Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रउन्हाळ्यात बियरच्या मागणीत वाढ; बियर पिण्यात कॉलेज तरुणाई अग्रेसर

उन्हाळ्यात बियरच्या मागणीत वाढ; बियर पिण्यात कॉलेज तरुणाई अग्रेसर

नाशिक : कडक उन्हाळा म्हटले की कोणी शीतपेयाचा आनंद घेतात तर कोणी थंडी थंडी बियरचा. विशेष म्हणजे उन्हाळ्यात बियरच्या मागणीत अचानक वाढ होत असल्याचे बघायला मिळत असून कॉलेजची तरुणाई बियरकडे सर्वाधिक आकर्षित होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आले आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तर एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा हा ४५ अंशाच्याही वर जाऊन पोहोचला होता. थंडगार शहर अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये देखील एप्रिल महिन्यातच कमाल तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा आकडा पार केल्याने नाशिककर हैराण झाले होते आणि याच गर्मीत ताक, ऊसाचा रस, कोल्ड्रिंक्स खरेदी करण्याबरोबरच बियरला अधिक प्राधान्य दिल जात असल्याचे चित्र बघायला मिळाले.

नाशिक जिल्ह्यातील बियर विक्रीचा आकडा बघितला तर गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात ७ लाख ४० हजार ३१ लिटर बियरची विक्री झाली होती. मात्र यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यातील २० तारखेपर्यंतच ६ लाख ६८ हजार ३३७ हजारापर्यंत हा आकडा जाऊन पोहोचला आहे. उन्हाळ्यात बियर पिण्यास थंड वाटत असल्याने तिची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. विशेष म्हणजे एप्रिल, मे महिना हे विद्यार्थ्यांचे सुट्टीचे दिवस असल्याने या काळात पर्यटननगरी असलेल्या नाशिकमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत बियरला अधिक पसंती देतात.

यात चिंतेची बाब म्हणजे ज्या वयात महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेत मोठी स्वप्न बघायला हवीत त्याच वयातील तरुणाई बियर पिण्यात अग्रेसर असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पाहणीत समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे बियरचा अधिक खप होत असल्याने शासनाच्या महसुलात जरी वाढ होत असली तरी मात्र तरुणाईमध्ये बियरची वाढत चाललेली गोडी ही विचार करायला लावणारी आहे. कारण याच बियरचे सेवन जर अधिक प्रमाणात झाले तर हिच थंडी थंडी वाटणारी बियर अनेक आजारांना देखील निमंत्रण देऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -