Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीचाळीसगावमध्ये अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर कारवाई, सहा तरुण तरुणी...

चाळीसगावमध्ये अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेवर कारवाई, सहा तरुण तरुणी पोलिसांच्या ताब्यात

आमदारांनीही केली तोडफोड, रस्ते, पाणी पुरवठ्याचे काय? चाळीसगावकरांचा सवाल

चाळीसगाव : तरुण तरुणींना अश्लील चाळ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या चाळीसगाव शहरातील U.S.Cafe या अनधिकृत कॅफेवर पोलिसांनी मंगळवारी पोलिसांनी कारवाई केली असून स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांनीही त्या ठिकाणी भेट देऊन तोडफोड करून बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या प्रवृत्तीला चांगलाच धडा शिकवला. आमदार मंगेश चव्हाण यांच्या संस्कृती आणि संस्कार रक्षक म्हणून बजावलेल्या भूमिकेचे पंचक्रोशीतून कौतुक होत असले तरी आमदार म्हणून जबाबदारी निभावणाऱ्या लोकप्रतिनिधीने कायदा हातात घेऊन तोडफोड करणे किती संयुक्तिक आहे, अशाही प्रतिक्रिया उमटत आहेत.

या संदर्भात प्राप्त माहिती अशी की, यू एस नामक या कॅफेत मूळ प्लॅनमध्ये बदल करून अनधिकृत डार्क रूम तयार करून त्या ठिकाणी तरुण तरुणींना जागा उपलब्ध करून दिली जात होती. या ठिकाणी अश्लील चाळे सुरु असावेत अशी माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी छापा टाकण्यात आला. अशी चर्चा चाळीसगाव शहरात आहे. त्यानंतर तात्काळ आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन मोहिमेत स्वतः सहभागी होत डार्क रूम उध्वस्त करून फर्निचरची तोडफोड केली. असा व्हिडीओ आणि मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. याच व्हिडीओमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांनी काय घडले, कसे घडले याविषयी भाष्य केले असून यापूर्वी देखील सदर कॅफेच्या बाबतीत तक्रारी आल्या तेव्हा तेथे त्यांनी पुढाकार घेऊन कारवाई केली होती, असेही सांगितले.

नाव कॅफे असले तरी कुठल्याही प्रकारचा चहा, नाश्ताचे पदार्थ किंवा साहित्य आढळून आले नाही. तसेच अश्लील चाळ्यांसाठी एक डार्क रूम तिथे तयार केली होती. एकूणच तरुण पिढीला चुकीच्या कृत्यांसाठी प्रोत्साहन याठिकाणी मिळत होते, असा दावा आमदार चव्हाण यांनी केला आहे. अर्थात पोलिसांनी या कारवाईत सहा तरुण तरुणींनाही ताब्यात घेतले आहे. यावरून हा डार्करूम बेकायदेशीर कृत्यासाठीच वापरला जात होता हे स्पष्ट होते.

चाळीसगाव शहरात असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नगरपालिकेच्या हाकेच्या अंतरावर हा अनधिकृत कॅफे सुरू होता, त्याकडे जर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असेल तर संबंधित नगरपालिका अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा सूचनाही आमदार चव्हाण यांनी यावेळी दिल्या. सदर ठिकाणी ६ मुलं आणि ६ मुली आढळून आल्या होत्या. खरंतर मुलगी ही कोणाच्याही घरची असेना तिच्या इभ्रतीची काळजी घेणे, तिचा सन्मान करणे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला शिकवण आहे. त्यामुळे सदर मुलींची नावे पुढे न करता त्यांच्या पुढील शैक्षणिक किंवा दुसरं काही नुकसान व्हायला नको त्याची खबरदारी म्हणून तसेच मुलांना प्रिव्हेन्शन म्हणून पोलीस प्रशासनास कारवाई करण्याचा सूचना दिल्या आहेत, असेही आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

एकूणच चाळीसगावसारख्या ग्रामीण भागातील संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या तालुक्याच्या गावात असे हीन, बेकायदेशीर प्रकार घडत असतील तर सुसंस्कृत माणसालाही चीड येणे सहज स्वाभाविक आहे. मंगेश चव्हाण हे तर अवघ्या तालुक्याचे प्रतिनिधी आहेत. त्यांना किती चीड आली असेल? या भूमिकेतून त्यांनी संतप्त होणे संयुक्तिक आहे. त्यांनी उचललेले पाऊल कर्तव्य आणि जबाबदारी म्हणून योग्यच आले तरी कायदा मंडळाचा सदस्य म्हणून कायदा हातात घेणे आणि तोडणे हे कृत्य बेकायदेशीर आहे अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. चाळीसगाव शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते, शहराचा पाणी प्रश्न अशा मूलभूत गरजा पुर्ण होण्यासाठीही आमदार म्हणून त्यांनी एव्हढीच चीड दाखवावी, अशी अपेक्षा सामान्य चाळीसगावकर व्यक्त करीत आहेत.

“माझी नागरिकांना विनंती असेल, चाळीसगाव शहरामध्ये वा परिसरामध्ये असे चुकीचे प्रकार आपल्या लक्षात येत असतील तर त्यांनी ते माझ्या निदर्शनास आणून द्यावे. लोकप्रतिनिधी म्हणून राजकारणाच्या पलीकडे जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या मीही खंबीरपणे पार पाडणार आहे. पालकांना माझी एकच विनंती असेल आपला मुलगा / मुलगी काय करताहेत याची जरा व्यवस्थित माहिती ठेवली पाहिजे. मुली पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. रोज अशा अनेक घटना घडत आहे. प्रत्येक मुलगा आणि मुलगी अशी असते असं नाही, पण एक जबाबदार पालक म्हणून आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांचे कौन्सलिंग केले पाहिजे. आजचे प्रकरण म्हणजे हे चाळीसगाव शहराला लागलेली कीड आहे. असे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत, गरज पडली तर अशा अनधिकृत बांधकामांवर जेसीबी चालवला जाईल एव्हढेच यानिमित्ताने सांगतो.” – आमदार मंगेश चव्हाण

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -