Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यपाण्याची बाटली कितपत सुरक्षित?

पाण्याची बाटली कितपत सुरक्षित?

वृषाली आठल्ये

शाळा म्हटली की गणवेश, दप्तर, डबा आणि वॉटर बॅग म्हणजेच पिण्याच्या पाण्याची बाटली आलीच. यातील पाण्याच्या बाटलीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. सध्या बाजारात वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या वेगगळ्या आकर्षक रंगाच्या आणि आकाराच्या वॉटर बॅग उपलब्ध आहेत. यापैकी पाच नामांकित कंपन्यांच्या वॉटर बॅगच्या “कन्झ्युमर व्हॉइस” या संस्थेने तुलनात्मक चाचण्या (जसे की, पाणी साठवण्याची क्षमता, त्याचे बाटलीतील तपमान, किंमत) करून काही निष्कर्ष त्यांच्या वेबसाइटवर मांडले आहेत. चला पाहू या, काय आहेत हे निष्कर्ष…

वॉटर बॅग म्हणजे पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ विशिष्ट तपमानावर साठवून ठेवण्याची बाटली. ही बाटली कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सहज हाताळण्यायोग्य आणि सोबत कुठेही नेण्यासारखी सुलभ असते, जेणेकरून तहान लागल्यास त्या व्यक्तीला आयत्या वेळी पाणी उपलब्ध होते. सर्व साधारणपणे अशा बाटल्या प्लास्टिक, काच किंवा विशिष्ट धातूंवर प्रक्रिया केलेल्या साहित्यापासून तयार करतात. बहुसंख्य ग्राहक प्लास्टिकच्या बाटल्यांना प्राधान्य देतात कारण त्या वजनाला हलक्या असतात; परंतु त्यात गरम पाणी ठेवल्यास पॉलिकार्बोनेटवर प्रक्रिया होऊन ते पाणी आरोग्यास हानीकारक होते या विविध आरोग्य संघटना देत असलेल्या इशाऱ्यांकडे लोकांचे दुर्लक्ष होत असते.

कन्झ्युमर व्हॉइस या संस्थेने नयासा, सेल्लो, भारत, जयको आणि मिल्टन या भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कंपन्यांच्या वॉटर बॅगचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. वॉटर बॅगच्या पॅकिंगला खूप महत्त्व असते. राष्ट्रीय मानकानुसार प्रत्येक बॅगवर उत्पादकाचे नाव, पाणी साठवण्याची क्षमता, रिसायकलिंग म्हणजे पुनर्प्रक्रियेचा शिक्का आणि गुणवत्तेचा ठसा आवश्यक असतो. मात्र या पाचपैकी एकाही कंपनीने बॅच क्रमांक आणि गुणवत्तेचा (आयएसआय) शिक्का मारलेला नाही. केवळ मिल्टन कंपनीनेच उत्पादन कसे वापरावे, याची मार्गदर्शक माहिती उपलब्ध केली आहे.

उत्पादनाच्या बाबतीत सेल्लो कंपनीने प्रथम, तर मिल्टनने दुसरा क्रमांक पटकावला. भारत आणि जयको कंपनीच्या बाटल्यांच्या कडांना धार असल्याचे दिसून आले. या बाटल्यांची पाणी साठवण्याची क्षमता ५००, ७५० किंवा १००० मिलीलिटर असणे अपेक्षित आहे पण सेल्लो आणि मिल्टन कंपन्यांच्या बाटल्या हे निकष पूर्ण करत नाहीत. उर्वरित कंपन्यांची पाणी साठवण्याची क्षमता अधिक असल्याचे आढळून आले. सर्व कंपन्यांची झाकणे उत्तम दर्जाची असल्याचे दिसले. पाचही कंपन्यांनी बाटलीसोबत ती पकडण्यासाठी किंवा टांगण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोऱ्या उत्तम प्रतिच्या वापरलेल्या आढळल्या. राष्ट्रीय मानकानुसार अशा बाटल्यांमध्ये साठवलेल्या पाण्याला ७२ तासांपर्यंत कोणताही वास येता कामा नये अथवा त्याची चव बदलू नये तसेच ते पाणी आरोग्यास अपायकारक होऊ नये. सर्व कंपन्यांची उत्पादने या निकषावर खरी उतरली. कोणत्याही कंपनीच्या बाटलीमध्ये बुरशी किंवा किटाणू आढळले नाहीत. त्याच प्रमाणे कोणत्याही उत्पादनामध्ये पाण्याची गळती आढळली नाही. ठरावीक उंचीवरून या बाटल्या जमिनीवर सोडल्यास त्यांना तडा जातो किंवा कसे याचीही चाचणी घेण्यात आली. त्यात भारत आणि जयको यांची उत्पादित बाटली आडवी सोडल्यास त्यांना तडा जात असल्याचे आढळून आले.

या चाचण्यांमधील सर्वात महत्त्वाची चाचणी पाण्याच्या तपमानासंबंधी घेण्यात आली. त्यासाठी या बाटल्यांमध्ये १० डिग्री अंश सेल्सिअस तपमानाचे पाणी भरून ते १ तासासाठी आणि सर्वसामान्य तपमानात (ज्याला रूम टेंपरेचर म्हणतात) ३ ते ५ तासांसाठी ठेवण्यात आले. या चाचणीत भारत कंपनीच्या बाटलीतील पाण्याचे तपमान अवघ्या ०.५ अंश डिग्रीने वाढल्याचे दिसले, तर त्या खालोखाल नयासा (१ अंश डिग्री) आणि जयको (१.५ अंश डिग्री) यांचा क्रमांक लागला. मिल्टनच्या उत्पादनात सर्वाधिक (४ अंश डिग्री) जास्त, तर सेल्लोमध्ये ३ अंश डिग्रीचा फरक आढळला.

संस्थेचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे

या सर्व चाचण्या भारतीय गुणवत्ता मानंक IS : 8688-2004. IS: 9845 IS: 2798 नुसार मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत घेण्यात आल्या. या बाटल्यांमध्ये साठवण्यात आलेल्या पाण्याच्या तपमानातील बदलासाठी भारतातील उन्हाळ्यातील सर्वसाधारण तपमान गृहित धरण्यात आले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बाटल्यांमध्ये ७२ तास पाणी साठवल्यानंतरही पाण्याचा रंग, वास, चव यात कोणताही फरक आढळला नाही तसेच त्यात कोणत्याही प्रकारचे शेवाळे, बुरशी किंवा किटाणू आढळले नाहीत. अशा बाटल्यांचा उपयोग मुख्यत्वे शालेय विद्यार्थी करतात हे लक्षात घेता, सर्व उत्पादने निकषांवर खरी उतरली. केवळ भारत आणि जयको यांची उत्पादने ड्रॉप टेस्ट म्हणजे ठरावीक उंचीवरून सोडल्यास तडा गेल्यामुळे अपात्र ठरली. एकूण परिक्षणात नयासा कंपनीने प्रथम क्रमांक पटकावला, तर त्या खालोखाल सेल्लो आणि भारत कंपन्यांनी चांगली कामगिरी केली. जयको कंपनीने चौथा क्रमांक मिळवला, तर मिल्टन कंपनी पाचच्या क्रमांकावर आली.

याबाबतची अधिक माहिती Home / Department of Consumer Affairs / Ministry of Consumer
Affairs Food and Public Distribution / Government of India या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -