Sunday, May 12, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरात मुसळधार

मुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरात मुसळधार

मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र पाठ

मुंबई : राज्यात कोकणासह अनेक भागात जोरदार बॅटींग सुरू आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र अद्यापही पाऊस झालेला नाही.

मुंबईसह रत्नागिरी आणि कोल्हापूरला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. कोकणात मुसळधार पाऊस असल्याने रत्नागिरीत पूरस्थिती असून कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.

राजाराम बंधारा, बर्की बंधारा पाण्याखाली, पर्यटक अडकले

कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. सकाळपर्यंत राधानगरी धरणातील पाणीसाठा वाढत आहे. भोगावती आणि कासारी नदी दुथडी भरून वाहत आहे. बर्की बंधारा पाण्याखाली गेला असून येथील धबधबा पाहण्यासाठी आलेले पर्यटक गावातच अडकले आहेत. पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना वाट पहावी लागणार आहे.

८० पर्यटक सुखरूप

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता कोल्हापूर येथून २ मिनीबस व ८ कारमधून अंदाजे ८० पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी ५ वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरूप बाहेर पडले आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.

गोवा महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळली

गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. चौपदीकरणासाठी घाटाचे काम सुरु आहे. मात्र दरड कोसळल्याने घाटातील बांधकामावरही मोठा परिणाम झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -