मंदिरात लावण्यात आले फलक
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिराला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देणा-या भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिर ट्रस्टने एक विशेष सूचना जारी केली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करणा-यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी ती सूचना आहे. या सूचनेचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असलेल्या तुळजाभवानी मंदिरात ‘अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा आदि तोकडे वस्त्र परिधान करणा-या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही’ या सूचनेसोबतच ‘कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवा’ असा सल्ला फलकांतून देण्यात आला आहे.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे फलक लागले होते. पूर्वीच्या नियमांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याच्या काही तक्रारी मंदिर संस्थांकडे आल्या म्हणून मंदिराच्या परिसरात हे फलक लावण्यात आले आहेत. भारतीय संस्कृती जपण्यासाठी मंदिर ट्रस्टने हे महत्त्वाचे पाऊल उचलले असून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाताना आता भाविकांना हा नियम बंधनकारक राहणार आहे.