Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनमुख्यमंत्री ईडीला किती काळ टाळू शकणार?

मुख्यमंत्री ईडीला किती काळ टाळू शकणार?

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर

लोकसभा निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना झारखंडच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या हेमंत सोरेन यांना ईडीच्या कोठडीत जावे लागले. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या नेत्याला थेट जेलमध्ये जावे लागले हे देशातील पहिलेच उदाहरण असावे. हेमंत सोरेन यांच्यावर ईडीने केलेली कारवाई योग्य की अयोग्य? हे न्यायालयात स्पष्ट होईल. हेमंत सोरेन यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सूडबुद्धीने झाली का? याचे उत्तर मतदारच निवडणुकीत देतील. पण एका मुख्यमंत्र्याला पदावरून पायउतार होऊन थेट कोठडीत जावे लागले, हे मोठे दुर्दैव आहे. रांचीमध्ये सत्तेवर असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या मुख्यमंत्र्यालाच जेलमध्ये जावे लागते हा फार मोठा धक्का आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या कारभाराची सूत्रे आल्यापासून ईडी, सीबीआय, आयकर विभाग अशा केंद्रीय तपास यंत्रणा तत्पर झाल्या हे वास्तव आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला, पैशाचे मोठे घोटाळे केले, मोठी बेहिशेबी मालमत्ता जमा केली, सरकारी पैशावर हात मारला आणि सत्तेच्या परिघात वर्षानुवर्षे राहून आपली घरे भरली व आपल्या परिवाराचेच कोटकल्याण केले, अशांना ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या चौकशीने धडकी भरणे स्वाभाविक आहे. ईडीने समन्स पाठवल्यानंतरही चौकशीला सामोरे जायचेच नाही, असा अहंकार किंवा मग्रुरी दाखविणाऱ्या नेत्यांवर जेलमध्ये जाण्याची पाळी आज ना उद्या येणारच आहे. हेमंत सोरेन यांच्याबाबत नेमके तेच घडले.

ईडीची चौकशी होणार म्हणून काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे नाव नुसते टीव्हीच्या पडद्यावर झळकले, तेव्हा ते स्वत:हून ईडीच्या मुंबईच्या कार्यालयात गेले होते, त्यांना ईडीने तेव्हा साधे बोलावलेही नव्हते. ईडीचे समन्स आल्यानंतर राजकारणी चौकशीला सामोरे जातात, कधी कधी वेळ मागून घेतात. मग हेमंत सोरेन व अरविंद केजरीवाल हे दोन मुख्यमंत्री ईडीचे समन्स टाळून काय मिळवत होते? हेमंत सोरेन यांना ईडीने तब्बल दहा वेळा समन्स पाठवले, तर अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाच वेळा समन्स पाठवले. मुख्यमंत्रीपद हे राज्याचे सर्वोच्च अधिकाराचे घटनात्मक पद आहे. मग ईडीचे समन्स टाळून मुख्यमंत्री किती काळ पळ काढणार? एक मुख्यमंत्री आता जेलमध्ये गेला, आता दुसरे मुख्यमंत्री कशाची वाट पाहात आहेत? दिल्लीचे उपमुख्यमंत्री असलेले मनीष सिसोदिया गेल्या वर्षभरापासून ईडीच्या कारवाईनंतर जेलमध्ये आहेतच. तसेच आम आदमी पक्षाचे अन्य दोन मंत्रीही जेलची हवा खात आहेत.

ईडीचे समन्स आले असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन कुठे बेपत्ता होते, कुणाबरोबर होते, रांचीला परत कसे आले, त्यांनी राजशिष्टाचाराचे उल्लंघन केले काय? असा रांचीच्या उच्च न्यायालयात हेबिअस कोर्पस अॅड. राजीव कुमार यांनी दाखल केला आहे. हेमंत यांच्या दिल्लीच्या घरात ईडीला ३६ लाख रुपये मिळाले ते कोठून आले? असाही प्रश्न विचारला जात आहे. २७ जानेवारी २०२४ ला मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले, २९ जानेवारीला ईडीचे पथक त्यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले पण ते तेथे नव्हते. ३० जानेवारीला हेमंत रांचीमधील सरकारी निवासस्थानी प्रवेश करताना दिसले. ईडीने ८ ऑगस्ट २०२३ पासून २७ जानेवारी २०२४ पर्यंत हेमंत सोरेन यांना दहा वेळा समन्स पाठवली. बनावट कागदपत्रे करून शेकडो एकर जमिनीची सौदेबाजी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अनेक अधिकारीही आरोपी आहेत. नगर परिषदेने या प्रकरणी एफआयआर नोंदवलेला आहे. रांची येथील तत्कालीन कमिशनर नितीन मदन कुलकर्णी यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ईडीला अनेक पुरावेही प्राप्त झाले आहेत.

बिहारपासून आदिवासी प्रदेश वेगळा करून झारखंड हे स्वतंत्र राज्य असावे, या मागणीसाठी केलेल्या संघर्षातून झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना झाली. १९५० मध्ये झारखंडच्या निर्मितीच्या मागणीसाठी झारखंड फॉर्मेशन पार्टी लढा देत होतीच. आदिवासींची वेगळी ओळख आणि आदिवासी अस्मिता अशी तेथील जनतेला भावनिक साद घालत आंदोलने चालू होती. अविभाजित दक्षिण बिहारमधील आदिवासी व बिगर आदिवासी यांची ओळख झारखंडी अशी व्हावी, म्हणून झारखंड फॉर्मेशन पार्टी सर्वांमध्ये एकजूट करीत होती. या पक्षाने १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत ३२ जागा जिंकल्या होत्या. नंतर राज्य पुनर्गठन आयोगाला स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी पत्रही दिले. पण आयोगाने ही मागणी तेव्हा फेटाळून लावल्यानंर या पक्षाची लोकप्रियता झपाट्याने घसरली.

१९६३ मध्ये झारखंड फॉर्मेशन पार्टीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्यात आले व त्यानंतर मतभेद व गटबाजीला उधाण आले. पुढे शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाचा उदय झाला. त्यातून झारखंड मुक्ती मोर्चाकडे लोक आकर्षित झाले. शिबू सोरेन व बाबुलाल मरांडी या दोन नेत्यांत मतभेद झाल्याने झारखंड मुक्ती मोर्चाचेही नंतर विभाजन झाले. १९९७-९८ मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाने लालू यादव यांच्या राजदला समर्थन दिले व तेव्हापासून झारखंड मुक्ती मोर्चाने निवडणुकीच्या राजकारणात राजदला बरोबर घेतले.

हेमंत सोरेन यांचे वारसदार म्हणून आलेले मुख्यमंत्री चंपई सोरेन हे कोणी शिबू सोरेन यांचे नातेवाईक नाहीत. पण पक्षाच्या स्थापनेपासून ते सक्रिय आहेत व शिबू यांचे निष्ठावान सहकारी आहेत. वयाने ६७ वर्षाचे चंपई सोरेन हे दहावी उत्तीर्ण आहेत. पण सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले व तीन वेळा मंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये काँग्रेस व राजद हे दोन्ही पक्ष सहभागी आहेत. शिबू सोरेन यांच्या बरोबरच्या झारखंडमधील प्रत्येक आंदोलनात चंपई सोरेन हे सक्रिय राहिले, म्हणूनच लोक त्यांना झारखंडचा टायगर म्हणतात. चंपई सोरेन हे शिबू यांना ‘गुरुजी’ म्हणतात. “गुरुजी आमचे आदर्श आहेत, मी त्यांचा शिष्य आहे”, असे ते अभिमानाने सांगतात.

चंपई सोरेन यांनी सरकार स्थापनेचा दावा करताना राज्यपालांना दिलेल्या पत्रावर विधानसभेतील ४३ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी त्यांना दहा दिवसांची मुदत दिली आहे. चंपई मुख्यमंत्री झाले असले तरी सोरेन परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल राहील, अशी स्थिती आहे. अंगावर सैल शर्ट-पँट घालणाऱ्या व पायात चपला घालणाऱ्या चंपई यांची ‘गुरुजींचा हनुमान’ म्हणून दुसरी ओळख आहे. झारखंडच्या विधानसभेत ८१ आमदार आहेत. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे २९, काँग्रेसचे १७, राजद १, सीपीआय एमएल १ अशी सत्तारूढ आघाडी आहे. विरोधी बाकांवर असलेल्या एनडीएमध्ये भाजपा २६, राष्ट्रवादी काँ. (एपी) १, एजेएसयू ३ व अपक्ष २ संख्याबळ आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी ४१ हा जादुई आकडा आहे.

झारखंड राज्याची निर्मिती अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना सन २००० मध्ये झाली. गेल्या २४ वर्षांत या राज्यात बारा मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. पण भाजपाचे पहिले मुख्यमंत्री रघुबीर दास वगळता कोणालाही आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांचे नाव उत्तराधिकारी म्हणून येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. हेमंत यांची पत्नी कल्पना, त्यांची वहिनी सीता व भाऊ वसंत सोरेन हे तिघे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते. सीता व अन्य पाच आमदारांनी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून आपली नाराजी प्रकट केली होती. सीता यांनी म्हटले, “हेमंत यांची पत्नी कल्पना यांना मी मुख्यमंत्री म्हणून मान्य करणार नाही. मीच का नेहमी त्याग करायचा? हेमंत मुख्यमंत्री झाले तेव्हा मी ते स्वीकरले, पण आता कल्पना मुख्यमंत्री होणार असेल तर ते मी मान्य करू शकत नाही…”

कल्पना मुर्मू-सोरेन याचे हेमंत यांच्याशी ७ फेब्रुवारी २००८ रोज लग्न झाले. त्या पंजाबमधील कपूरथाळा येथील आहेत. बीटेक, एमबीए त्यांचे शिक्षण आहे. बाबुलाल मरांडी, अर्जुन मुंडा, शिबू सोरेन, मधू कोडा, रघुवर दास, हेमंत सोरेन, असे अनेक मुख्यमंत्री झारखंडला मिळाले. पण हे आदिवासी राज्य सतत भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजकीय अस्थिरता या भोवऱ्यात सापडले आहे.

sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -