Thursday, May 2, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअपशब्द काढाल तर त्याच भाषेत उत्तर मिळेल

अपशब्द काढाल तर त्याच भाषेत उत्तर मिळेल

भाजप नेते निलेश राणे यांचा ठाकरेंसह भास्कर जाधवांना इशारा

सिंधुनगरी :  राणे कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यासाठी कणकवलीत उद्धव ठाकरेंनी सभा घेतली व राणे साहेब व राणे कुटुंबीयाबाबत अपशब्द वापरले. नारायण राणे हे आमचे दैवत असून यापुढे जर अपशब्द वापराल तर याद राखा!  असा इशारा देत ठाकरे कुटुंबातील अनेकजण ठाकरे कुटुंबप्रमुखाला सोडून गेले, ठाकरे कुटुंबीयांच्या वंशावळीवरून न्यायालयातही जबाब झाले. ठाकरे कुटुंबीयांचा इतिहास डीएनए टेस्ट करून जाहीर करावा लागेल. तर भास्कर जाधव मर्द असतील तर समोर येऊन त्यांनी बोलावे. त्याचे काळे कर्तृत्व त्यांच्याच मतदारसंघात गुहागर येथे जाऊन मी १६ फेब्रुवारीच्या सभेत जाहीर करेन, असा इशारा माजी खासदार भाजप नेते निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सिंधुनगरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे व भास्कर जाधव यांचा चांगलाच समाचार घेतला. कणकवलीतील सभा व ठाकरे यांचा जिल्हा दौरा हा केवळ राणे कुटुंबियांना शिवीगाळ करण्यासाठी होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात या जिल्ह्यासाठी, या कोकणासाठी त्यांनी काय केले याबाबत एकही भाष्य त्यांनी केले नाही. जर आमचे दैवत नारायण राणे व आमच्या कुटुंबियाबद्दल कोणी अपशब्द काढला तर त्याला जशास तसे उत्तर मिळेल, ठाकरे कुटुंबीयांचा इतिहास बाहेर काढावा लागेल, जयदेव ठाकरे, ऐश्वर्य ठाकरे, थापा ही सर्व मंडळी ठाकरे कुटुंब प्रमुख सोडून का गेली? न्यायालयातही हा वाद सुरू आहे. आपले घर सांभाळता येत नाही, अशा आपल्यावर,आपल्या कुटुंबावर व मुलांवर शंका घेतली तर चालेल का, असा सवालही निलेश राणे यांनी केला.

राणे साहेब आपले दैवत

माझ्यामुळे कोणाला त्रास झाला किंवा कोणाविरुद्ध अपशब्द काढला असे कधी घडले नाही. मात्र राणे साहेब आपले दैवत असून त्यांच्याविरुद्ध कोणी अपशब्द काढला तर तो आपण सहन करणार नाही. बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांचा नामोल्लेख करून या मतदारसंघाची परंपरा उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सांगतात, मात्र कणकवली येथील सभेतील भाषा या संस्कृतीला व या मतदारसंघाच्या परंपरेला शोभणारी नाही. यापुढे जशास तसे उत्तर मिळेल व नाईलाजाने शिव्या घालण्यासाठी सभा घ्यावी लागेल, असा इशाराही निलेश राणे यावेळी दिला.

मर्द असाल तर समोरासमोर या

भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील भाईगिरीमुळे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी जाधवांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले होते. सत्ता आल्यानंतरही त्यांना मंत्रीपद दिले नव्हते. भास्कर जाधव आमच्या कुटुंबाविरोधात यापुढे बोललात तर ते सहन करणार नाही. मर्द असाल तर समोरासमोर या, जशास तसे उत्तर मिळेल. तुम्ही मर्यादा सोडून बोललात म्हणून आम्हालाही बोलणे भाग पडले. यापुढे तुमच्या काळ्या कर्तृत्वाचा इतिहास जाहीर करण्यासाठी तुमच्याच मतदारसंघात येऊन व जाहीर सभा घेऊन जाहीर करावा लागेल, असे ही निलेश राणे यांनी आव्हान दिले. या पत्रकार परिषदेत दादा साईल, संजू परब, संजय वेंगुर्लेकर, आनंद शिरवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -