मुंबईची सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार

मुंबई : येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेवर भाजपा-शिवसेना युतीचाच झेंडा असेल, असा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपाच्या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या उद्धव ठाकरे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली.

“मागील काळात आशिष शेलार मुंबईचे अध्यक्ष असताना आपण पालिकेत मोठी मजल मारली. तेव्हाही आपण महापौर बनवू शकलो असतो. आपली पूर्ण तयारी झाली होती. पण आपल्या मित्रपक्षासाठी आपण दोन पाऊल मागे आलो. पण आता मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजपा युतीचाच महापौर बसेल. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना आणि भाजपा मिळून या निवडणुकीत आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही”, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडून काम करत नसल्याची टीका भाजपाकडून केली जात होती. त्याचा संदर्भ घेत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. “आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती दिसून आली. पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं, हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहीहंडी जोरात होती. आता गणपती, नवरात्र असे सर्व उत्सव जोरात करायचे आहेत. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत”, असे फडणवीस यावेळी म्हणाले.

“आशिषजी, तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिला आहात. त्यामुळे ट्वेंटी-ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची हे तुम्हाला माहिती आहे. हा सामना तर तुम्ही जिंकणारच आहात. पण महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे. तुम्ही फुटबॉलची अनेक मैदानं तयार केली आहेत. त्यामुळे एखादा फुटबॉल मधे आला, तर त्याला किक कशी मारायची, हे तुम्हाला माहिती आहे”, असे फडणवीस म्हणाले.

“मला विश्वास आहे की गेल्या वेळी तुम्ही जो स्ट्राईकरेट दाखवला, तो दुपटीहून अधिक होता. आपण थेट ३५ वरून ८२ वर पोहचलो. आता गेल्यावेळचा रेकॉर्ड आपण मोडला पाहिजे. यावर आपली सगळ्यांची नजर आहे”, असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेने मुंबईला केवळ भ्रष्टाचार दिला

मुंबई : मुंबईमध्ये आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली. शिवसेनेने मुंबईला केवळ भ्रष्टाचार दिला, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमात टोल, रस्ते, खड्डे आणि विकास कामांवरुन शेलारांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा आहे. देशातील अनेक राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मोठा आहे. महापालिका एवढी श्रीमंत असताना मुंबईकरांसाठी शिवसेनेने काय केले? त्यांना कोणत्या सुविधा दिल्या? असा सवाल आशिष शेलारांनी केला.

मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीसांनी दिली, राज्याच्या राजधानीत ५२ पूल नितीन गडकरींनी बांधले, कोस्टल रोडची मुहुर्तमेढ देवेंद्र फडणवीसांनी रोवली, मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र सरकारने निधी दिला, असे सांगत मुंबईच्या विकासामध्ये भाजपा नेत्यांचे योगदान शेलारांनी यावेळी सांगितले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लालबागचा राजा विराजमान झाला नाही, असेही शेलार यांनी या कार्यक्रमात म्हटले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मुंबईची सत्ता भाजपाला मिळेल, असा विश्वास शेलार यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर यांच्यासह इतर नेते कार्यक्रमाला उपस्थित होते.

“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”

“फडणवीस जहाँ खडे होते है, लाईन वहीं से शुरू”, असे म्हणत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला.

शिर्डीत दहशतवादी सापडला

शिर्डी : महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पंजाबमधील राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीत अटक केली आहे.

१६ ऑगस्टला पंजाबमध्ये पोलिस दलातील पोलीस निरीक्षकाच्या गाडीला आयईडी लावून ती उडवण्याचा कट त्याने आखला होता, असा आरोप आहे.

पंजाब एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसने एकत्र कारवाई करत राजेंदरला अटक केली आहे. आरोपीला पंजाब एटीएसच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

कॉलेज बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार तर २० विद्यार्थिनी जखमी

अथणी : अथणी येथे कॉलेज बस आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात दोन्ही वाहनांचे चालक जागीच ठार झाले. मिरज-विजापूर रस्त्यावर शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. त्यात वीस विद्यार्थिनी जखमी असून पाच गंभीर जखमींना मिरज येथे हलविण्यात आले आहे. रघुनाथ औताडे (४०) असे मयत बस चालकाचे तर मलिकसाहेब मुजावर (२३) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरज-विजापूर रस्त्यावर आज सकाळी टेम्‍पो व कॉलेज बसची समोरासमोर धडक झाली. अथणीपासून तीन किलोमीटर अंतरावर बनजवाड हायस्कूल व कॉलेज आहे. तेथे विद्यार्थिनींना घेऊन निघालेल्या या बसला हा अपघात झाला.

मिरजहून अथणीकडे प्लास्टिक पाईप भरून चाललेल्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये दोन्ही चालक जागीच ठार झाले. बसमधून ७० विद्यार्थिनी प्रवास करत होत्या. त्यातील वीस जणी जखमी झाल्या आहेत. पाच विद्यार्थिनी गंभीर असल्याने उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. अपघात स्थळी गर्दी झाली असून मदत कार्य सुरू आहे.

बसमधून विद्यार्थिनी प्रवास करत असल्याने त्यांच्या पालकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आपल्या मुली सुरक्षित असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले. मात्र दोन्ही चालक ठार झाल्याने घटनास्थळी हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

हिमाचल प्रदेशात मुसळधार; रेल्वेचा ऐतिहासिक पूल गेला वाहून; बस थोडक्यात वाचली

कांग्रा : हिमाचल प्रदेशात पावसाने हाहाकार उडाला आहे. एकीकडे चक्का नदीवरील ऐतिहासिक पूल नदीत वाहून गेला तर दुसरीकडे भूस्खलनामुळे एका बसचा ताबा सुटून ती दरीच्या टोकापर्यंत गेली. मात्र सुदैवाने बस दरीत पडण्यापासून थोडक्यात वाचली.

मुसळधार पावसामुळे पंजाब आणि हिमाचलला जोडणारा रेल्वेचा चक्की पूल वाहून गेला आहे. पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने कांग्रा जिल्ह्यातील चक्की नदीवरील हा रेल्वेचा पूल बघता बघता वाहून गेला. सुदैवाने रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. सध्याही मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलन होत असून त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली तर काही घरांचे नुकसान झाले आहे. धर्मशाला-कांगडा राष्ट्रीय महामार्गावरील साकोहमध्ये दरड कोसळल्याने रस्ता तीन तास बंद होता. जिल्हा मंडईतील नौहाळी मार्गे पदर-जोगिंदरनगर या मार्गावर डोंगरावरील दगड आणि खड्यांचा ढिगारा पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील चंबा भरमौर पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यात अडकलेली एक बस थोडक्यात बचावली. चंबा येथील डलहौसीहून पटियालाला जाणारी बस आज म्हणजेच शनिवारी सकाळी रस्त्याचा काही भाग खचल्याने अपघातग्रस्त झाली. पण सुदैवाने दरीत पडण्यापासून ही बस बचावली.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कांगडा, कुल्लू, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर, उना, हमीरपूर आणि बिलासपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अतिवृष्टी झाल्यास दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाकडून लोकांसाठी सतर्कतेची सूचना जारी करण्यात आली आहे. स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना नद्या आणि नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला त्यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे?

मुंबई : गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने राजकीय कलगीतुरा रंगला असून दहीहंडीला खेळाचा दर्जा दिला त्यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भाजपा आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

“खेळांच्या सर्व यादीमध्ये अजून एक खेळ जोडला गेला आहे. बाकी काहीही झालेलं नाही. खेळाडूंसाठी असलेल्या ५ टक्के आरक्षणावर तुमचा आक्षेप नाही. पण तुम्हाला असं वाटतंय की गोविंदांना अतिरिक्त ५ टक्के आरक्षण दिलं आहे. तसं ते देता येत नाही. त्यामुळे हे आरक्षण नव्याने दिलेलं नाही. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन ते आरक्षणात जोडलं आहे. त्यात आरडाओरडा करण्यासारखं काय आहे?” असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दहीहंडी उत्सवाच्या एक दिवस आधी राज्य सरकाने विधिमंडळात प्रस्ताव मांडून दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश केला. त्यामुळे राज्यातील इतर मान्यताप्राप्त खेळांप्रमाणेच दहीहंडीतील गोविंदांना देखील खेळाडू म्हणून सरकारी नोकऱ्यांमधील ५ टक्के आरक्षणाच्या कोट्याचा लाभ मिळू शकणार आहे. मात्र, यावर एमपीएससी परीक्षार्थींसोबत विरोधकांनी देखील आक्षेप घेतला आहे.

सरकारने भावनिक निर्णय घ्यायचे नसतात

नागपूर : राज्य सरकारने तडकाफडकी दहीहंडीत सहभागी गोविंदांना शासकीय नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या पात्रतेचे निकष काय?, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी भावनिक निर्णय घेतला असला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी तरी खबरदारी घ्यायला हवी होती, असा टोलाही अजित पवारांनी लगावला.

राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांचा कोणताही विचार न करता गोविंदांबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील पोलिस भरती, शिक्षक भरती, आरोग्य भरती अजूनही रखडलेली आहे. ही भरती केव्हा करणार, हे सरकारने स्पष्ट करावे, असे अजित पवार म्हणाले.

मेळघाटमधील कुपोषण आणि बालमृत्यूचा आढावा घेण्यासाठी अजित पवार दोन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे सरकारच्या तडकाफडकी निर्णय घेण्याच्या पद्धतीवर बोट ठेवले.

अजित पवार म्हणाले, मुळात दहीहंडी उत्सव मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या भागांमध्ये जल्लोषात साजरा केला जातो. राज्यात ३६ जिल्हे आहेत. ठाण्यात दहीहंडीचा मोठा जल्लोष असतो. मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ असे भावनिक निर्णय तडकाफडकी घ्यायचे नसतात. आता ३६ जिल्ह्यांत गोविंदांचे काही संघवगैरे आहेत काय? त्यांची नोंद कशी ठेवणार? गोविंदांची माहिती कशी गोळा करणार? नोकरीत आरक्षण देताना त्यांच्या पात्रतेचे निकष काय? हे सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत.

ठाणे, मुंबईतील गोविंदांना मला नाऊमेद करायचे नाही. मात्र, समजा एखादा गोविंदा काहीच शिकलेला नसेल, तर त्याला नोकरी कशी देणार? याशिवाय राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यांच्या नोकरीचे काय? राज्य सरकार पोलिस, आरोग्य, शिक्षक भरती का करत नाही? ही भरती लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी कित्येक विद्यार्थी वाट पाहत आहेत. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही.

शिंदे यांनी गोविंदांबाबत निर्णय घेताना क्रिडा विभागालाही विचारले नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना प्रशासनाचा अनुभव असूनही तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील १३ कोटी जनतेवर काय परिणाम होईल, याचा विचारही केला नाही. सरकार चालवताना असे करायचे नसते. सरकारने निर्णय घेताना गांभीर्य ठेवले पाहिजे, असे पवार म्हणाले.

अशा धमक्यांना गांभिर्याने घ्या : अजित पवार

मुंबई : अशा प्रकारच्या धमक्यांना गांभिर्याने घेतली पाहिजे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

अनेकदा अशा धमक्या येतात, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला देखील अशी धमकी देण्यात आली होती, त्याच्या खोलात गेल्यानंतर ते माथेफीरू विकृत लोकं अशा प्रकारे बोलतात. धमकी ही गांभिर्याने घेतली पाहीजे. आपली पोलिस यंत्राणा सक्षम आहे. अशा धमक्या जेव्हा येतात तेव्हा केंद्राने देखील यामध्ये लक्ष देऊन गांभिर्याने दखल घेतली पाहिजे आणि सरकार घेईल अशी अपेक्षा करुया, असे अजित पवार म्हणाले.

मुंबईत पुन्हा २६/११सारख्या हल्ल्याची धमकी

मुंबई : मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमला मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. कंट्रोल रूमच्या व्हॉट्सअॅपवर पाकिस्तानी नंबरवरून हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

जर त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचे दाखवले जाईल आणि धमाका मुंबईत होईल, असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे. भारतात सध्या ६ लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील, असे धमकीच्या मेसेजमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यासोबतच अन्य तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव अगदी तोंडावर आहे. त्या पाठोपाठ लगेचच नवरात्रौत्सव, दिवाळी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याच्या धमकीने खळबळ माजली आहे.

यापूर्वी, गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर १६ मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-४७ रायफल आणि काडतुसं सापडली होती. यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

सोमालियात मुंबईसारखा दहशतवादी हल्ला

मोदादिशू : सोमालियामध्ये मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्यासारखी घटना घडली आहे. मुंबईतील ताज हॉटेलप्रमाणेच दहशतवाद्यांनी सोमालियाची राजधानी मोदादिशूमधील हॉटेल हयातवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी आधी हॉटेलबाहेर स्फोट केला. त्यानंतर दहशतवादी गोळीबार करत हॉटेलमध्ये शिरले. हे सर्व दहशतवादी अल-कायदाशी संलग्न असलेल्या अल शबाब या संघटनेचे आहेत. या हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अल-शबाब गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

वृत्तसंस्था एएफपीशी या घटनेबाबत बोलताना सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी अजूनही हॉटेल हयातमध्ये आहेत त्यांनी काही जणांना ओलीस ठेवले आहे आणि सुरक्षा दलांशी चकमक सुरू आहे. ते म्हणाले की, हॉटेल हयातवरील हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर जिहादी गटाचे सैनिक आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. हे बंदूकधारी हयात हॉटेलमध्ये घुसण्याच्या एक मिनिट आधी मोठा स्फोट झाला.

पोलीस मेजर हसन दाहीर यांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि जिहादी गटामध्ये झालेल्या चकमकीत मोहादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद यांच्यासह दोन सुरक्षा अधिकारी जखमी झाले आहेत. तसेच, घटनेच्या वेळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांनी दुसरा स्फोट झाला. या स्फोटांमुळे सुरक्षा दलाचे काही सदस्य आणि नागरिक जखमी झाले. एका व्यक्तीने सांगितले की, या घटनेनंतर आसपासच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.

दरम्यान, सोमालियात दहशतवादी संघटनेचा हा पहिला हल्ला नाही. याआधीही या दहशतवादी संघटनेने अनेक भीषण स्फोट घडवले आहेत.