Saturday, May 18, 2024
Homeकोकणरत्नागिरीपावसाळ्यात गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची भिस्त फक्त सुरक्षारक्षकांवर

पावसाळ्यात गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची भिस्त फक्त सुरक्षारक्षकांवर

रत्नागिरी ( वार्ताहर) : पावसाचे संकेत मिळू लागल्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स बंद झाले आहेत. त्यामुळे गणपतीपुळे या प्रसिद्ध पर्यटनस्थळावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून संपूर्ण भिस्त जीवरक्षकांवर राहणार आहे. यंदाच्या हंगामात वॉटर स्पोर्ट्समुळे गेल्या महिन्याभरात पंधराहून अधिक पर्यटकांना बुडताना वाचवण्यात यश आले होते.

कोकणातील सर्वाधिक पर्यटकांचा राबता असलेले पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे. गणपतीचे प्राचीन मंदिर आणि अथांग असा किनारा यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भक्तगण दरवर्षी गणपतीपुळेत येतात. कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षात पर्यटकांना फिरायला बाहेर पडणे शक्य झालेले नव्हते. यंदा निर्बंध उठल्यानंतर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत होती. मे महिन्यात दर दिवसाला दहा ते पंधरा हजार पर्यटकांची नोंद गणपती मंदिरामध्ये होत आहे. यावर्षी मोसमी पाऊस लवकर सुरु होईल, अशी शक्यता आहे. समुद्रही खवळलेला असून लाटांचा वेग वाढला आहे. त्यामुळे किनारी परिसरात समुद्रस्नानाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्याचे आव्हान स्थानिक प्रशासनापुढे आहे.

गेल्या काही वर्षात गणपतीपुळे किनारी बुडून मृत पावलेल्यांची संख्या चाळीसवर गेली आहे. यावर्षी प्रचंड गर्दी असल्यामुळे बुडताना वाचवलेल्यांची संख्या अधिक झाली आहे. गणपतीपुळे किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस् सुरु झाल्यानंतर पर्यटक बुडून मृत पावणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. किनाऱ्यावर जीवरक्षकांचीही नियुक्ती केली गेली आहे; मात्र खोल समुद्रात पर्यटक ओढला गेला तर नौका किंवा जेट स्कीने चालक तत्काळ पर्यटकांना सुरक्षित किनाऱ्यावर आणतात. मे महिन्यामध्ये पंधराहून अधिक पर्यटकांना वॉटर स्पोर्ट्सवाल्यांनी जीवनदान दिले आहे.

यंदाच्या हंगामात शंभरहून अधिक पर्यटकांसाठी हेच चालक देवदूत ठरले. पावसाचे संकेत मिळू लागले असून समुद्रही खवळलेला आहे. प्रशासनाने वॉटर स्पोर्ट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी २६मे पासून सुरु झाली आहे. मे महिन्याच्या सुट्ट्या अजूनही सुरुच असल्यामुळे गणपतीपुळेतील पर्यटकांचा राबता कमी झालेला नाही. गुरूवारी दिवसभरात १२ हजार पर्यंटकांनी हजेरी लावली. त्यामुळे संकटात सापडलेल्यांची सुरक्षा जीवरक्षक, किनाऱ्यावरील व्यावसायिक यांच्याच हाती राहणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -