Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीभारत ठरले ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’! कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, मानसिक आरोग्य...

भारत ठरले ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’! कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, मानसिक आरोग्य समस्यांसह दीर्घकालीन आजारांची स्थिती गंभीर

अपोलो हॉस्पिटल्ससह इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चचा धक्कादायक अहवाल!

नवी दिल्ली : अनेकजण भारत हा तरुणांचा देश असल्याचे अभिमानाने सांगतात. मात्र या देशाची खरी सद्यस्थिती एका अहवालातून उघडकीस आली असून यात भारत हा ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ (Cancer Capital of the World) असा उल्लेख केला आहे. इतकेच नव्हे तर देशातील एक तृतीयांश भारतीय प्री-डायबिटीज आहेत. दोन तृतीयांश प्री-हायपरटेन्सिव्ह आहेत आणि दहापैकी एक नैराश्याचा सामना करत आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार आणि मानसिक आरोग्य समस्यांसह अशाप्रकारच्या दीर्घकालीन आजारांची स्थिती गंभीर पातळीवर पोहोचत आहे आणि देशातील लोकांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्याने आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांची झोपच उडाली आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्च (NCDIR) च्या मते, “गेल्या काही वर्षांपासून भारतात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.”

भारतीयांच्या आरोग्यासंदर्भात एका नवीन अभ्यासात चिंताजनक गोष्ट स्पष्ट झाली आहे. देशभरात कर्करोगाची प्रकरणे वाढत आहेत. परिणामी, असंसर्गजन्य रोगांचे प्रमाणही वाढत आहे. अपोलो हॉस्पिटल्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारताचे वर्णन ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ असे केले आहे.

विशेष चिंतेची बाब म्हणजे कर्करोगाच्या प्रकरणांची वाढती संख्या ही जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. प्री-डायबेटिस, प्री-हायपरटेन्शन आणि मानसिक आरोग्य विकारांचे निदान तरुण वयोगटांमध्ये होत असल्याने संभाव्य आरोग्यविषयक संकटाचा इशाराही अहवालात दिला आहे.

विविध जीवनशैली आत्मसात करणे, पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक आव्हाने, भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढण्याला कारणीभूत ठरतात. तंबाखूचा सर्रास वापर, धूम्रपान अशा दोन्ही प्रकारांमुळे फुफ्फुसाचा, तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. शिवाय, वाहने आणि उद्योगांमधून होणारे वायू प्रदूषण लोकसंख्येच्या मोठ्या भागाला कर्करोगजन्य पदार्थांच्या संपर्कात आणते, ज्यामुळे विविध कर्करोगांचा धोका वाढतो आहे, असे डॉ. चिन्नाबाबू सुंकवल्ली यांनी सांगितले. डॉ. सुंकवल्ली हे हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्स सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे क्लिनिकल संचालक आहेत.

त्याच विभागातील ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ आणि रोबोटिक सर्जन डॉ. सचिन मर्दा यांनी सांगितले की, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे आणि शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचे प्रमाण कमी होण्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण वाढते आहे. ज्याचा स्तन, कोलोरेक्टल आणि एंडोमेट्रियल कर्करोगाशी संबंध असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यासाठी हानिकारक आहाराच्या सवयी बदलण्यावर त्यांनी भर दिला.

कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरूकता नसणे आणि व्यापक प्रमाणात स्क्रीनिंग प्रोग्रामच्या अभावामुळे कर्करोगाचे लवकर निदान होत नाही. याचा परिणाम बहुतेक वेळा कर्करोगाचे शेवटच्या टप्प्यामध्ये निदान होते, ज्यामुळे यशस्वी उपचारांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते. सामाजिक-आर्थिक असमानता ही समस्या आणखी वाढवते. पुरेशा प्रमाणात जागरूकता नसणे आणि कर्करोगाला सामाजिक कलंक म्हणून पाहणे अशी कारणेदेखील कर्करोगाचे उशिरा निदान आणि उपचारांमध्ये भूमिका बजावतात.

या गुंतागुंतीच्या समस्येचा सामना करण्यासाठी बहुआयामी धोरण आवश्यक आहे. तंबाखूच्या सेवनाचे धोके आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व याविषयी लोकांना शिक्षित करण्यासाठी देश पातळीवर जनजागृती मोहिमांची आवश्यकता आहे, असा सल्ला डॉ. सुनकवल्ली यांसारख्या तज्ज्ञांनी सुचविला आहे. याव्यतिरिक्त, नियमित तपासणीस प्रोत्साहन देणे, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक शैक्षणिक मोहिमा आखल्यास कर्करोगाशी संबंधित धोका वाढवणारे घटक लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -