Sunday, May 19, 2024
Homeमहत्वाची बातमीभारतामध्ये उद्योगांच्या सहाय्याने महासत्ता बनण्याची क्षमता; नारायण राणे यांचा विश्वास

भारतामध्ये उद्योगांच्या सहाय्याने महासत्ता बनण्याची क्षमता; नारायण राणे यांचा विश्वास

मुंबई (प्रतिनिधी) : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या मदतीने आत्मनिर्भर होऊन महासत्ता बनण्याची क्षमता भारतामध्ये आहे, असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. ‘फ्यूएलिंग इंडिया – २०२२’ या स्टार्ट-अप वित्तपुरवठा संबंधित परिषदेत ते शुक्रवारी मुंबईत बोलत होते. देशाला महासत्ता बनवण्याचे सामर्थ्य सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे या उद्योगांमध्ये अधिकाधिक वाढ व्हावी, या दृष्टीने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे यावेळी नारायण राणे यांनी सांगितले. देशाच्या एकूण निर्यातीत एमएसएमई क्षेत्राचा वाटा वाढवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातही या उद्योगांचा वाटा वाढवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे, असे राणे म्हणाले.

आपला देश आत्मनिर्भर भारत व्हावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असून देशातील तरुणही या दिशेने काम करत आहेत. या बळावर आपण आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करू, असे राणे यावेळी म्हणाले. राष्ट्रीय लघू उद्योग महामंडळाचे अध्यक्ष पी. उदयकुमार, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर अफर्मेटिव्ह अॅक्शनचे उपाध्यक्ष सुनील सिदे यावेळी उपस्थित होते. पी. उदयकुमार यांनी ऊर्जा क्षेत्रात नवी लाट निर्माण करणाऱ्या नवोदित उद्योजकांची प्रशंसा केली. बहुतेक स्टार्ट-अप माहिती तंत्रज्ञान आणि आर्थिक तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातले आहेत. मात्र आता ऊर्जा क्षेत्रासारख्या इतर विविध क्षेत्रांमधून अनेक स्टार्ट-अप येत आहेत. एमएसएमई उद्योगांसाठी सकारात्मक कार्यक्षेत्र निर्माण करणे हे आमचे काम आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही एमएसएमई क्षेत्रात विविध बदल केले. त्याचा या उद्योगाला लाभ मिळाला आहे. कोविडच्या काळातही देशातील एमएसएमई क्षेत्र टिकून राहिले, असे त्यांनी सांगितले.

“भारतीय एमएसएमई क्षेत्र देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनामध्ये सुमारे २९ टक्के आणि भारताच्या निर्यातीत ५० टक्के योगदान देते. सरकारने एमएसएमईला पाठबळ देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यवस्था तयार केली आहे आणि म्हणूनच आपण अनेक तरुणांना त्यांच्या व्यवसायात पुढे जाताना बघत आहोत, असे सुनील झोडे यांनी बोलताना नमूद केले. यावेळी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रेपोज पे – एक ‘फिरते इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा’ मंचाचा प्रारंभ केला. या माध्यमातून कोणीही अॅपच्या माध्यमातून फिरते इलेक्ट्रिक चार्जिंग वाहन मागवू शकतात आणि त्यांची वाहने चार्ज करू शकतात. ‘फि-गिटल’ या फिनटेक मंचाचा देखील प्रारंभ मंत्र्यांनी केला. हा मंच तंत्रज्ञानाद्वारे इंधन ग्राहकांना (आता खरेदी करा आणि नंतर पैसे द्या.) ही पतसुविधा उपलब्ध करून देईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -