Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीमी देखील कायदा शिकलोय, क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते - गृहमंत्री

मी देखील कायदा शिकलोय, क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते – गृहमंत्री

मुंबई : पोलीस बदल्यांतील घोटाळा उघड करताना मी सभागृहात दिलेल्या माहितीचा स्रोत उघड करणे मला बंधनकारक नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मला काही विशेष अधिकारी आहेत, असा दावा करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सभागृहात प्रत्युत्तर दिले. मी देखील थोडा कायदा शिकलो आहे. माझ्याकडे असणाऱ्या माहितीत फरक असेल. पण क्रिमिनल केसेसमध्ये कोणालाही इम्युनिटी नसते, असे सांगत दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसचे समर्थन केले. प्रोटोकॉल आणि प्रिव्हलेज मलाही माहिती आहेत. सभागृहातील सदस्यांच्या अधिकाराबाबत माझं दुमत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेली नोटीस ही आरोपी म्हणून नव्हे तर जबाब नोंदवण्यासाठी होती. राज्य गुप्तवार्ता विभागात चुकीच्या पद्धतीने फोन टॅपिंग करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती कुठून मिळाली, केवळ इतकेच पोलिसांना जाणून घ्यायचे होते. यामध्ये विरोधी पक्षनेत्यांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांना कटात गोवण्याच प्रश्नच येत नाही, असे दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेत्यांनी हा प्रश्न सभागृहात मांडला होता. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधीच एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात २४ लोकांचे जबाब नोंदवण्यात आले होते, असे वळसे-पाटील यांनी म्हटले. याच तपासासाठी देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी १६० अंतर्गत नोटीस बजावली होती. पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना आधीही नोटीस पाठवल्या होत्या, प्रश्नावलीही पाठवली होती. फडणवीस यांना त्याला उत्तर देता आले नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली. याचा अर्थ जबाब नोंदवा इतकाच होता, असेही दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस बदल्यांच्या घोटाळ्यासंदर्भातील माहिती केंद्रीय गृहसचिवांना दिली. आम्ही केंद्रीय गृहसचिवांना पत्र पाठवून तो पेनड्राईव्ह तपासासाठी देण्याची मागणी केली होती. कारण तपासासाठी सर्व धागेदोरे जुळवणे आवश्यक होते. आपल्याकडे काय माहिती आहे, चौकशीत त्याबद्दल काय उत्तर द्यायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -