Friday, May 17, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलपरोपकारी विकास

परोपकारी विकास

  • कथा: प्रा. देवबा पाटील

एक गाव होते. छानसे, छोटेसे. मडगाव त्याचे नाव होते. या गावात भीमराव नावाचा एक गरीब मजूर राहत होता. तो त्याच गावच्या सर्जेराव नावाच्या एका जमीनदाराकडे शेतकामाला असायचा. त्याला विकास नावाचा एक मुलगा होता. भीमरावाच्या घरची परिस्थिती गरिबीची असल्याने विकासला बालपणापासूनच छोटी-मोठी कामे करावी लागली. त्यामुळे तोही बापासारखा शेतकामात तरबेज होता.
एकदा आपल्या वडिलांच्या मालकांच्या म्हणजे सर्जेराव जमीनदाराच्या मळ्यात साऱ्यांच्या न्याहाऱ्या पोहोचवून द्यायला त्यांच्या घरी वेळेवर कोणीच हजर नव्हते. सारेजण काही कामानिमित्त कोठे ना कोठे तरी बाहेर गेलेले होते. अशा वेळी विकासने स्वत: बैलगाडी हाकत ज्यावेळी सा­ऱ्यांच्या न्याह­ाऱ्या शेतात पोहोचवून दिल्या. त्यावेळी जमीनदार खूप खूश झाले होते.

त्यांनी संध्याकाळी मळ्यातील काम संपल्यानंतर भीमरावाला बोलावले नि म्हणाले. भीमराव तुझा मुलगा विकास चांगला कर्तबगार दिसतो रे. पण शाळेत अभ्यासबिभ्यास करतो की नाही? अभ्यासातील त्याची प्रगती कशी काय आहे? “परमेसराच्या किरपेनं समदं ठीक हाय मालक. विकास अभ्यासात लई हुशार हाय. रोजच्या रोज तो बराबर त्याचा अभ्यास करतो. शाळेत बी चांगले मारकं मिळोयतो.” भीमराव म्हणाला.

ते ऐकून सर्जेराव जमीनदारांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, “भीमराव, तुझ्या मुलाने विकासने त्या दिवशी न सांगताच आपले खूप मोलाचे काम केले. त्याने हिंमत धरली नसती, तर आपली खूप पंचाईत झाली असती. तरी त्याला बक्षीस म्हणून त्याच्यासाठी तू हे काही पैसे ठेवून घे. अडीअडचणीला तुझ्या कामात पडतील.” असे म्हणत त्यांनी आपल्या खिशातून काही पैसे काढले व ते भीमरावाला देऊ लागले.
“न्हायी मालक, तुमी काय परके हायेत.” भीमराव
विनम्रतेने म्हणाला.
“अरे, माझ्याकडून त्याला मदत म्हणून घे.” सर्जेराव जमीनदारांनी असे थोड्याशा प्रेमळ आग्रहाने भीमरावाला ते पैसे घेणे भागच पाडले.
संध्याकाळी भीमराव घरी आल्यानंतर त्याने जमीनदाराने विकासला खाऊसाठी दिलेले पैसे विकासच्या हाती दिले. “तुमीन काहून घेतले बाबा ते पयसे” विकास म्हणाला.
“तसं नाय विकास, म्यां अगुदर न्हायीच म्हतले व्हतं.
पन मालकाच्या पिरमाखातर मले घेनच पळले.” भीमरावाने खुलासा केला.
“बरंय बाबा.” असे म्हणत विकासने ते पैसे घेतले व त्याच्या बचत पाकिटात नीट ठेवून दिले. तसेही त्याने चित्रकलेसाठी रंगकांड्या विकत आणल्याने त्याचे पाकीट रिकामेच झालेले होते. त्यात आता आयतीच भर पडली.
असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत त्याला त्याच्याच वर्गातला सदू
निंबाच्या झाडाखाली रडताना दिसला. सदूचे वडील वारलेले होते. विकास त्याच्याजवळ गेला नि “काहून रडतू रं सदू, काय झालं तुले असं रडायले?” असे त्याला विचारले.
“मीनं फी भरली न्हायी म्हनून… म्हनून… हेडसरनं मले हाफिसात बलावलं व्हतं.” सदू स्फुंदत स्फुंदत सांगू लागला.
“माहं नाव… हेडसरनं शाळेतून काहाडून टाकलं… अन् मले घरी जायाले सांगलं.”
तो सदूला म्हणाला, “तू कायबी कायजी करू नकं. कालदी ह्योच वकताले तू अठी ये. तदलोक मी तुह्या फीची कायीतरी सोयसाय लावून ठिवतो. आपून मंग हेडसरले भेटू अन् तुही फी भरू. मंग तुले वर्गात गुरुजी बसू देतीन.”

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना विकासने आपल्या खाऊचे पैसे सोबत घेतले. मधल्या सुट्टीत सदूसोबत हेडसरांकडे गेला. त्याच्या परिस्थितीची त्यांना माहिती दिली व त्याची फी भरली. सदूचा चेहरा एकदम आनंदाने खुलला. तो वर्गात येऊन बसला. विकासलासुद्धा त्याचा प्रफुल्लित झालेला चेहरा पाहून खूप खूप आनंद झाला.

विकासने सदूला आपल्यासारखेच दूध विकण्यास सांगितले. सदूला हे पटले. पुढच्या दिवसापासून सदूही विकाससोबत दूध विकू लागला. अशा रीतीने सदू आपल्या शाळेच्या खर्चाला त्याच्या आईला हातभार लावू लागला. विकास व सदू जो तो आपापली कामं वेगवेगळे करू लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -