Thursday, May 16, 2024
Homeक्रीडान्यूझीलंडकडून ‘बांगला टायगर्स’ची शिकार

न्यूझीलंडकडून ‘बांगला टायगर्स’ची शिकार

दुसऱ्या कसोटीत डावाने विजय; दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरी

ख्राइस्टचर्च : दुसरी आणि अंतिम कसोटी अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि ११७ धावांनी जिंकताना न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरी सोडवली. फॉलोऑननंतर ३९५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाहुण्यांचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. द्विशतकी खेळी साकारणारा न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला सामनावीर आणि डेवॉन कॉन्व्हेला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

पहिल्या डाव अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या वरच्या आणि मधल्या फळीतील बांगलादेशी फलंदाजांना दुसऱ्या डावात चांगली सुरुवात मिळाली. पहिल्या चार फलंदाजांनी अनुक्रमे २१, २४, २९ आणि ३७ धावा केल्या तरी त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चौथ्या क्रमांकावरील लिटन दासने मात्र एकाकी किल्ला लढवला. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी करताना पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. दासच्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, काइल जॅमिसनसह (४ विकेट) नील वॅग्नरने (३ विकेट) अचूक मारा करताना मधली फळी मोडीत काढली. मधल्या फळीत नरूल हसनचे सर्वाधिक ३६ धावांचे योगदान राहिले.

महत्त्वाची बाब म्हणजे, कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरने बांगलादेशच्या डावातील शेवटची, दहावी विकेट टिपत संघाला विजय मिळवून दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीला यशस्वी पूर्णविराम दिला. त्याने केवळ ३ चेंडू टाकले त्यातच त्याने शेवटची विकेट मिळवली. हा त्याची कसोटी कारकिर्दीतील ही केवळ तिसरी विकेट आहे.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने ६ विकेट गमावून ५२१ धावांवर पहिला डाव घोषित केला. कर्णधार टॉम लॅथमने (२५२ धावा) शानदार द्विशतक झळकावले. त्याला डेवॉन कॉन्व्हेची (१०९ धावा) सुरेख साथ लाभली. किवींच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद केले तरी टॉम लॅथमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. डेवॉन कॉन्व्हे मालिकावीर ठरला.

दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी बांगलादेशने जिंकल्यानंतर न्यूझीलंडने दुसरी कसोटी जिंकत हिशेब चुकता केला. न्यूझीलंडच्या भूमीवर त्यांनाच पराभूत करत बांगलादेशने यजमानांना धक्का दिला होता. पण दुसऱ्या कसोटीत ‘टेस्ट चॅम्पियन्स’नी दमदार खेळ करत संघाला एकतर्फी मोठा विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशी खेळाडूंना न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत अवघ्या तीन दिवसात धूळ चारली.
………….

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -