Monday, May 20, 2024

दुःख…

दुःख म्हणजे नेमके काय, तर माझ्याकडे खूप निवांत वेळ आहे; परंतु माझ्या जेवणात पंचपक्वान्न नाहीत, हे एखाद्याचे दुःख असू शकते, तर माझ्या जेवणात पंचपक्वान्न आहेत; परंतु ते खाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, हे कदाचित दुसऱ्याचे दुःख असू शकते. ‘दात हैं तो चना नहीं, चना हैं तो दात नहीं!’ या परिस्थितीला आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तोंड द्यावेच लागते.

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

कोणाला आपले दुःख सांगायचे असल्यास मला सांगू शकता –
छोटे दुःख – १००₹
मोठे दु:ख – ५००₹ आणि
सोबत रडायचे असेल, तर – १०००₹
अशी पोस्ट वाचायला मिळाली. भावनांचेसुद्धा किती बाजारीकरण झाले आहे! भावना प्रकट केल्यावर त्या भावनांशी समरस होणारी जवळची माणसे आसपास नाहीत, हे सर्वात मोठे दुःख आहे. भावनांचा निचरा करण्याची माणसाला गरज वाटते हे स्वाभाविक आहे. आजच्या जाहिरातीच्या काळात या गरजेची दुकानदारीसुद्धा व्हावी, याचे नवल वाटण्याचे काहीच कारण नाही.

दुःख म्हणजे नेमके काय, याचा आपण खोल विचार करत गेल्यावर लक्षात येते की, माझ्याकडे खूप निवांत वेळ आहे; परंतु माझ्या जेवणात पंचपक्वान्न नाहीत, हे एखाद्याचे दुःख असू शकते, तर माझ्या जेवणात पंचपक्वान्न आहेत; परंतु ते खाण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही, हे कदाचित दुसऱ्याचे दुःख असू शकते. लहानपणी डोळ्यांत पाणी आणून ‘आई, नको गं जाऊस’ म्हणणारी लहान मुले आणि आईच्या डोळ्यांतले पाणी पाहूनसुद्धा ‘आई, तू आम्हाला सोडून गेलीस, तर जास्त बरं होईल…’ म्हणणारी तीच मोठी झालेली मुले ही केवळ नाटक-सिनेमातली नाहीत तर वास्तवातली आहेत, याविषयी दुःख वाटते.

दुःखाचे साधारण तीन प्रकार मानले जातात. एक अध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. अध्यात्मिक दुःख म्हणजे आपल्या शारीरिक (अंग दुखणे, ताप येणे, एखाद्या अवयव कमजोर होणे इ.) किंवा मानसिक व्यथा-वेदना (चिडचिडेपणा, मन न रमणे, एकाग्रता नसणे, जुन्या घटनांची सातत्याने आठवण किंवा भविष्याबद्दल चिंता, भीती, अस्वस्थपणा, ताणतणाव इ.) यामुळे आपल्या स्वतःला होणारे दुःख म्हणजे ज्याला आपण वैयक्तिक दुःख म्हणू शकतो. हे दुःख आपल्याला आतून जाणवते, कळते. अशा प्रकारचे दुःख आपण जोपर्यंत दुसऱ्यांपुढे व्यक्त करत नाही तोपर्यंत कदाचित त्यांना कळूही शकणार नाही.

आधिभौतिक या प्रकारामध्ये आपल्याला दुसऱ्याने दिलेले दुःख मोडते म्हणजे उदाहरणार्थ कोणी आपल्याला टोचून बोलले किंवा शस्त्राने आपल्यावर वार केला किंवा कोणत्या प्राणी-पक्षी-कीटकांनी आपल्यावर वार केला इत्यादी. आधिदैविक प्रकारचे दुःख माणसाला पंचमहाभुताच्या उद्रेकामुळे होते. अचानक लागलेली आग, पूर, वादळ इत्यादी. त्यामुळे एक मोठा समूह एकाच वेळेस एकाच प्रकारच्या दुःखाने होरपळून जाऊ शकतो.

हे केवळ ढोबळमानाने केलेले प्रकार आहेत; परंतु ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे’ या स्वामी रामदासांच्या या पंक्ती आठवल्या की लक्षात येते, कोणत्या तरी प्रकारचे दुःख प्रत्येक माणूस हा बाळगून असतो एवढे मात्र खरे!

समदुःखी माणसे एकत्र येतात किंवा त्यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण होतात असे म्हटले जाते. यासाठीच कॅन्सरग्रस्त माणसे किंवा तत्सम एकाच प्रकारच्या आजाराने ग्रस्त असलेल्या माणसांचा गट निर्माण करणाऱ्या संस्था आहेत. आपल्यासारख्या दुःखाने ग्रासलेल्या अनेकांना एकत्रितपणे भेटल्यावर, संवाद साधल्यावर आपले दुःख कमी होते, असे म्हटले जाते ते काही प्रमाणात खरेही आहे.

इथे मला एकच उदाहरण द्यायला आवडेल. एखादा माणूस लठ्ठ असेल, तर त्याला त्याचे दुःख असतेच पण तो जेव्हा समाजात वावरतो तेव्हा समाजातील माणसे त्याला सातत्याने त्याच्या लठ्ठपणाची जाणीव करून देतात तेव्हा त्याचे दुःख त्याला अधिक प्रबळ होते. हळूहळू तो माणसांना टाळू लागतो. घरकोंबडा होतो. शारीरिक हालचालींवर बंधने येतात, आहार वाढू लागतो आणि अधिकच लठ्ठ होत जातो. तो डिप्रेशनमध्ये जातो. या दुःखातून त्याला बाहेर काढणे मुश्कील होऊन जाते.

माणसाने कोणत्या प्रकारच्या दुःखाला ‘दुःख’ म्हणायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. प्रत्येकाने आपले दुःख कसे हलके करायचे याविषयी मला या लेखातून काहीही मांडायचे नाही… परंतु दुःख हलके करणे, अति महत्त्वाचे आहे, हे मात्र मला या लेखाद्वारे सांगायचे आहे. प्रत्येकाने आपापल्या पातळीवर यावर उपाय शोधण्याची गरज आहे. कोणतेही दुःख खूप काळ आपल्याला छळत असेल, तर माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो.

आपल्याला एक हिंदी भाषेतील म्हण माहीतच आहे – ‘दात हैं तो चना नहीं, चना हैं तो दात नहीं!’ या परिस्थितीला आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी तोंड द्यावेच लागते. त्यामुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, सामाजिक, राजकीय इत्यादी कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा उपाय कोणताही माणूस केवळ पैसे देऊन शोधू शकत नाही, असे मला तरी वाटते. त्यामुळे असल्या जाहिरातींना माणसाने बळी पडू नये! दुःख सोबत घेऊनच त्यासोबत वाटचाल करत त्याची तीव्रता कशी कमी करता येईल, याचा मात्र विचार आणि उपाय आपापल्या पातळीवर नक्की करता येतात, एवढे मात्र खरे!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -