Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरविरारमध्ये महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीने घेतला तनिष्काचा बळी

विरारमध्ये महावितरण प्रशासनाच्या निष्काळजीने घेतला तनिष्काचा बळी

रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने मृत्यू

संजय राणे

विरार : तनिष्का कांबळे ही विद्यार्थिनी पालिक व महावितरण प्रशासनाच्या निष्काळजी कारभाराचा बळी ठरली आहे. विरार पश्चिम-बोळींज येथील दुर्घटनेनंतर या दोघांचाही कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व कांबळे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे. या मागणीसाठी शिवसैनिकांसह परिसरातील शेकडो रहिवाशांनी या ठिकाणी उपस्थित राहून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

विरार पश्चिम-बोळींज येथील ॲब्रॉल सोसायटीत राहणाऱ्या तनिष्का कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू रस्त्यात साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरल्याने झाला होता. तनिष्का मंगळवारी सायंकाळी क्लासवरून घरी परतत असताना, ही दुर्घटना घडली होती. त्याआधी आणखी काही पादचाऱ्यांनाही अशाचप्रकारे या ठिकाणी विजेचा धक्का जाणवल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी महावितरणने या ठिकाणचा वीजप्रवाह बंद करून खंडित वीजप्रवाहाचा शोध सुरू केला आहे. मात्र महावितरणने केलेल्या खोदकामात ‘धक्का’`दायक उलगडा झाला आहे.

महावितरणने ठेकेदारामार्फत पाच ते सहा वर्षांपूर्वी रस्ता खोदून वीजवाहिनी केबल टाकली होती. नियमानुसार, किमान तीन फूट खोल खोदून ही केबल टाकणे अपेक्षित असताना, ही केबल अवघ्या अर्ध्या फुटावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वीज खंडित होऊन साचलेल्या पाण्यात वीज प्रवाह उतरला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे तनिष्काच्या शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू विजेच्या धक्क्यानेच झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र महापालिकेकडे बोट दाखवले आहे. वसई-विरार महापालिकेने या ठिकाणी केलेल्या कामादरम्यान केबलला हानी पोहोचली असल्यानेच ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. विद्युत निरीक्षक पालघर यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, याबाबतचा अहवाल त्यांच्याकडून दोन दिवसांत देण्यात येणार आहे. त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व कांबळे कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे.

वसई-विरार महापालिकेचेही दुर्लक्ष

विरार पश्चिम-बोळींज येथील मुख्य मार्गावरच हा अपघात घडला. या ठिकाणी पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या पाण्याचा निचरा करण्याकरता तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी सातत्याने पालिकेकडे केलेली होती. मात्र पालिकेने याबाबत कोणतीही पावले उचलली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महावितरणमुळे नागरिकांचा जीव धोक्यात

उघडे डीपी, जागोजागी लोंबकळणाऱ्या वीजतारा आणि जळणारे ट्रान्सफॉर्मर याबाबत सातत्याने तक्रारी करूनही महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी दखल घेत नसल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. वर्दळीच्या रस्त्यांवरून आणि जमिनीखालून या वीजतारा जात असल्याने वीज तार तुटून किंवा वीज खंडित होऊन अपघात होण्याची शक्यता असते. ही शक्यता लक्षात घेऊनच नागरिक अनेकदा महावितरणकडे याबाबत तक्रारी करत असतात. मात्र महापालिका अधिकारी आणि कर्मचारी या तक्रारींची दखल घेताना दिसत नाहीत, अशी तक्रार शिवसेना उपतालुका प्रमुख संजय राऊत यांनी केली आहे.

सदर वीज वाहिनी जमिनीखालून गेलेली होती. त्या ठिकाणी महापालिकेनही काही काम केलेले होते. त्यामुळे या केबलला हानी पोहोचलेली आहे. आपण ही केबल खणून बाहेर काढत आहोत. प्रथमदर्शनी तरी त्यात कुणाचा दोष हे सांगता येणार नाही. तपशीलात तपास केल्यावरच ते स्पष्ट होईल. -राजेशसिंग चव्हाण, अधीक्षक अभियंता, वसई

नियमानुसार तीन फूट खोदून केबल टाकणे अपेक्षित असते. विद्युत निरीक्षक पालघर यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. दोन दिवसांत त्यांचा अहवाल येईल. आम्ही वीज नेमकी कुठे खंडित झाली याचा शोध घेत आहोत. अहवालातील स्पष्टतेनंतर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. -विवेक पगार, कनिष्ठ अभियंता, महावितरण

या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून पालिकेने गटारे बांधलेली आहेत. पण अतिवृष्टी होते तेव्हा पाणी साचते. महावितरणच्या ठेकेदाराने केबल टाकताना पालिकेची परवानगी घेणे अपेक्षित होते. मात्र तशी परवानगी घेतल्याची नोंद पालिका दफ्तरी नाही. त्यांनी परस्पर हे काम केलेले होते. -प्रदीप पाचंगे, उपअभियंता, वसई-विरार महानगरपालिका

याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. पीडब्ल्यूडी आणि महावितरणकडून आपण अहवाल मागितला आहे. नेमकी कुणाची निष्काळजी आहे, हे सिद्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. -राजू माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अर्नाळा पोलीस ठाणे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -