डोक्याला त्रास कशाला?

सेल्फी : चंद्रकांत बर्वे

मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. रोजची आवश्यक छोटी-मोठी खरेदी स्वतःच करत असतो. गल्लीतल्या डेअरीवाल्याकडे गेलो, छान ताजं पनीर दिसलं. काय भाव? ३२० रु. किलो.

म्हटलं १०० ग्रॅम दे.

दुधाची एक पिशवी दे… त्याचे २३ रु. झाले आणि ती कोल्ड ड्रिंकची मोठी बाटली?

तिचे ५० रु. OK, मी मनातल्या मनात हिशेब केला. १०५ रु. झाले. मी २०० रुपयांची नोट व एक पाचचे नाणे हातात घेतले. म्हटलं आता तो लगेच १००ची नोट परत देईल. पण नाही. त्याने हातात कॅल्क्युलेटर घेतला. ३२० भागिले १० बरोबर ३२ अधिक २३ अधिक ५० असं गणित करून १०५ रु. मागितले. माझ्या हातात आधीच २०० रु. आणि ५ चे नाणे पाहून त्याला कौतुक वाटलं.

जवळच्या पोळी-भाजी केंद्रावर गेलो. ७ रुपये किमतीच्या ५ पोळ्या, ४० रु. सुकी भाजी आणि इतक्यात ताजे आलेलं एक ५५ रुपयांचे भाजणीच्या पिठाचे पाकीट घेतलं. मी आपलं मनातल्या मनात हिशेब करून हातात १३० रु. काढले. पण काऊंटरवरच्या मुलीने मात्र लगेच कॅल्क्युलेटर घेऊन ७ गुणिले ५ बरोबर ३५ अधिक ४० अधिक ५५ असे एकूण १३० रु. बिल सांगितले, पण माझ्या हातात आधीच १३० रु. बघून तिने स्मित केलं.

आता असे प्रकार आपण सगळेच अनुभवतो. असं काही आहे का? की आमची पिढी फार हुशार आणि ही नवी पिढी साधारण बुद्धीची? नाही अजिबात नाही! एखादा मोठा मेसेज मोबाईलवर ते आमच्या दुप्पट वेगाने टाईप करू शकतात, पण या असल्या फालतू हिशेबाकरिता ते कॅल्क्युलेटर घेतात कारण तो स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे, मग डोक्याला तो बेरीज- वजाबाकीचा त्रास कशाला घ्या?

आता चला मी माझ्या फ्लॅशबॅकमध्ये जातो. सुमारे ३०-४० वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईल क्रांती झालेली नव्हती, तेव्हा ठिकठिकाणी टेलिफोन ऑपरेटर आपलं टेलिफोन बुथ चालवत असत. बरेचदा काही अंध मंडळी हे चालवत असत. आपण नंबर सांगितला की, डायल फिरवून तो फोन लागताच आपल्या हातात देत. एका ३ मिनिटांच्या कॉलचे २५ पैसे या हिशेबाने पैसे घेत. बिल दीड रुपया झाले, आपण दहाची नोट दिली की, ती नोट हातात घेताच त्या नोटेच्या आकारावरून, त्या नोटेला स्पर्श करून ते ती नोट खरी आहे आणि कितीची आहे हे ओळखत आणि आपल्या गल्ल्यातून बरोबर पाचची एक नोट, एकेकच्या तीन नोटा व पन्नास पैशाचं नाणं ते परत देत. लॉटरी तिकीट विकणारा अंध देखील अशी नोटांची अगदी अचूक देवाण-घेवाण करत असे. आम्हाला ते जमलं नसतं मग त्यांना का जमायचं? कारण त्यांना अंधत्व असल्याने त्यांचं नकळत किंवा प्रयत्नपूर्वक इतर इंद्रियांचा अधिक चांगला वापर करण्याचे ट्रेनिंग झालं होतं. आम्हाला दृष्टी असल्याने हे बाकी गुण विकसित करण्याची आम्हाला कधी गरजच भासली नाही. आम्हीही ते करू शकलो असतो. आजच्या तरुणांना देखील साध्या बेरीज-वाजबाकीसाठी डोक्याला त्रास न देता हातातलं यंत्र त्यांना पसंत आहे.

आता आपण सहाशे वर्षे मागे जाऊ या. स्थळ : मॉरिशस. तेव्हा त्या निर्जन बेटावर ‘डोडो’ नावाचे पक्षी होते. त्यांचं अन्न बेटावर भरपूर उपलब्ध होतं, शिवाय त्या पक्षांना खाणारे प्राणी नव्हते. मग काय? त्यांचा उद्योग पोटभर खाणे, प्रजोत्पादन करणे आणि आराम करणे. त्यांना आता जोरात धावण्याची, उडण्याची गरज उरली नाही. अंड्यांच्या देखील संरक्षणासाठी आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्यांच्या पायातली, पंखातली ताकद कमी होत गेली. पुढे डच लोकांना ते बेट सापडले. त्यांनी वसाहत केली. त्यांना हा गब्दुल पक्षी खायला आयताच मिळाला. त्यांच्याबरोबर त्यांनी पाळलेले कुत्रे होतेच, शिवाय बोटीतले उंदीर बेटावर उतरले. बिचारे डोडो, माणसांपासून किंवा कुत्र्यांच्या विरोधात प्रतिकार करणे सोडाच ते पळून किंवा उडून आपला जीवही वाचवू शकले नाहीत. उंदरांनीही त्यांच्या अंड्यांवर ताव मारला आणि बघता बघता जगातून डोडो हा पक्षी नामशेष झाला.

[email protected]

धरती

कथा : डॉ. विजया वाड

घरती, तुझे बाबा लग्न करतायत, दिवेकर मॅडम सोबत.” अंजली हलकासा धक्का देत म्हणाली.

“ठाऊकाय मला, शी इज माय रिप्लेसमेंट मदर.” धरतीचा स्वर कडवट होता. पुरुष लग्नाशिवाय… म्हणजे स्त्रीशिवाय जगू शकत नाहीत. १३-१४च्या वयात धरतीला कष्टाने कबूल करावे लागत होते.

“धरती, शाळा सुटल्यावर बोलू. इथेच आणि याच बाकावर.” चिठ्ठी पावली. थांबणे भाग होते. दिवेकर मॅडम विसूभाऊंना विनंती करून वर्गात शिरल्या. शाळेचे प्यून! वर्दी द्यावीच लागते ना.

“खूप रागावलीयस ना माझ्यावर?”

“नाराज आहे.” धरती स्पष्ट म्हणाली.

“तू आता मोठी आहेस.”

“मला सगळं समजतं. आठवीच्या विज्ञानाच्या पुस्तकात सारं आहे.”

“पण बलात्कार पाठ्यपुस्तकात नसतो. “बलात्कार?” हे धरतीच्या मनोशक्तीच्या बाहेरचं होतं.

“तूच म्हणालीस, तुला सारं समजतं म्हणून सांगते, मोकळेपणानं… धरती, तुझे बाबा देव माणूस आहेत. हे तुला ठाऊक आहे ना?” “हो.” एकाक्षरी उत्तर देऊन धरती गप्प बसली.

“देशपांडे साहेब, संस्कार वर्गाला यायचे… तिथेच आमची मैत्री झाली. मोठा संशयी गं तो नराधम. कुलूप लावून जायचा शक्तिशाली.” हे धरतीला नवे होते. “बाहेरून” ओठ गच्च आवळून दिवेकर मॅडम म्हणाल्या. “विश्वास नावाची चीज आहे ना मॅडम जगात.” “अपवादात्मकच”

ऑफिसातून आल्या शोधमोहीम चालूच. तासन् तास! “कोण आलं होतं? कसं आलं होतं कबूल कर. इनक्वायरी ऑफीसर जणू.” दिवेकर मॅडम म्हणाल्या “एक दिवस चौकशी सम्राटांवर मी बरसले.” तुम्ही गेलात नि चार गुंड शिरले चौघांनी आळीपाळीने मजवर बळजोरी केली. मी ओरडले… आरोळी ठोकली. “वाचवा! वाचवा!” “इथे बळजोरी करताहेत” “मग काय झालं मॅडम.” “काय होणार?” देवमाणूस म्हणून लग्न केलं. येणारा जाणारा प्रत्येक माणूस! तीच गोष्ट… तीच तीच! तेच आख्यान, मी म्हणूनच सहन केलं एक दिवस भरदुपारी घरातून?”

“पळून गेलात?” “पोलीस कंप्लेट केलीत?” धरतीनं विचारलं कुतुहल हो!

“पळून गेले. कंप्लेंट केली, पण ती टिकली नाही!”

“पैसा? अस्थानी वापरलेला!” दात ओठ खात धरती म्हणाली. किशोरवयीन राग उसळला. धरतीचे गाल कुरवाळीत दिवेकर मॅडम गोड हसल्या. म्हणाल्या, “ज्याचा शेवट गोड ते सारे गोड! दिवेकर मॅडम बोलल्या मुलाखतीत मी स्पष्ट मिस्टर दिवेकरांना सांगितलं.मला कशाचा वीट आला होता ते” “दिवेकर सरांनी ऐकून घेतलं मॅडम?” “तुला सांगते ना! जगात सुष्ट.. दुष्ट दोन्ही प्रकारची माणसं असतात तो दुष्ट होता, पण दिवेकर साहेब मानवतावादी होते. त्यांची पत्नी वेड्यांच्या इस्पितळात! पदरी छोटं बाळ! मी राजसचा स्वीकार आनंदान केला. ते सुखी! अन् मीही सुखी…” आयुष्य सोप्पं करुन टाकणाऱ्या दिवेकर मॅडमकडे धरती बघतच राहिली.

“प्रॉब्लेम कधीच मोठा नसतो. हाऊ डु यू लुक अॅट इट इज डिफरंट…” धरती विस्मयाने बघत राहिली. दिवेकर मॅडमकडे. “तुझे बाबा देवमाणूस आहेत. आम्ही ४ वेळा भेटलो. ४ वेळा! प्रत्येक वेळी धरतीची परवानगी असेल तरचं! हीच रट लावलीय” “पण बाबा…!” “धीर झाला नसेल… गं!” “मग मी विचारते..” धरती म्हणाली. “नको नको..” बाई, घाईने म्हणाल्या.

“बाबा माझे मन दुखवायला घाबरतात.” पण मी देखील त्यांचीच लेक आहे… धरती. त्यांच्या मायेचा पाऊस माझ्या स्वप्नांची फुले फुलवीत आला आजवर.. आता माझी पाळी आहे, त्यांचे आभाळ बनायची… मी माझा होकार त्यांना कळवणार.. माझे बाबा माझे असतील आणि ही लेक त्यांची धरती त्यांच्या सुखाची धरा बनेल.