Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीगोखले पूल मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला होणार

गोखले पूल मार्च २०२४ पासून वाहतुकीसाठी खुला होणार

पालिकेचा दावा; नोव्हेंबरपासून एका मार्गिकेवर वाहतूक

मुंबई (प्रतिनिधी) : धोकादायक झाल्याने अंधेरीतील गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाकरिता नोव्हेंबर २०२२ पासून पूल वाहतुकीसाठी बंद आहे. मे २०२३ पर्यंत एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र अद्याप जमिनीखालील खोदकाम पूर्ण करण्यास जुलै उजाडणार आहे. त्यामुळे एक मार्गिका नोव्हेंबर महिन्यात खुली होणार असून संपूर्ण पूल वाहतुकीसाठी मार्च २०२४ मध्ये खुला होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरीहून बोरिवली व दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

गोखले पुलाचा रेल्वे हद्दीतील भाग पाडून मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. मात्र रेल्वे हद्दीतील भाग हस्तांतरित होऊन दोन महिने उलटले तरी काम संथगतीने सुरू आहे. रेल्वे हद्दीत जमिनीखाली ५ मीटर खाली खोदकाम सुरू असून खोदकाम पूर्ण होण्यास जुलै महिना उजाडणार आहे. त्यामुळे पुलाचे प्रत्यक्षात काम ऑगस्ट महिन्यात सुरू होईल आणि एक लेन नोव्हेंबरपर्यंत सुरू होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर उर्वरित काम फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल आणि पुलावरील वाहतूक मार्च २०२४ पासून सुरू होईल असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा पूल १९७५ मध्ये बांधण्यात आला. ३ जुलै २०१८ मध्ये पुलाचा काही भाग कोसळला आणि दोन जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गोखले पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले. गोखले पूल पाडून नव्याने बांधकाम करणे यासाठी आराखडा तयार करत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात आला. अखेर गोखले पूल धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर रेल्वे हद्दीतील पुलाचे काम कोण करणार? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. अखेर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुलाचा भाग रेल्वे प्रशासन पाडणार असल्याचे स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाने पुलाचे पाडकाम केल्यानंतर पूल बांधण्याचे काम मुंबई महापालिकेच्या पूल विभाग करणार असून यासाठी ८४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर तातडीने काम हाती घेत मे अखेरपर्यंत दोन लेन सुरू करण्यात येतील, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र पूल बंद करून ७ महिने उलटले तरी पुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन होणार आहे, त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने अंधेरी पूर्व व पश्चिम तसेच बोरिवलीच्या दिशेने व अंधेरीहून दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खेळखंडोबा होणार आहे.

अंधेरी सब वेमध्ये पाणी तुंबत असल्याने या ठिकाणी दहा पोर्टेबल पंप बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विलेपार्ले येथील कॅप्टन गोरे पुलाचे बेरिंग तातडीने बदलण्यात आल्याने वाहतुकीसाठी सुरक्षित आहे. जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल, अंधेरी मिल्लत नगर असे पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -