Saturday, May 4, 2024
Homeमहामुंबईसरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन : आशीष शेलार

सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात अजून कडवा संघर्ष करेन : आशीष शेलार

सत्य समोर येईलच...!

मुंबई  : अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करू लागले की, मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो, हे गेली दोन वर्षे जनता पाहते आहेच. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करून जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन. असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही. महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही. असे वक्तव्य भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी केले आहे.


महापौर किशोरी पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेक वर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्र काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले जातेय ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना मला आहे.
ज्या पत्रकार परिषदेवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच. असेही ते यावेळी म्हणाले


ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला म्हणून विधानसभेतून निलंबित केले गेले. महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वरळीतील चिमुरड्याच्या मृत्यूचा जाब सत्ताधीशांच्या विचारला, कोष्टल रोड मधील भ्रष्टाचार उघड केला, ममतादिदीं सोबतच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा अजेंडा उघड केला म्हणून आता असे खोटे गुन्हे दाखल करून जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल, तर मग यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल, तर मग तो शंभरवेळा आम्ही करू.


माझ्या पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो खोट्या कुटनितीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही, आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही. असेही शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले.


तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या विरोधात आपण अवमानकारक बोललोच नाही, असे स्पष्टीकरण मा. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिले आहे. ही त्यांची भूमिका आमचे यश असले तरी यावरून जाब विचारला म्हणून आम्हालाच दोषी ठरवले जाते आहे. त्याचेही योग्य उत्तर सनदशीर मार्गाने आम्ही देऊच. आम्ही ठाकरे सरकारसारखे असनदशीर वागत नाही आणि वागणार नाही.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -