्य केले ते दाखवा, असे जाहीर आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांना केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिले.

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे गुरुवारी पडवे मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ. मिलिंद कुलकर्णी, अशोक सावंत, दादा साईल आदी उपस्थित होते. ज्या शहरात मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभा घेतली तेथे ७ दिवसांनी एकदा पाणी येते, असे हे औरंगाबाद शहर. तिथे सभा घेऊन तुम्ही काय बोलता? हे कसले मुख्यमंत्री? कशाला खुर्चीत बसता? तुम्ही राज्य १० वर्षे मागे नेले. विकासाचे ज्ञान नाही, की काय करावे हे कळत नाही. गेल्या अडीच वर्षांत नारायण राणे यांच्या घराला नोटिसा दिल्या हे एकमेव काम या मुख्यमंत्र्यांनी केले. मी पळपुटा नाही. त्यामुळे भाजपला धमक्या दिल्या आणि नेत्यांवर टीका केल्यास जशास तसे आणि त्यापेक्षा जास्त जोराने उत्तर देऊ, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

कोरोनात जे लोक दगावले त्यांना मोदींनी आर्थिक मदत केली. मात्र राज्य सरकार काहीच मदत देऊ शकलेले नाही. भाजपवर टीका करताना ‘कार्टी’ असा शब्द वापरला होता, त्याचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले, सुशांत सिंग, दिशा सलीयन, पूजा चव्हाण प्रकरणी आम्ही गृहमंत्री शहा यांची भेट घेणार आहोत. मग तुमची ‘कार्टी’ यांनी त्यात काय दिवे लावले आहेत ते कळेल. बाळासाहेब असते, तर अशा वेळी मुख्यमंत्रीपद घेतले नसते. जेव्हा मला मुख्यमंत्री केले तेव्हा उद्धव ठाकरे होते, मात्र त्यांना मुख्यमंत्री न करता मला केले, एक शिवसैनिक म्हणून.चतुम्ही शिवसैनिकांना काय दिले? रायगडला जमिनी घेताना तुमचे नातेवाईक दिसले. आता काही नातेवाईक ऑस्ट्रेलियात आहेत, असा टोला राणेंनी लावला.

केंद्रीयमंत्री नारायण राणे पुढे म्हणले, ‘टीका ही मार्गदर्शन स्वरूपाची असावी. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांना भान राहिलेले नाही. टीनपाट लोक आणि मर्द, कार्टी असे शब्द मुख्यमंत्र्यांना शोभत नाहीत. राज्यात काय आर्थिक स्थिती आहे, त्याचा अभ्यास करा. २४ कोटींची महसुली तूट आहे. शेतकऱ्यांना पाच पैसे तरी दिलेत काय? कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा? असा सवाल करतांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘हिंदुत्व’ हा शब्द मुळीच उच्चारू नये. त्यांच्या हिंदुत्ववादावर माझा आक्षेप आहे. काय दिले शिवसैनिकांना? स्वतः आणि मुलगा आणि नातेवाईक वगळता कोणत्या शिवसैनिकाला या सत्तेचा फायदा झाला ते सांगा?’

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे खाते त्यांचा मुलगा चालवतो. औरंगाबादला साधे पाणी देऊ शकलेले नाहीत. ठेकेदार २२% कमिशन देईना, म्हणून योजना बंद केली. आजपर्यंत त्या शहरात सेवा – सुविधा दिलेल्या नाहीत आणि आता सुधारू म्हणता, मुंबईत काय केले? बकाल वस्ती केली, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -