Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसारे कसे शांत शांत...

सारे कसे शांत शांत…

डॉ. वीणा सानेकर

आटपाट नगराची गोष्ट तशी मोठी आहे. ती सहज संपणारी नाही. राज्यात मराठीचा जयघोष करणारा वासुदेव एकीकडे दारोदारी दान मागत होता. प्रजेला आपण मराठी बोलतो आहोत हेच भाग्य मोठे वाटत होते. ती समरसून गात होती.

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’

काळ बदलत होता. नवे वारे जोरात वाहत होते. हे वारे जागतिकीकरणाचे होते. कुणाला कुणासाठी थांबायला, विचार करायला वेळ नव्हता. जो-तो धावत होता. पळे पळे कोण पुढे पळे तो… असे दृश्य होते. ज्याला त्याला केवळ जिंकायचे होते. कुणाला सत्ता, कुणाला पैसा, कुणाला यश, सारी गणिते चुटकीसरशी सोडवण्यात सगळेच मग्न होते. अशा सर्व वातावरणात भाषेसाठी लढणारे कार्यकर्ते उभे राहिले. मुळात अनेकांच्या लेखी ही लढाई निरर्थकच होती, पण कार्यकर्ते जिद्दी होते. ते हार मानेनात. त्यांनी एक वेगळाच मुद्दा चर्चेत आणला. राज्यात आरोग्यापासून पर्यटनापर्यंत अनेक विभाग होते. नव्हता तो केवळ भाषा विभाग! कार्यकर्त्यांनी हा मुद्दा लावून धरला नि आटपाट नगराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने भाषा विभाग आकारालाही आला. आता आपल्या भाषेचा विकास करण्याच्या अनेक दिशा विकसित होणार. आता आपल्या भाषेला तिचे सर्व हक्क मिळणार.

कार्यकर्ते स्वप्ने रंगवू लागले. राज्याचे भाषाधोरण अमलात येणार. त्यानुसार मराठीच्या जतन संवर्धनाच्या कक्षा विस्तारणार. जिल्हा, तालुका, गाव पातळीवर मराठीच्या जतनाकरिता समित्यांची स्थापना होणार. विविध विषयांतले अद्ययावत ज्ञान मराठीत येणार. एक ना दोन! कार्यकर्ते अनेक दिशांनी भाषाविकास कसा करता येईल यावर विचार करू लागले.

या विचारातून सक्षम भाषा विभागाचा प्रस्ताव साकार झाला. कार्यकर्त्यांनी तो राजाला सादर केला. त्याला देखील वर्षे झाली. प्रस्ताव मात्र पडून राहिला. आटपाट नगरीचा राजा बदलला. मंत्री बदलले. मंत्र्यांचे पदाधिकारी बदलले. पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत काम करणारे देखील बदलले. सर्वांचे सल्लागार बदलले. भाषा सक्षम करण्याकरिता अस्तित्वात आलेल्या सर्व यंत्रणांच्या पातळीवर बदल करणे सुरू झाले. अध्यक्ष बदलले, संचालक बदलले, सचिव बदलले. माणसांचे चेहरे बदलत होते. एका विभागातली माणसे दुसरीकडे शिरत होती. काहींच्या पात्रतेबाबत कुणालाही शंका नव्हती. कारण ती म्हणे फारच प्रसिद्ध होती. अशा माणसांना राज्यात विविध विभागांशी निगडित जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, जणू राज्यात सक्षम माणसांचा तुटवडा होता.

मायभाषेला बळ देण्याकरिता खरे तर भाषा विभाग अस्तित्वात आला होता. पण भाषा विभागाचे त्याच्या अंतर्गत यंत्रणांकडे कितीसे लक्ष होते? या यंत्रणांच्या पदांवर विराजमान अधिकारी वर्गाच्या नियुक्तीकरिता कोणते नियम होते? भाषाविषयक अमुक संस्थेच्या अमुक पदाकरिता तमुक माणसाची नियुक्ती करण्याकरिता निकष काय?

मराठी साहित्यातील मराठीविषयक विद्यावाचस्पती पदवी, मराठी अध्यापनाचा काही एक वर्ष अनुभव, प्रथम श्रेणीतील भाषाविषयक गुणवत्ता, संस्कृत, मराठीतील संशोधन संपादनाचा सखोल अनुभव, हे असे निकष हळूहळू बाद झाले.

निकष म्हणजे तुमची ओळख आहे का थेट राजवाड्यात? किंवा मग प्रसिद्धीचे देखावे किती जमतात तुम्हाला? नसली समजा राजवाड्यात थेट ओळख तर राजांच्या पदरचे कुणी ओळखतात का आपल्याला? आहे का इतके वजन आपले की, पात्रतेचे निकषच बासनात गुंडाळून ठेवता येतील? किंवा मग राजदरबारातली माणसे विकत घेण्याची कला जमते का आपल्याला?

हे सगळे ज्यांना सोपे वाटते, अशी माणसे सहजी भाषाविषयक यंत्रणांच्या उच्चपदांवर विराजमान होऊ लागली. हे ज्यांना जमले त्यांना पदव्या, बिदव्या, गुणवत्ता यांची कसली आली आहे फिकीर? एकदा पद मिळवले की, पदव्या वगैरे केव्हाही मिळवता येतात.

भाषाविषयक यंत्रणा हळूहळू दुबळ्या होत होत्या. आतून पोखरत चालल्या होत्या. पण त्याचे सोयरसुतक कुणाला नि कशाला? जो-तो तटस्थपणे पाहत होता.

राजाचा राजवाडा भक्कम होता. दरबारात सारे आलबेल होते. भाषेचे कैवारी अधूनमधून ठामपणे बोलत होते, पण त्यांचा आवाज ऐकण्याची कुणालाही गरज नव्हती. मुळात आपल्या भाषेचे बांधकाम कच्चे राहिले, तर कुणाला काही फरक पडत नव्हता.

आटपाट नगरी स्थापन झाली, तेव्हा ध्येय वेगळी होती. नगराची भाषा सिंहासनावर राजभाषा म्हणून प्रस्थापित करायची होती. प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून आला होता. भाषा हा प्रत्येकाचा मानबिंदू होता. आता बदललेल्या आटपाट नगरात, जागतिकीकरणाच्या बाजारात सारेच विकाऊ झाले. पण याच बाजारात आपल्या भाषेला कोणी उभे केले? भाषेच्या रक्षणाची जबाबदारी कुणाला महत्त्वाची वाटेनाशी झाली. कुणा कुणाचे हितसंबंध कुठे कुठे गुंतलेले असतात, याचा नीट अभ्यास व्हायला हवा होता. कारण राजापासून मंत्र्यांपर्यंत सारेच तटस्थ! जो तो एकदम गप्प! भाषेचीही बोली लागली होती की काय?विकत घेणारे घेत होते. विकणारे विकत होते. राजापासून मंत्र्यांपर्यंत, मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सारे कसे शांत शांत!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -