Wednesday, May 15, 2024
Homeदेशफिफाकडून भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी

फिफाकडून भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय फुटबॉलला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे नाराज होत असल्याचे कारण देत फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली आहे.

भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. फिफाने निलंबन केल्यामुळे, भारत यापुढे फुटबॉलचा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नाही. महिलांची अंडर १७ विश्वचषक स्पर्धा येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात होणार होती. आता ही स्पर्धा नियोजित वेळेनुसार भारतात होऊ शकत नाही, असे फिफाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

राष्ट्रीय संघटनेचे सदस्य हे सरकार आणि न्यायपालिकेच्या हस्तक्षेपापासून मुक्त राहिले पाहिजेत, अशी ‘फिफा’ची भूमिका आहे. त्यामुळे एआयएफएफ (ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन) ने आपली कार्यकारिणी जाहीर केली तरच हे निलंबन मागे घेण्यात येईल, असे फिफाने म्हटले आहे. २०१७ मध्ये ‘फिफा’ने पाकिस्तान फुटबॉल महासंघाला निलंबित केले होते. न्यायालयाने प्रशासक नेमल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई झाली होती.

भारतीय फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल कार्यकाळ संपल्यानंतरही पदावर राहिले. तेव्हापासून सर्व गोंधळाला सुरुवात झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने पटेल यांना पदावरून हटवत महासंघाचे प्रशासकीय मंडळ बरखास्त केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे फिफाने आपल्या नियमांची पायमल्ली म्हणून बघितले आणि एआयएफएफवर निलंबनाची कारवाई केली.

“भारतावर बंदी आणणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. हा एक कठोर निर्णय आहे. मात्र, खेळासाठी योग्य यंत्रणा बसवण्याची हीच उत्तम संधी आहे”. भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र येणे आणि योग्य यंत्रणा बनवणे महत्त्वाचे आहे. “भारतीय महासंघ आणि राज्य संघटना यांनी एकत्र येऊन व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी काम करावे. प्रत्येकाने भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी काम करावे.” – बायचुंग भुतिया, भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -