Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीदावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार; २...

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार; २ लाख रोजगार निर्मिती होणार

महाराष्ट्रावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले गुंतवणूकदारांचे आभार

मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले असून उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज समाज माध्यमांतून दिली. याव्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत, असे सांगतानाच उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसमवेत १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. तर १८ जानेवारीला ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी महाप्रीतने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले आहेत. याशिवाय विविध उद्योगांनी १ लाख कोटींचे गुंतवणूक स्वारस्य दाखविले असून यात अर्सेलर निपॉन मित्तल तसेच सौदी, अरब, ओमान येथील उद्योगांचा समावेश आहे.

दावोस येथील महाराष्ट्र दालनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समुहांचे प्रमुख भेटले. त्यामध्ये अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी. ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मी मित्तल, लिंकस्टाईनचे युवराज यांच्याशी देखील औद्योगिक गुंतवणुकीबाबत संवाद साधण्यात आला.

फ्रेंच वाणिज्य कंपनी असलेल्या लुईस ड्रेफसचे मुख्य धोरणकर्ते अधिकारी थॉमस कौटॉडियर आणि मुख्य वित्त अधिकारी पॅट्रीक ट्रुअर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. दक्षिण कोरीयाच्या ग्योग्नी प्रांताचे गव्हर्नर किम डाँग यिओन, चेक प्रजासत्ताक स्थित विटकोविट्झ अ‍ॅटोमिका कंपनीचे चेअरमन डेव्हीड क्रोबोक यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये छोटे मॉड्युलर अणुभट्टी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधीबाबत चर्चा झाली. या करारांच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -