Tuesday, May 14, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनभारतीय संसदेकडून ‘शक्ती’चा सन्मान

भारतीय संसदेकडून ‘शक्ती’चा सन्मान

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

ज्या शिव शक्तीवर हे संपूर्ण ब्रह्मांड व्यापलेले आहे, ती शक्ती म्हणजे आदिमाता, शिव जर सृष्टीच्या निर्मितीचे कारण असेल, तर शक्तीमुळे हे विश्व निर्माण झाले. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, निर्माण आणि सर्व प्रकारच्या बदलांचे कारण ही शक्तीच आहे. शक्ती हे विश्वाचे अस्तित्व आणि मुक्ती आहे.

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते
रमन्ते तत्र देवताः |
यत्रैतास्तु न पूज्यन्ते
सर्वास्तत्राफलाः क्रियाः ||
हा श्लोक भारतीय संस्कृतीत पूर्वपार म्हटला जात आहे. या श्लोकानुसार जेथे स्त्रियांची पूजा केली जाते, त्यांना मान दिला जातो, तेथे देवता आनंदाने राहतात. जेथे त्यांचा मान राखला जात नाही, तेथील सर्व कार्ये निष्फळ होतात. स्त्रियांची पूजा, त्यांचा सन्मान आणि त्यांचं अस्तित्व यावरच हे विश्व आहे. पण ज्या आदिशक्तीचे, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती यांचे पूजन या भारतात पूर्वापार होते आहे, त्याच भारतात स्त्रियांचे अनन्वित छळ सुद्धा केले जात आहेत. भारत आधुनिक झाला तरी स्त्रियांना त्रास देण्याची पद्धत आणि परंपरा मात्र अद्यापही सुरू आहे. ज्या देशाने लक्ष्मी, सरस्वतीचे पूजन केले, दुर्गेसमोर शरण गेले त्याच देशाने सावित्रीबाई फुलेंपासून दिल्ली, कोपर्डीतल्या निर्भयापर्यंतचा अत्यंत घृणास्पद, लांच्छनास्पद प्रवास पाहिला आहे. याच देशात एकेकाळी सतीची परंपरा होती, तर देवदासी याच देशात होत्या. गरिबीने अनेकांना आपल्या कोवळ्या वयात घराचे उंबराठे ओलांडायला लावले. कधी हुंड्यासाठी हक्काच्या नवऱ्याकडून छळ झाला, तर कुठे अब्रूचे धिंधवडे निघाले. स्त्री शिकली, पुढारली पण शिक्षित घराला सुशिक्षितपणाचं लेबल लावून घरात स्त्रीचा शारीरिक आणि मानसिकता छळ सुरूच राहिला. अंतराळापर्यंत झेप घेणाऱ्या स्त्रीच्या स्वतःच्या घरातल्या अवकाशात श्वास घेण्यासाठी सुद्धा होणारा कोंडमारा याचं देशाने पाहिला आहे.

हा प्रवास आणि ही कहाणी अद्याप संपली नाहीय. ती सुरूच आहे. अनेक घराचे कोनाडे मुसमुसत आहेत. अनेक घरांच्या बंद खोल्यांमध्ये कित्येक हुंदके दबले आहेत. घुसमट सुरूच आहे. कारण या हुंदक्यांचे रूपांतर स्वच्छ, स्पष्ट आवाजात करणारी ताकद अद्यापही म्हणावी तशी पाठीशी नव्हती. अनेकजणी शिकल्या, पण खूप मोजक्या जणींनी समाज, संघटन याच्याविरुद्ध आवाज उठवला आणि स्वतःच अस्तित्व निर्माण केलं. हे करताना त्या स्त्रियांनी केलेला संघर्ष, दिलेला लढा हा स्त्रीत्वाच्या ताकदीची झलक देणारी गोष्ट आहे. आज या प्रवाहाविरुद्ध उठून उभ्या राहणाऱ्या महिला समाजासामोर, अन्य स्त्रियांसमोर आदर्श ठरल्या आहेत आणि त्यांच्याच या संघर्षाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर संसदेच्या नव्या भवनात प्रवेश करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले महिला आरक्षण बिल हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे स्पष्ट संकेत देणारे बिल ठरले आहे.

महिलांसाठी लोकसभा, विधानसभेत आरक्षण हवे ही मागणी सर्वपक्षीय महिलांची होती. त्याला मूर्त रूप आणून खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकातील महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे बिल एक माइलस्टोन बनणार आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं होतं. लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे. त्यामुळे आता लोकसभा आणि देशातील प्रत्येक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव राहणार आहे. म्हणजेच १०० पैकी ३३ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे संसद आणि विधानसभांमधील महिलांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यात महिलांचंही योगदान मोठं राहणार आहे. ही अत्यंत आशादायी गोष्ट आहे. राजकारण म्हटले की, त्यात आरोप-प्रत्यारोप हे आपसूक येतातच. पण असे असले तरीही भारताच्या आजवरच्या एकमेव असलेल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील कणखरता कोणीच नाकारू शकलेले नाही. भारतीय स्त्रीत्वाचे इंदिरा गांधी या मूर्तिमंत उदाहरण होत्या. आता असेच नेतृत्व करण्याची संधी भारतातील अनेकजणींना मिळणार आहे आणि संधीच सोने करण्याची ताकद फक्त स्त्रियांमध्येच आहे. जिथे जातील तिथे सोनं पिकवतील, असं स्त्रियांबद्दल म्हटलं जातच. अशा स्त्रिया जर भारतीय विकास प्रक्रियेत येणार असतील, तर या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे, हे निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -