Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत देशातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास योजनेचा शुभारंभ

राज्यपाल, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत भायखळा स्थानकात रेल्वेतर्फे कार्यक्रम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज देशातील अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत ५५४ रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते १५८५ रोड ओवर ब्रिजेस तसेच भूमिगत मार्गिकांच्या निर्मितीसाठी बांधकामाच्या कोनशिलांचे देखील अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचा भाग म्हणून मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित रेल्वे अधिकारी, कर्मचारी व निमंत्रितांना संबोधित करताना राज्यपालांनी भायखळा स्थानक हे मुंबईतील सर्वात जुन्या स्थानकांपैकी एक असल्याचे सांगितले. देशातील पहिली रेल्वे बोरीबंदरहून सुटल्यावर ठाणे येथे जाताना भायखळा स्थानकावर थांबली होती असा संदर्भ नमूद करून आज एकाच वेळी अनेक स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाची सुरुवात होऊन रेल्वेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशात १५८५ ओव्हर ब्रिज आणि अंडर पासेस निर्माण केल्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर होणारे अपघात तसेच वेळेचा व इंधनाचा अपव्यय कमी होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानके आणि १९२ ओव्हर ब्रिज आणि भूमिगत मार्गिकांच्या नूतनीकरणाचा या योजनेत समावेश केल्याबद्दल राज्यपालांनी केंद्राचे आभार मानले.

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके, रेल्वे उड्डाणपूल व रेल्वे अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण

महाराष्ट्रातील ५६ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तर मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देतानाच भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशात विविध क्षेत्रातील पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर व प्रचंड गतीने होत आहेत. याद्वारेच रोजगारासाठीही मोठी चालना मिळत आहे. रेल्वे यंत्रणाही वेगाने बदलत आहे. रेल्वेचा कायापालट होत आहे. रेल्वेस्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यासाठी अमृत भारत रेल्वेस्टेशन योजनेचा आरंभ करण्यात आला. या अत्याधुनिकीकरणामुळे रेल्वे स्थानक परिसरात रोजगार निर्मितीलाही मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. अमृत भारत स्टेशन योजना विरासत आणि विकास या दोन्हीचे प्रतिक आहे. प्रत्येक रेल्वेस्थानकाची उभारणी ही तेथील सांस्कृतिक, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे. या स्थानकांमध्ये दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा असतील. रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण करण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील स्वच्छता हे आज वैशिष्ट्य झाले आहे. भारतीय रेल्वे देशवासीयांसाठी ‘ईज ऑल ट्रव्हल’ झाले आहे.

भारतीय रेल्वेची अत्याधुनिक व पर्यावरणपूरक प्रणालीकडील वाटचाल अभिमानास्पद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या महानगरातून दररोज किमान ७३ लाख प्रवासी उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. एवढ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी असलेले हे एकमेव शहर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील २०५१ विविध रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजन झाले ही विशेष आनंदाची बाब असून या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांचा समावेश असून ५६ स्थानकांचा त्यात समावेश आहे.

सध्या राज्यात २२७४ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमृत भारत स्टेशन, रोड ओव्हर ब्रीज ROB आणि RUB असे २४१ रेल्वे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५६ स्थानके जागतिक दर्जाची रेल्वे स्थानके म्हणून विकसित करण्यात येणार आहेत.

देशात रेल्वे मार्गाच्या जाळ्याचे विस्तारीकरण – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिकीकरणाचे मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. देशात जम्मू काश्मीर आणि पूर्वोत्तर राज्यांसह रेल्वे मार्गाचे जाळे विस्तारले जात आहे. वंदे भारत रेल्वे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून काही दिवसात जागतिक मानकांच्या पूर्ततेनंतर या प्रणालीच्या निर्यातीसंदर्भातही विचार करण्यात येत आहे. अमृत भारत रेल्वेही यशस्वी ठरली आहे. भारतीय रेल्वे पर्यावरणपूरक होत असल्याचेही मंत्री श्री. वैष्णव यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -