Tuesday, December 3, 2024
Homeताज्या घडामोडीपंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन २०२३चे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन २०२३चे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर उभारलेल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन केले. तसेच त्यांनी दिल्ली परिसरातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय संग्रहालयाच्या आभासी सफरीचे देखील उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी तंत्रज्ञान मेळा, संवर्धन प्रयोगशाळा तसेच या निमित्त सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनांतून फेरफटका मारला. “संग्रहालये, शाश्वतता आणि स्वास्थ्य’ या यंदाच्या संकल्पनेसह ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगाचे विशेष महत्त्व सांगताना पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच, या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या निमित्ताने तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासाचे विविध अध्याय सजीव होत आहेत. ते म्हणाले की जेव्हा आपण या संग्रहालयात प्रवेश करतो तेव्हा आपण भूतकाळात गुंगून जातो. हे संग्रहालय तथ्ये आणि पुराव्यांवर आधारित सत्ये आपल्यासमोर ठेवते तसेच ते भूतकाळापासून प्रेरणा देते आणि भविष्यातील कर्तव्यांची जाणीव देखील करून देते.

ते म्हणाले की आजच्या ‘शाश्वतता आणि स्वास्थ्य’या संकल्पनेतून आजच्या जगाचे प्राधान्यक्रम अधोरेखित होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रसंगोचित ठरतो.आपल्या आजच्या प्रयत्नांमुळे युवा पिढीला त्यांच्या वारशाविषयी अधिक जाणून घेण्यात मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

आज झालेल्या उद्घाटनाच्या पूर्वी, या संग्रहालयाच्या उभारणी कार्याला दिलेल्या भेटीचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या मनावर मोठा प्रभाव टाकण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या नियोजन तसेच अंमलबजावणी यांच्या संदर्भातील प्रयत्नांची प्रशंसा केली. आजचा कार्यक्रम भारतातील वस्तुसंग्रहालयांच्या जगतासाठी प्रचंड मोठा निर्णायक टप्पा ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात प्राचीन हस्तलिखिते आणि ग्रंथालये जळून खाक झाली, यामुळे या भूमीचा बराचसा वारसा नष्ट झाला. हे केवळ भारताचेच नाही तर संपूर्ण जगाच्या वारशाचेही नुकसान असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्या भूमीचा बऱ्याच काळापासून गमावलेला वारसा पुनरुज्जीवित आणि जतन करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर प्रयत्नांचा अभाव राहिला याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. याबाबत नागरिकांमध्येही जागरूकता नसल्यामुळे आणखी मोठा परिणाम झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात घेतलेल्या ‘पंच प्रण’ किंवा पाच संकल्पांचे स्मरण करून ‘आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे’ यावर पंतप्रधानांनी भर दिला. देशाची नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधा विकसित होत असल्याचेही अधोरेखित केले. या प्रयत्नांमध्ये, कोणालाही भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास तसेच देशाचा हजारो वर्षांचा वारसा सापडेल असे पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक राज्याच्या आणि समाजातील घटकांच्या वारश्यासह स्थानिक आणि ग्रामीण वस्तू संग्रहालयांचे संवर्धन करण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवत असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान संस्मरणीय करण्यासाठी दहा विशेष वस्तू संग्रहालयांचा विकास सुरू आहे. आदिवासींच्या विविधतेची झलक दर्शवणाऱ्या जगातील सर्वात अनोख्या उपक्रमांपैकी हे एक असेल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. देशाचा वारसा जतन करण्याची उदाहरणे पंतप्रधानांनी यावेळी दिली. महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहादरम्यान मार्गक्रमण केलेल्या दांडी पथ, मीठाचा कायदा मोडला त्या ठिकाणी बांधलेल्या स्मारकाचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्या दिल्लीतील ५, अलीपूर रोड येथील राष्ट्रीय स्मारकाचा पुनर्विकास केला. त्याचबरोबर त्यांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थ, अर्थात त्यांचा जन्म झाला त्या महू, लंडनमध्ये ते राहीले ते ठिकाण, नागपुरातील ठिकाण जिथे त्यांनी दीक्षा घेतली आणि मुंबईतील चैत्यभूमी जिथे आज त्यांची समाधी आहे या पंचतीर्थाच्या विकासाचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी येथील संग्रहालय, पंजाबमधील जालियनवाला बाग संग्रहालय, गुजरातमधील गोविंद गुरुजींचे स्मारक, वाराणसीतील मान महल संग्रहालय आणि गोव्यातील ख्रिश्चन कला संग्रहालय यांची उदाहरणे दिली. देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास आणि योगदानाला समर्पित असलेल्या दिल्लीतील प्रधान मंत्री संग्रहालयालाचाही त्यांनी उल्लेख केला. पाहुण्यांनी एकदा या संग्रहालयाला भेट द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

जेव्हा एखादा देश आपला वारसा जपतो तेव्हा इतर देशांशीही जवळीक निर्माण होते असे पंतप्रधान म्हणाले. पिढ्यानपिढ्या संरक्षित असून आता जगभरातील भगवान बुद्धांच्या अनुयायांना एकत्र आणत असलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांची उदाहरणे त्यांनी दिली. शेवटच्या बुद्ध पौर्णिमेला चार पवित्र अवशेष मंगोलियाला पाठवले. पवित्र अवशेषांचे श्रीलंकेतून कुशीनगर येथे आगमन झाले यांचा उल्लेख त्यांनी केला. त्याचप्रमाणे गोव्याच्या सेंट केटेवनचा वारसा भारताकडे सुरक्षित आहे आणि ते अवशेष पाठवल्यावर जॉर्जियातील उत्साहाची आठवण त्यांनी करुन दिली. “आपला वारसा जागतिक एकतेचा आश्रयदाता बनला असल्याचे”, ते म्हणाले.

भावी पिढ्यांसाठी साधनसंपत्तीचे जतन करण्यात वस्तुसंग्रहालयांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. या वसुंधरेवर आलेल्या अनेक आपत्तींच्या खुणा आणि पृथ्वीच्या बदलत्या चेहऱ्यामोहऱ्याचे सादरीकरण देखील वस्तुसंग्रहालय जतन करू शकतात, असे त्यांनी सुचवले.

या प्रदर्शनातील पाककृतीशी संबंधित विभागाचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी भारताच्या प्रयत्नांमुळे वाढत असलेले आयुर्वेदाचे आणि श्री अन्नाचे महत्व विशद केले. नवीन वस्तुसंग्रहालयांनी श्री अन्न आणि अन्य धान्यांच्या प्रवासाबद्दल माहिती द्यावी, असे पंतप्रधान म्हणाले.

ऐतिहासिक महत्व असलेल्या वस्तूंचे जतन करणे हा जेव्हा देशाचा स्वभाव बनतो, तेव्हाच हे सर्व शक्य होते, असे ते म्हणाले. हे सर्व कशाप्रकारे साध्य करता येईल, हे त्यांनी सविस्तर सांगितले. प्रत्येक कुटुंबाने आपल्या कुटुंबाचे एक वैयक्तिक कौटुंबिक वस्तुसंग्रहालय बनवावे. आजच्या साध्यासोप्या वस्तू उद्याच्या पिढीसाठी भावनांचा अनमोल ठेवा असू शकतो, असे त्यांनी सांगितले. शाळा आणि अन्य संस्थांनी देखील आपले स्वतःचे वस्तुसंग्रहालय तयार करावे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी शहरांना स्वतःचे शहर वस्तुसंग्रहालय बनवण्याचा सल्ला दिला. यामुळे भावी पिढ्यांसाठी मोठी ऐतिहासिक संपत्ती निर्माण होईल.

वस्तुसंग्रहालये आता युवावर्गाचा करिअरचा एक पर्याय बनत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आपण या तरुणांकडे केवळ वस्तुसंग्रहालयातील कर्मचारी म्हणून न पाहता इतिहास आणि स्थापत्यशास्त्रासारख्या विषयांशी निगडित व्यक्ती म्हणून पाहिले तर ते जागतिक सांस्कृतिक कृतीचे माध्यम बनू शकतील. हे तरुण देशाचा वारसा परदेशात घेऊन जाण्यासाठी आणि भूतकाळाबद्दल त्यांच्याकडून शिकण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधानांनी तस्करी आणि दुर्मिळ कलाकृतींचा अपहार या सामूहिक आव्हानांचा उल्लेख केला आणि प्राचीन संस्कृती असलेले भारतासारखे देश गेली अनेक शतके या आव्हानांचा सामना करत असल्याचे नमूद केले. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतातील अनेक पुरातन मौल्यवान कलाकृती देशाच्या बाहेर नेण्यात आल्या असे सांगून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने एकत्रपणे कार्य करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. जगामध्ये भारताची प्रतिष्ठा वाढत असताना विविध देशांनी भारताचा वारसा परत करण्यास सुरुवात केल्याने त्यांनी आनंदही व्यक्त केला. बनारसमधून चोरलेली माता अन्नपूर्णेची मूर्ती, गुजरातमधून चोरलेली महिषासुरमर्दिनीची मूर्ती, चोल साम्राज्याच्या काळात निर्माण केलेल्या नटराजाच्या मूर्ती, गुरू हरगोविंद सिंग यांच्या नावाने सजवलेली तलवार अशी उदाहरणे त्यांनी दिली. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये २० पेक्षा कमी पुरातन वस्तू भारतात परत आणण्यात आल्या त्या तुलनेत गेल्या ९ वर्षांत सुमारे २४० प्राचीन कलाकृती परत मिळवून भारतात आणल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले. या ९ वर्षात भारतातून होणारी पुरातन मौल्यवान कलाकृतींची तस्करीचे प्रमाण देखील बरेच कमी झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

जगभरातील कला क्षेत्रातील तज्ञांना, विशेषतः जे संग्रहालायांशी संबंधित आहेत, नरेंद्र मोदींनी या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले आहे. “कुठल्याही देशातील कुठल्याही संग्रहालयात अशी कुठलीही कलाकृती नसावी जी तिथे चुकीच्या मार्गाने पोचली आहे. आपण सर्व संग्रहालयांनी ही नैतिक कटिबद्धता जपायला हवी,” असे पंतप्रधान म्हणाले. भाषणाच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले, “आपण आपला वारसा तर जपणारच आहोत, त्याच बरोबर नवा वारसा देखील तयार करणार आहोत.”

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल तसेच मीनाक्षी लेखी आणि लूव्र संग्रहालय अबुधाबी चे संचालक मॅन्युएल राबाटे यावेळी उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -