Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीसेनेतील अंतर्गत वाद आला उफाळून!

सेनेतील अंतर्गत वाद आला उफाळून!

खासदार संजय जाधव यांचा थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

मुंबई : सध्या अनेक घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच गढूळ झाले आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना आता शिवसेनेतील वाद उफाळून आला आहे. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असूनही पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिले जाते, मात्र शिवसेनेला डावलले जात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.

आधी भाजपाकडून विरोध झाला आता मात्र आमचे मित्रपक्षच आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकेची झोड उठवली आहे. पुण्यात २५ ते २९ मे या कालावधीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाची पुण्यातील जबाबदारी जाधव यांच्यावर आहे. पुण्यातील विकासकामे, समस्या, पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत तसा अहवाल ते पक्षाकडे सादर करणार आहेत. तत्पुर्वी त्यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंसह राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त केली.

खासदार जाधव म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री असून पाठबळ मिळत नसल्याने येथील पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. पुणे जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. भाजपचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. आघाडीच्या निकषांप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार त्यांना ६० टक्के आणि इतरांना २०-२० टक्के सत्तेचा शेअर मिळायला हवा. पण विकासकामांमध्ये हा शेअर मिळत नाही, अशी कार्यकर्त्यांची खंत आहे.

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व दिलं जातं, मात्र शिवसेनेला डावलण्यात येत असल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत हे पोहचवणार आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी आघाडीच्या निकषांप्रमाणे आम्हाला आमचा शेअर द्यावा, अशी त्यांना विनंती असल्याचे संजय जाधव म्हणाले. कार्यकर्त्यांना अन्यायाची भावना असून वरिष्ठांनी आणखी लक्ष घालायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -