सिंहावलोकन १९७१ च्या ऐतिहासिक विजयाचं

Share

अनिल आठल्ये , कर्नल (निवृत्त)

भारत-पाकिस्तान युद्धाला आज ५० वर्षं झाल्याच्या निमित्ताने

१९७१च्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या युद्धाला ५० वर्षं पूर्ण होत असताना या युद्धात नेमकं काय घडलं, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. इतर कोणत्याही शास्त्राप्रमाणे सामरिक शास्त्राचेही स्वत:चे नियम आणि मापदंड आहेत. सामरिक शास्त्राबद्दल आर्य चाणक्याने बरंच काही लिहून ठेवलं आहे. कूटनीती, आर्थिक, सामाजिक, मनोवैज्ञानिक आणि लष्करी अशी या शास्त्राची पाच अंगं असतात, असं त्याने नमूद केलं आहे. अगदी प्राचीन काळापासून भारत हे धर्माधिष्ठ राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. भारतावर नेहमीच धर्माचं राज्य राहिलं. हे राज्य चालवणं म्हणजे राज्यकारभार करणं, हे राजाचं कर्तव्य मानलं जायचं आणि त्यासाठी त्याला दंड देण्याचा अधिकार होता. दंड आणि धर्म या दोन टोकाच्या संकल्पना भारतात असताना इथे सामरिक शास्त्राचा विकास होत होता. युद्ध हा नेहमीच अंतिम पर्याय राहिला आहे. शांततेचे सगळे मार्ग संपल्यानंतर मग युद्धाचा पर्याय निवडला जातो. म्हणजेच साम, दाम, भेद आणि अखेरीस दंड असं हे तत्त्व आहे.

१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सामरिक शास्त्राच्या या पाचही आघाड्यांवर अत्यंत कुशल नेतृत्वाचं दर्शन घडवलं. त्यांनी सुरुवातीला जगभर फिरून आणि कूटनीती वापरून आपलं म्हणणं मांडलं आणि हे म्हणणं जगाकडून तसेच पाकिस्तानकडून मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानची नाकेबंदी करून आपलं उद्दिष्ट साध्य होतं का, हे पाहिलं. अखेरीस शेवटचा उपाय म्हणूनच त्यांनी बलप्रयोग करण्याचं ठरवलं आणि ते सुद्धा ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने देशाच्या पश्चिम आघाडीवर हवाई हल्ला केल्यानंतर…! यावेळी या युद्धात भारताच्या लष्कर, हवाईदल आणि नौदल अशा तिन्ही दलांनी अतिशय उत्तम समन्वय साधत एक प्रकारे सर्वसमावेशक अशा प्रकारची युद्धनीती आणि योजना आखल्या. त्या काळात राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसारख्या कोणत्याही संस्था अस्तित्वात नव्हत्या. असं असतानाही सॅम माणिकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सैनिकी नेतृत्वाने अशक्यप्राय कामगिरी करून दाखवली.

पूर्व पाकिस्तानमधल्या थोड्या भूभागावर कब्जा करून तिथे मुक्ती वाहिनी आणि स्वतंत्र बांगलादेशचा झेंडा रोवायचा, असं भारताचं सुरुवातीचं उद्दिष्ट होतं. कालांतराने या उद्दिष्टाचा आवाका वाढवून आसपासची छोटी शहरं काबीज करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूर्व पाकिस्तानलगतच्या छोट्या शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्याने चांगली मोर्चेबांधणी केलेली होती. त्यामुळे त्या छोट्या शहरांवर कब्जा करणं सोपं नव्हतं. तसंच त्याची खूप मोठी किंमतही मोजावी लागली असती.

भारताच्या पूर्व कमांडचे त्या वेळचे मेजर जनरल जे. एफ. आर. जेकब यांनी एक रणनीती आखली. त्या रणनीतीनुसार ही छोटी शहरं आणि त्यातलं पाकिस्तानी सैन्य यांच्यावर थेट हल्ला न करता पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांना चकवा देऊन भारतीय सैन्याने थेट ढाक्याकडे कूच करायची, असं ठरलं. जनरल जेकब यांची ही रणनीती यशस्वीही ठरली. ढाका पडलं. तिथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली. राजधानीचं शहर पडल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचं खच्चीकरण झालं. त्यांनी भारतापुढे सपशेल शरणागती पत्करली आणि भारताने मग एकतर्फी युद्धविराम जाहीर केला. या युद्धादरम्यान ९२ हजार पाकिस्तानी सैनिक युद्धकैदी झाले. पूर्व पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना तिकडे पश्चिम पाकिस्तानमध्ये काही चमकमी घडल्या. मात्र तिथे फार मोठं युद्ध झालं नाही.

१९७१च्या युद्धाचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश सर्व अभ्यासकांच्या मते लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या पूर्व आघाडीवरील सैन्याने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मेघना नदी पार करण्याच्या घटनेमुळे या युद्धाला वेगळं वळण मिळालं आणि या माध्यमातून भारतीय सैन्य थेट ढाक्यात पोहोचलं. मेघना नदीचं पात्र तीन ते चार किलोमीटर एवढं रुंद आहे. या नदीवरील पूल उडवून दिल्यानंतर भारतीय सैन्य ढाक्यात पोहोचू शकणार नाही, असा पाकिस्तानी सैन्याचा समज झाला. हा समज सैन्याने खोटा ठरवला. त्यामुळे त्या आघाडीवरील पाकिस्तानी सैन्य दुसरीकडे हलवण्यात आलं. या कृतीद्वारे पाकिस्तानी सैन्याने जणू भारतीय सैन्यासाठी ढाक्याचे दरवाजे उघडले. त्यावेळी फक्त चार ते पाच हेलिकॉप्टर्सद्वारे सगत सिंग यांनी संपूर्ण ब्रिगेड म्हणजे एक हजार सैनिक मेघना नदीच्या पलीकडे उतरवले आणि ढाक्याजवळील नारायणगंज इथे धडक दिली. भारतीय सैन्य अशा पद्धतीने ढाक्याजवळ पोहोचेल, याची पाकिस्तानी सैन्याला सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे पाक सैन्याचं मनोधैर्य पूर्णपणे खचलं आणि जनरल नियाझींनी सपशेल शरणागती पत्करण्याचं मान्य केलं.

लेफ्टनंट जनरल सगत सिंग यांनी आखलेले युद्धाचे हे डावपेच अगदी योग्य होते, यात शंकाच नाही; परंतु हेही लक्षात घेणं आवश्यक आहे की, सगत सिंगांच्या या यशात भारतीय हवाई दलाचा महत्त्वाचा वाटा होता. कारण ६ आणि ७ डिसेंबर या दिवशी भारतीय हवाई दलाने पूर्व पाकिस्तानमधले शत्रूचे सर्व हवाईतळ बॉम्बवर्षाव करून उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे सगत सिंग यांना आपलं सैन्य हेलिकॉप्टरद्वारे मेघना नदीच्या पलीकडे नेता आलं. भारतीय हवाई दलाच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानचं हवाई दल पूर्णपणे नामशेष झालं होतं. पूर्व पाकिस्तानच्या आकाशात फक्त भारतीय विमानं उडू शकत होती आणि त्यामुळे युद्धाचं पारडं मोठ्या प्रमाणात भारताच्या बाजूने झुकलं. अर्थातच, पूर्व क्षेत्रातल्या दोन्ही देशांच्या हवाई दलांच्या बलाबलाचा विचार केला, तर भारताच्या १६१ विमानांच्या तुलनेत पाकिस्तानकडे फक्त १६ एफ ८६ विमानं होती. ८ डिसेंबरपासून पूर्व पाकिस्तानच्या आकाशात भारतीय विमानांचा मुक्त संचार होता. पाकिस्तान शेवटच्या क्षणापर्यंत हेलिकॉप्टर्स वापरत होता. पण संपूर्ण युद्धभूमीवर भारतीय हवाई दलाचाच ताबा होता.

भारतीय हवाई दलाच्या कारवाईमुळे ढाक्यातली पाकिस्तानची ठाणी उद्ध्वस्त झाली. त्यामुळे भारतीय सैन्याच्या हालचालींची कोणतीही बातमी पाकिस्तानी सैन्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. याच कारणामुळे पाकिस्तानकडे सैन्याची अतिरिक्त कुमक असतानादेखील माहितीअभावी ती कुठे पाठवायची, हेच त्यांना कळत नव्हतं. याचा अर्थ असा की, भारताला हवाई दलाच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या संपूर्ण युद्धनीतीची आणि कारवाईची सगळी माहिती मिळत होती आणि पाकला भारताच्या हालचालींची कोणतीही कल्पना येत नव्हती. यामुळे पाकिस्तानी सैन्याच्या मनोबलावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आणि याच कारणामुळे पाक सैन्याने ढाका येथे शरणागती पत्करली. प्रत्यक्षात पाकिस्तानकडे अगदी १६ डिसेंबरपर्यंत पुरेल एवढं शस्त्र, दारूगोळा तसंच मोठ्या प्रमाणावर सैन्यही होतं. अशा प्रकारे जमिनीवरच्या युद्धात भारतीय हवाई दलाच्या कामगिरीमुळे भारताला खूप मोठं यश प्राप्त झालं. त्यामुळे भारताच्या १९७१च्या युद्धातल्या विजयाचं बरंचसं श्रेय हवाई दलाच्या या कारवाईला जातं, यात शंका नाही.

Recent Posts

DC Vs MI: दिल्लीने दिला मुंबईला शह, १० धावांनी जिंकला सामना

DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय…

48 mins ago

Narayan Rane : माणूस हीच जात व माणूसकी हाच धर्म : केंद्रीय मंत्री नारायण राणे

सावंतवाडीतील मुस्लिम बांधवांची भेट घेत साधला संवाद सावंतवाडी : निवडणुकीत विरोधक जाती धर्माचे राजकारण करीत…

2 hours ago

CBSE Board वर्षातून दोनदा परीक्षा घेणार; कसा असेल हा नवा नियम?

जाणून घ्या सविस्तर मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा…

3 hours ago

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण? रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED)…

3 hours ago

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam)…

3 hours ago

Shashikant Shinde : १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल!

शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…

4 hours ago