Saturday, May 18, 2024
Homeदेशमोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहायचे असेल तर… पुन्हा योगींना आणा

मोदींना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पहायचे असेल तर… पुन्हा योगींना आणा

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अमित शाहांचे आवाहन

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशात २०२२मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपाच्या मेगा सदस्यत्व मोहिमेसाठी आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शुक्रवारी लखनऊमध्ये होते. ‘जनतेला नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर २०२२ च्या उत्तर प्रदेश निवडणुकीत त्यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून पुन्हा निवडून आणावे’, असे आवाहन त्यांनी यावेळक्ष केले. एका मेळाव्याला संबोधित करताना शाह म्हणाले, ‘आम्ही उत्तर प्रदेशातील जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. परंतु यूपीला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यासाठी अजून पाच वर्षांची गरज आहे. पीएम मोदी हे देखील यूपीचे खासदार आहेत आणि जर तुम्हाला त्यांना २०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून पाहायचे असेल तर तुम्हाला २०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांना यूपीचे मुख्यमंत्री बनवावे लागेल. मला खात्री आहे की तुम्ही २०२४ मध्ये पीएम मोदींना पुन्हा संधी द्याल’.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर त्यांनी यावेळी हल्लाबोल केला. ते म्हणाले ‘अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उभारणीची तारीख भाजपाचे लोक जाहीर करणार नाहीत, असे अखिलेश यादव म्हणाले होते. पण मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्याच सरकारने रामभक्तांना गोळ्या घातल्या होत्या. पण आमच्या राजवटीत लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर तयार होणार आहे. पूर्वी यूपी अर्थव्यवस्थेत सातव्या क्रमांकावर होते, पण भाजपा सत्तेत आल्यानंतर यूपी देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे’.

‘कोरोना महामारीच्या काळात जेव्हा लोक काळजीत होते की यूपीचे २२ कोटी लोक सुरक्षित कसे राहतील, तेव्हा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उल्लेखनीय काम करत हजारो लोकांचे प्राण वाचवले. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या जास्तीत जास्त चाचण्या आणि लसीकरण करण्यात आले आहे’,असेही शाह म्हणाले.

‘सपा आणि बसपा सरकारने अनेक वर्षांपासून यूपीला त्यांचे खेळाचे मैदान बनवले होते. लोक त्यांना कंटाळून राज्यातून पलायन करत होते. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. यूपीमध्ये आता महिला रात्री १२ वाजताही दागिने घालून स्कूटी चालवू शकतात, इतक्या त्या सुरक्षित आहेत. तसेच आमच्या कार्यकाळात गरिबांना पक्की घरे आणि वीज देण्यात आली आहे’, असेही गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -