Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीमी असे बोललोच नाही; शरद पवारांचा घुमजाव

मी असे बोललोच नाही; शरद पवारांचा घुमजाव

मुंबई : अदानींवर टीका करणे योग्य नाही, असे मी बोललो नाही. एक काळ असा होता, आम्ही कोणालाही टार्गेट करायचे असेल तर टाटा-बिर्ला यांचे नाव घेत होतो. टाटा यांचे देशासाठी योगदान आहे. तसेच अंबानी अदानी यांचेही देशासाठी योगदान आहे. ते लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षा मला वाटते आमच्यासमोर दुसरे विषय खूप महत्वाचे आहेत. यात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या समस्या हे विषय आहेत. या देशातील लोकांसमोर उभ्या असलेल्या अनेक समस्या आहेत. विरोधकांनी त्यावर लक्ष दिले पाहिजे. याहून जास्त अदानींवर बोलण्याची गरज आहे असे मला वाटत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका रात्रीत घुमजाव केले आहे.

पवार यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत शरद पवार यांनी अदानींवरील हिंडनबर्ग अहवाल आणि त्यावरील संसदेतील विरोधकांची जेपीसीची मागणी यावर मुलाखत दिली होती. त्यावर आज पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपाला हरवायचे असेल तर विरोधी पक्षांची एकता हवी या विषयावर आमची बैठक झाली आहे. या विषयावर पुढे जाण्यासाठी आम्ही चर्चा केली आहे. काही विषय असे होते ज्यावर वेगवेगळी मते होती. याचे परिणाम काय असतील हे देखील आम्ही मांडले आहेत असे सांगताना शरद पवार यांनी अदानींबाबतच्या वक्तव्यावरही अधिक खुलासा केला.

याचबरोबर जेपीसी मागणीवर स्पष्ट करतानाही पवार यांनी समितीच्या सदस्यांचे गणित मांडले. मी काही वेगळे बोललेलो नाही. जेपीसीची मागणी आमच्या सहकारी पक्षांनी केली, माझ्या पक्षाचे लोकही त्यात होते. परंतू जेपीसी बसविली तर त्यातील १५ लोक सत्ताधारी आणि ५ लोक विरोधकांचे असतील. यामुळे जर सत्ताधारी पक्षाचे बळ जास्त असेल तर सत्य बाहेर येईल असे वाटत नाही. त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील समिती योग्य राहिल, असे पवार म्हणाले.

हिंडेनबर्गवर टीका करताना शरद पवार म्हणाले की, या रिपोर्टमधून अदानी समूहाला टार्गेट करण्यात आल्याचे दिसते. मात्र, अदानी समूहाने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे. याआधीही अशी विधाने समोर आली आणि अनेक दिवस संसदेत गदारोळ झाला, मात्र यावेळी अदानी प्रकरणाला जास्त महत्व दिले गेले. अदानीबाबत विधाने करणाऱ्यांची पार्श्वभूमी काय?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची युती आहे. पण, आम्ही काँग्रेसच्या विचारांशी सहमत नाही, असे पवार म्हणाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -