दी लेडी बॉस : अर्चना सोंडे
डॉक्टरला मानवी रूपातील देव मानलं जातं. त्याची तीव्रतेने प्रचिती लोकांना कोरोना काळात झाली, पण जेव्हा डॉक्टर स्वतः अनेक संकटांचा सामना करीत असेल, तर त्याने कुठे जावे, कोणाकडे जावे! ‘स्वानंद’ पॅथोलॉजी लॅबोरेटरीच्या सर्वेसर्वा डॉ. पूर्वा राणे-चौधरी (Purva Rane-Choudhary) यांची गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. पण त्यासोबतच त्यांच्या हिमतीला, जिद्दीला दाद द्यावी असे त्यांचं कर्तृत्व आहे. आपण झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची गोष्ट अनेकदा ऐकली असेल. पती गेल्यावरही आपलं राज्य सांभाळण्याकरिता, प्रत्यक्ष वाचविण्याकरिता, प्रसंगी लहान बाळाला पाठिशी बांधून, हातात तलवार घेऊन, घोड्यावर बसून ती शत्रूशी दोन हात करायला सगळं धैर्य एकवटून निघाली. डॉ. पूर्वा यांची कहाणी काही वेगळी नाही. फरक इतकाच की येथे शत्रू हा कोरोना होता. डॉ. पूर्वा यांची ‘स्वानंद’ पॅथोलॉजी लॅबोरेटरीचा मुळात जन्मच कोविडमधला.
डोंबिवलीत जन्मलेल्या पूर्वा या पॅथॉलॉजी विषयातील एमडी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीतच झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतून झाले. स्वतःची लॅब आपण उघडू असे त्यांच्या मनात होते, पण अशा परिस्थितीत सुरू करावी लागेल असे कधी वाटलं नव्हतं. पण आयुष्यात आलेल्या एका वादळाने त्यांना खचून न जाता अधिक खंबीर बनविले. वय जेमतेम ३२ वर्षे, लग्नाला ८ वर्षे झालेली, जेमतेम दीड वर्षांचा लहानगा स्वानंद असताना पूर्वा यांचे पती डॉ. पंकजकुमार चौधरी (युरोसर्जन) यांचा कोविडमुळे मृत्यू झाला. अत्यंत हुशार, प्रेमळ, कर्तबगार सर्जनचा कोरोनामुळे जीव गेला आणि पूर्वा यांच्यापुढे सगळे प्रश्न ‘आ’ वासून उभे राहिले. मुलाकडे बघून पूर्वा यांनी सर्व धैर्य एकवटलं. आता स्वानंदच जगण्याची उमेद आणि आधार होता. त्याच्याकडे बघूनच पूर्वाने सगळी शक्ती एकवटली. पती गेल्यानंतर त्यांच्या हॉस्पिटलच्याच जागी स्वतःची लॅब उघडावी, जेणेकरून ते रुग्णांना देत असलेली सेवा अखंडित राहावी, अशी पूर्वा यांची इच्छा होती. वैयक्तिक, व्यावसायिक सगळ्याच स्तरावर परीक्षाच होती. त्यांच्यातली पत्नी, आई सोबतच एक डॉक्टर कायम जागृत असायची. आलेले पेशंट हे तणावामध्ये असतात, त्यांना समजून घ्या. त्यांच्या माहिती सोबतच त्यांची आरोग्य पार्श्वभूमी समजून घ्या. लिहून घ्या, अशी संवेदनशीलता दाखविण्यासाठी त्या आपल्या टीमला नेहमीच सांगतात. मुळात एक पॅथॉलॉजिस्ट आपल्या आरोग्याची जोखीम घेऊन हे सगळं काम निष्ठेने करीत असतो. ‘स्वानंद’ पॅथॉलॉजीमध्ये मूलभूत रक्त तपासणीपासून जवळपास सगळ्याच प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. विशेष म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगासाठी केली जाणारी पॅप स्मिअर तपासणी पण येथे केली जाते. डॉक्टर स्वतः महिला असल्यामुळे येणाऱ्या महिला रुग्ण निर्धास्त असतात.
डोंबिवलीत दोन वर्षांतच ‘स्वानंद’ पॅथॉलॉजीच्या ४ शाखा सुरू झाल्या. अचूक निदान ही या पॅथॉलॉजीची खासियत आहे. बऱ्याच ठिकाणी फक्त लॅब उघडलेली असते. मात्र पॅथॉलॉजिस्ट नसतात. कमी पैशांचं आमिष दाखविले जाते. येथे स्वतः डॉक्टर पूर्ण वेळ असतात, प्रत्येक रिपोर्ट त्या तपासतात. नमुना घेण्यासाठी वेगळे दालन आहे. रुग्णांचे शंकानिरसन हे समोरासमोर बसून केले जाते. जेणेकरून रुग्ण मोकळेपणाने बोलू शकतील, सांगू शकतील. घरी जाऊनही नमुना घेतले जातात. कोरोना काळात तर त्या स्वतः व त्यांची टीम सतत पीपीई किट घालूनच काम करायच्या. पूर्वा यांना त्यांच्या टीमचा सार्थ अभिमान असल्याचे त्या सांगतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येत असतात. तसेच डॉ. पूर्वा यांच्यासाठी ही लॅब सुरू होणे हा खूप आनंदाचा क्षण होता. कारण त्याला फक्त कष्टाची झालर नव्हती, तर वैयक्तिक पातळीवर आलेल्या संकटाचा सामना करीत दिलेल्या धैर्याचे ते चीज होते. काही रुग्ण त्यांचे अनुभव सांगतात, ‘आम्ही रात्री रिपोर्ट येण्याची वाट बघत जीव मुठीत घेऊन बसलो होतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणेच रात्री १ वाजता देखील रिपोर्ट पाठविलात. याला म्हणतात शब्दाला जागणे.’
रुग्णांनी स्वतः केलेलं कौतुक, दाखविलेला विश्वास यामुळे पुढच्या कामाला बळ मिळते. अनेक तणावग्रस्त, भीतीग्रस्त रुग्णांशी बोलून, हिम्मत देऊन वैयक्तिक पातळीवर समुपदेशन करण्याचे कामही पूर्वा यांनी केले आहे. कोविड तपासणीची परवानगी मिळाल्यामुळे एकीकडे गर्दीही वाढत होती, तर दुसरीकडे टीममधल्या एकेकजण कोरोना बाधित होत होता, त्यांच्यासाठी खरी तारेवरची कसरत होती. दिवसरात्र मेहनत, टीमला सांभाळणे, एकमेकांना धीर देणे, रुग्णाची परिस्थिती समजणे, शिवाय तपासणी अहवाल अचूक देणे आणि वैयक्तिक दुख: बाजूला ठेवून हे सगळं करणे हे निश्चितच वाखणण्याजोगं आहे. अशा प्रकारे प्रगती करीत असताना डॉ. पूर्वा यांचे एकच उद्दिष्ट होते ते म्हणजे लोकांना विश्वास वाटेल अशी उत्तमोत्तम सेवा द्यायची. या पॅथॉलॉजीमध्ये तपासणीसाठी अचूकता आणि दर्जाला प्राधान्य दिले जाते. विश्वासार्हता जपली जाते. या सगळ्यामुळेच सुरू होऊन वर्षभरातच नॅशनल अक्रेडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन या मान्यताप्राप्त संस्थेची मान्यता मिळविणारी ‘स्वानंद’ ही डोंबिवलीतील पहिली लॅब ठरली. डॉ. पूर्वा यांनी डॉक्टर या नात्याने सामाजिक भानदेखील जपले आहे. आरोग्याविषयी जागरूकता वाढावी याकरिता त्यांचे अल्पदरात आरोग्य तपासणी शिबीर सुरू असतात. वेगवेगळ्या ठिकाणी मासिक पाळी स्वच्छता, थॅलॅसेमिया यासारख्या विषयांवर व्याख्यान देतात, कार्यशाळा घेतात. महिलांसाठी, संपूर्ण कुटुंबासाठी एवढंच नाही तर ‘विवाह पूर्व आरोग्य तपासणी’सारखे पॅकेजेस लॅबमध्ये उपलब्ध आहेत.
‘स्वानंद’ म्हणजे स्वतःमधला आनंद. डॉ. पूर्वा यांच्यासाठी हा आनंद सेवा देण्यात आहे. आभाळाएवढं दुःख उराशी बाळगून आपल्या रुग्णांना पॅथॉलॉजीच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. पूर्वा राणे-चौधरी एक प्रेरणादायी ‘लेडी बॉस’ आहेत.