Share

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

पंजाबमधील सत्ता आम आदमी पक्षाने काबीज केल्यामुळे काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन प्रमुख राजकीय पक्षांना जबर धक्का बसला असला तरी देशातील अन्य ५४ प्रादेशिक पक्षांपेक्षा आपण वेगळे व भारी आहोत, हे ‘आप’ने दाखवून दिले आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल, तर पंजाबात भगवंत मान असे दोन राज्यांत ‘आप’ने मुख्यमंत्री दिले आहेत.

सन २०११ मध्ये सारा देश अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिला होता. राजधानी दिल्लीत इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनात अरविंद केजरीवाल आघाडीवर होते. अण्णांच्या शेजारी ते उभे होते. अण्णांच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊनच त्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. ‘आप’ला झाडू हे निवडणूक चिन्ह मिळाले. दहा वर्षांत हा पक्ष देशातील दोन राज्यांत सरकार स्थापन करील, अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. देशात ५४ प्रादेशिक पक्ष आहेत, त्यात सर्वांत वेगाने प्रगती करणारा आम आदमी पक्ष ठरला आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन दशके केवळ काँग्रेसचीच सर्वत्र चलती होती. १९६७ च्या निवडणुकीपासून विविध राज्यांत काँग्रेस कमजोर होऊ लागली व तेथे प्रादेशिक पक्षांचा उदय सुरू झाला. उत्तर प्रदेशात सपा व बसप, बिहारमध्ये जनता दल यू आणि राजद, ओरिसात बीजू जनता दल, काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, तामिळनाडूत द्रमुक, अण्णा द्रमुक, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, महाराष्ट्रात शिवसेना, अशा प्रादेशिक पक्षांनी आपला प्रभाव निर्माण केला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सप्टेंबर २०२१च्या आकडेवारीनुसार देशात एकूण २८५८ राजकीय पक्ष नोंदणीकृत आहेत. त्यातील केवळ आठ पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे आणि ५४ पक्षांना प्रादेशिक दर्जा दिलेला आहे. आम आदमी पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, सीपीआय (एम), सीपीआय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नॅशनल पीपल्स पार्टी यांना मान्यता आहे. आम आदमी पक्षाचा प्रवास २ ऑक्टोबर २०१२ रोजी सुरू झाला. या वर्षी ‘आप’ला दहा वर्षे पूर्ण होतील. दिल्लीतील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आपचा जन्म झाला. ‘आप’ने आपले कार्यक्षेत्र दिल्ली हेच निश्चित केले व पक्षाचा पायाही देशाच्या राजधानीतच भक्कम केला. २०१३च्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ‘आप’ने बिजली-पानी आंदोलन केले.

केजरीवाल यांनी शीला दीक्षित सरकारच्या विरोधात धरणे धरले. चौदा दिवस उपोषण केले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष अशी सहानुभूती पक्षाला मिळवली.

२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत आपचे ७० पैकी २८ जागांवर उमेदवार आमदार म्हणून निवडून आले व सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा काँग्रेसच्या मदतीने आपने सरकार बनवले, पण ते फार काळ चालले नाही. पूर्ण बहुमत नसल्याने अरविंद केजरीवाल यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये राजीनामा दिला. केजरीवाल यांनी दिल्ली सरकारचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या पक्षाची कार्यकर्त्यांची फळी काय आहे, आपली ताकद किती आहे, आपल्या विरोधात कोण आहे, याचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने देशभर ४०० उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यातले केवळ चार जण विजयी झाले, ते सर्व पंजाबमधून खासदार म्हणून निवडून आले. तेव्हाच ‘आप’ला पंजाबात भविष्य आहे हा संदेश या निकालाने दिला.

सन २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने दिल्लीतील ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवला. वीज, पाणी आणि शिक्षण या तीनच मुद्द्यांवर आपने सारे लक्ष्य केंद्रित केले होते. दिल्ली मॉडेल ऑफ गुड गव्हर्नस असा आपने प्रचार केला. २०१५ ते २०२० या काळात दिल्ली मॉडलचा मुद्दा पुढे करूनच ‘आप’ने विविध राज्यात निवडणुका लढवल्या. पण, पक्षाला कुठे यश लाभले नाही. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागांवर आपचे सारे उमेदवार पराभूत झाले व भाजपचे सारे उमेदवार खासदार झाले. पंजाबमधून आपचे उमेदवार भगवंत मान खासदार म्हणून निवडून आले. बाकी सारे पराभूत झाले. सन २०२० मध्ये ‘आप’ने दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा चौफेर विजय मिळवला व ७० पैकी ६२ जागांवर ‘आप’चे आमदार विजयी झाले. दिल्लीत काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षाला ‘आप’ने धूळ चारली.

आम आदमी पक्ष ही कोणताही धर्म, भाषा, प्रांत, समाज अशी मर्यादित ओळख नाही. ‘आप’ने महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगत सिंग यांचे आदर्श मानले आहेत. पंजाबच्या निवडणुकीत तर ‘आप’ने प्रचारात आंबेडकर व भगतसिंग यांचे फोटो कायम ठेवले होते. युवकांना आणि दलितांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्रतिमा ‘आप’ला उपयोगी पडल्या.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ पासून निवडणुकीचे राजकारण सुरू झाले. तेव्हा केवळ शिरोमणी अकाली दल व जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स असे दोनच प्रादेशिक पक्ष होते. आम आदमी पक्षाच्या अगोदर द्रमुक व अण्णा द्रमुक हे दोन प्रादेशिक असे आहेत की, त्यांनी तामिळनाडू व पुडुचेरीमध्ये सरकार बनवले. ‘आप’ने प्रथम दिल्ली हे छोटे राज्य ताब्यात घेतले व नंतर पंजाबमध्ये सरकार बनवले. द्रमुक व अण्णा द्रमुकने प्रथम तामिळनाडू हे मोठे राज्य जिंकले व नंतर पुडुचेरी या छोट्या राज्यात सरकार स्थापन केले.

उत्तर प्रदेशात बसपची स्थापना १९८४ मध्ये झाली. काशीराम यांनी दलितांची व्होट बँक पक्षाच्या पाठीशी उभी केली. अगोदर सपाचा पाठिंबा घेऊन व नंतर एकदा भाजपचे समर्थन घेऊन मायावती मुख्यमंत्रीही झाल्या. २००७ मध्ये उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळवून मायवतींनी सरकार स्थापन केले. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या सपाचे उत्तर प्रदेशात अनेकदा सरकार आले. पण या दोन्ही पक्षांचे कार्यक्षेत्र व प्रभाव एका राज्यापुरताच मर्यादित राहिला. जनता दल यू, जनता दल एस, राजद, लोकशक्ती पार्टी, समता पार्टी असे जनता दलाचे अनेक तुकडे पडले. जनता दल यूला बिहारपुरता जनाधार आहे. नितीशकुमार हे कधी राजद, तर कधी भाजपचे समर्थन घेऊन मुख्यमंत्रीपद टिकवून आहेत.

शिवसेनेची स्थापना १९६६ मध्ये झाली. मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे असे तीन मुख्यमंत्री शिवसेनेने महाराष्ट्राला दिले. अगोदर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन शिवसेना सत्तेत आहे. उत्तर प्रदेश, गोवा अशा अन्य राज्यांत शिवसेनेने निवडणुका लढवल्या, पण विस्तार करण्यात शिवसेनेला अपयश आले. तेलुगू देशम, बीजू जनता दल, तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती, असे अन्य प्रादेशिक पक्षही त्यांच्या राज्यात प्रभावी आहेत. एकाच वेळी दोन राज्यांत सरकार स्थापन करणारा ‘आप’ हा अन्य प्रादेशिक पक्षांना भारी ठरला आहे.

sukritforyou@gmail.com

Recent Posts

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर

नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind…

3 mins ago

PM Narendra Modi : काँग्रेसने कधीच आदिवासी समाजाला सन्मान दिला नाही!

विकास कामांमध्ये काँग्रेस भाजपाचा सामना करणं अशक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबारमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल…

15 mins ago

Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तब्बल ११ वर्षांनंतर निकाल!

दोघांना जन्मठेप आणि सबळ पुराव्याअभावी तिघे निर्दोष पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र…

2 hours ago

MP News : निवडणुकीच्या काळात पैशांचा पाऊस थांबेना; नोटा इतक्या की पोलिसांना मोजताही येईना!

मध्यप्रदेशमध्ये सापडला पैशांचा डोंगर मध्य प्रदेश : देशभरात निवडणुकीची (Loksabha Election 2024) रणधुमाळी सुरु असताना…

2 hours ago

China panda news : अशी ही बनवाबनवी! प्राणिसंग्रहालयात पांडा नव्हते म्हणून कुत्र्यांना दिला काळा-पांढरा रंग

कारवाई होणार असूनही प्रशासन निर्णयावर ठाम बेईजिंग : चीनच्या एका प्राणिसंग्रहालातून (China zoo) अजबगजब बाब…

3 hours ago

Shrimant Dagadusheth Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

आकर्षक फुलं आणि आंब्यांनी केली मंदिराची सजावट पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी…

3 hours ago