Saturday, May 18, 2024
Homeक्रीडासलग चौथ्या विजयासाठी गुजरात सज्ज

सलग चौथ्या विजयासाठी गुजरात सज्ज

नवी मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामातील पहिल्या तिन्ही सामन्यांत लखनऊ, दिल्ली आणि पंजाबला पराभवाची धूळ चारणाऱ्या गुजरातचा संघ विजयी चौकार लगावण्यासाठी सज्ज आहे. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या सामन्यात गुजरातसमोर हैदराबादचे आव्हान आहे.

शुबमन गील, मॅथ्यू वेड, विजय शंकर, हार्दीक पंड्या, डेवीड मीलर, राहुल तेवतीया अशा तगड्या फलंदाजांची फळी असलेल्या गुजरातच्या संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर यंदाच्या हंगामातील पहिले तिन्ही सामने खिशात घातले आहेत. कधी फलंदाजांची धडाकेबाज कामगिरी तर कधी गोलंदाजीतील प्रभावी कामगिरी या जोरावर या संघाने तिन्ही सामने जिंकले आहेत. दुष्मनाथ चमीरा, कृणाल पंड्या, लॉकी फर्ग्युसन, हार्दीक पंड्या, मोहम्मद शमी हे गोंलदाज चांगली कामगिरी करत आहेत. शुबमन गील धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात राहुल तेवतीयाने शेवटच्या दोन्ही चेंडूंवर षटकार लगावत अनपेक्षीत विजय मिळवून दिला आहे.

त्यामुळे गुजरातचा संघ चांगलाच फॉर्मात आहे. गुजरातची ही विजयी घोडदौड रोखण्याचे आव्हान हैदराबादसमोर आहे. दुसरीकडे हैदराबादने चैन्नईला पराभूत करून विजयाचे खाते खोलले आहे. पण त्यांना आपल्या पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आघाडीच्या फलंदाजांना धावा जमवण्यात येत असलेले अपयश ही हैदराबादच्या संघाची डोकेदुखी ठरली आहे. कर्णधार केन विल्यमसनलाही अद्याप सूर गवसलेला नाही. अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, आयडेन मारक्रम, तळातील फलंदाज वॉशींग्टन सुंदर यांनी धावा केल्या आहेत.

पण त्यांना धावा जमवण्यात सातत्य राखता आलेले नाहीय. त्यांच्या गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करावी लागेल. भुवनेश्वर कुमारने त्यात बरी कामगिरी केली आहे. त्याच्या जोडीला नटराजन आहेच. पण त्यांना प्रतिस्पर्ध्यांना धावा काढण्यापासून रोखावे लागेल. त्यामुळे गोलंदाज आणि फलंदाजांना मरगळ झटकावी लागेल.

वेळ : रात्री ७.३० वा. ठिकाण : डी. वाय. पाटील स्टेडियम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -