Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यहॉस्पिटलवारी

हॉस्पिटलवारी

डॉ. मिलिंद घारपुरे

बऱ्याच दिवसांनी एक हॉस्पिटलला जायचा ‘कू’योग आला. जवळच्या मित्राच्या कुटुंबामध्ये एकाला जरा गंभीर आजार.
“हॉस्पिटल” असे म्हटले की, आता पूर्वीसारखे काही भयंकर वगैरे नाही वाटत. हेही हॉस्पिटल तसेच, अत्याधुनिक, पॉश वगैरे. अवाढव्य हवेशीर लखलखित लॉबी. झूळझूळीत येणाऱ्या गाड्या आणि अँबुलन्स. चकचकीत फरश्या, रिसेप्शन काऊंटरवर देखण्या स्वागतिका, फरक एवढाच त्या फक्त पांढऱ्या एप्रन मधल्या.

भेटीच्या वेळेची वाट बघत एक फेरफटका. स्वागतकक्षात समोर टीव्हीचे २ मोठे स्क्रीन. चालू जाहिराती, आधुनिक शल्य तंत्रज्ञानाच्या, नवीन औषधांच्या. हॉस्पिटल, डॉक्टर्स किती तुमची पोटतिडकीने काळजी (???) घेतात त्या सांगणाऱ्या. शेजारी मेडिकल पॅकेज दाखवणारी रेट कार्ड्स. गळ्यात स्टेथोस्कॉप अडकवून तरातरा चालणारे डॉक्टर, मागे फिरणारे विद्यार्थी आणि परिचारक.

एका कोपऱ्यात चक्क दोन एटीएम मशीन. औषधांचे मोठे अद्ययावत दुकान. चहा-कॉफीचे खाऊ पिऊचे २-३ काऊंटर. हॉस्पिटलचे स्वतःचे कॅन्टिन आवारातच अजून एक कॅन्टिन, ज्यूस काऊंटर, झेरॉक्स मशीन… सगळीकडे मॉलसारखी कोडिंग सिस्टीम. code सांगा, पैसे रुग्णाच्या बिलात आपोआप ॲड…

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेडिकल इन्शुरन्स पेपर कसे भरावेत??? मेडिकल इन्शुरन्स नाकारला जाऊ नये म्हणून त्याला मदत करणारा एक स्वतंत्र काऊंटर… उद्देश काय, तर सगळी अगदी सगळी सगळी सोय व्हावी रुग्णाची नातेवाइकांची… त्यांना शक्यतो कमीत कमी त्रास व्हावा, बाहेर कुठे लांब जायला लागू नये. म्हणून केलेल्या सगळ्या सोयी.

फार कशाला… एका कोपऱ्यात व्यवस्थितपणे एक देखणा ‘विघ्नहर्ता’सुद्धा होता, छान मखरात, खोटी फळं फुलं आणि दिव्याच्या न तेवणाऱ्या समईच्या बल्बच्या प्रकाशात त्याचा चेहेरा नेहमीपेक्षा शांत होता… अगदी त्याच व्यवस्थेचा एक भाग असल्यासारखा…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -