Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखनारी शक्तीचा गौरव

नारी शक्तीचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’मध्ये नारी शक्तीचा गौरव केला. त्यांनी सांगितले की, चांद्रयान मोहिमेमुळे भारताचा जगात गौरव झाला आणि तो गौरव नारी शक्तीमुळेच भारताला लाभला. जेव्हा नारी शक्तीचे अधिष्ठान असते तेव्हा कोणताही कार्यक्रम, मिशन यशस्वी होतेच, हे जगमान्य झालेले सत्यच तर मोदी यांनी सांगितले. चांद्रयान मोहिमेत सहभागी झालेल्या पथकात कित्येक स्त्रिया, महिला अभियंता वगैरे होत्या. त्याचा गौरवपूर्वक उल्लेख मोदी यांनी करून भारत नारी शक्तीला किती आदर देतो, हेच अधोरेखित केले. भारतात प्रथमपासून नारी शक्तीचा गौरव केला जात आहे. अगदी पुरातन काळात जायचे म्हटले तर गार्गी, मैत्रेयी यांनी शंकराचार्यांना वादात हरवले होते, तर अकबराच्या दरबारात प्रसिद्ध असलेला गायक तानसेन याची मुलगी ताना रिरीने त्याला साथ देऊन बादशहाच्या गैरमर्जीपासून वाचवले होते. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील की महिलांनी पुढे येऊन भारताची शान वाढवली आहे.

भारतीय हवाई दलात तर आता महिलांना प्रवेश मिळाला आहे. पण तेथेही महिलांनी जोरदार कामगिरी करून देशाच्या हवाई दलाची प्रतिष्ठा वाढवली आहे.आपल्याकडे महिलांना सन्मानाने वागवण्यात येत आहे, त्याची किती उदाहरणे म्हणून सांगावीत. इंग्लंडमध्ये देखील महिलांना मताधिकारासाठी झगडावे लागले होते. आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यामुळे महिलांना सुरुवातीपासून मताघिकार प्राप्त झाला होता. इतकेच नव्हे तर सर्व मतांचे मूल्य समान ठेवण्याचे अभिमानास्पद कामही बाबासाहेबांनी केले. ही जी परंपरा आहे तिचेच उदात्तीकरण मोदी यांच्या परवाच्या ‘मन की बात’मध्ये दिसले. त्यांनी चांद्रयानच्या यशात महिलांचा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले. मोदी यांनी चांद्रयान मोहिमेला बळ तर दिलेच आणि प्रेरणाही दिली. पण मोदी यांनीच नारी शक्तीचा गौरव केल्याने आता स्त्रियाही विज्ञान शाखेकडे मोठ्या संख्येने वळतील.

महिला या विज्ञानात मागे नसतात, हा फार मोठा संदेश मोदी यांनी नारी शक्तीचा गौरव करून दिला आहे. ज्या देशात पूर्वी महिलांवर पुरुष वर्गाकडून प्रचंड अत्याचार झाले, त्या वर्गात महिलांची स्थिती आता किती कमालीची सुधारली आहे, हे पाहून स्तिमित व्हायला होते. महिलांच्या विद्रूपीकरणाची कुप्रथा कधीच थांबली. पण त्यानंतरही महिलांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कार्याचे योग्य श्रेय देण्याची वहिवाट भारतात चालत आली आहे. मोदी यांनी नारी शक्तीचा जो गौरव केला, त्यामागे ही फार मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेचे पाईक मोदी आहेत. विरोधक केवळ आपण फार मोठे स्त्री शक्तीचा गौरव करणारे आहोत, असे सांगत असतात. पण काँग्रेसच्या काळात स्त्रियांवर अनेक अत्याचार करण्यात आले.

दिल्लीतील निर्भयाप्रकरण तर अगदी अलीकडचे. पण तेव्हा दिल्लीत मनमोहन सरकार होते. ते लेचेपेचे नसते तर गुन्हेगारांची असले क्रौर्य दाखवण्याची हिंमतच झाली नसती. दिल्लीला आता तर रेप कॅपिटल म्हणून ओळखले जाते. हे पाप दिल्लीतील अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या पूर्वीच्या सरकारांचे आहे. केवळ विरोधकांना दोष देण्यासाठी हे विवेचन केले नाही, तर वस्तुस्थिती सांगितली आहे. अजूनही तालिबानी मानसिकतेत काँग्रेस आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरणात अल्पसंख्याक पुरुषांना खूश करण्यासाठी चक्क सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला. तो निश्चितच नारी शक्तीचा गौरव नव्हता, तर नारी शक्तीला दाबणे होते. तेच काम मोदी यांनी तिहेरी तलाकची कुप्रथा बंद करून नव्याने नारी शक्तीला प्रोत्साहन दिले. केवळ हिंदू स्त्रीचाच नव्हे तर अल्पसंख्याक समाजातील महिलांचा आपण आदर करतो, हे मोदींनी कसलीही बडबड न करता दाखवून दिले. आजही काँग्रेसवाले मात्र अल्पसंख्याक नाराज होऊ नयेत म्हणून तिहेरी तलाकची कुप्रथा बंद करून का संकटातून अल्पसंख्याक महिलांची सुटका केली म्हणून मोदी यांच्यावर आगपाखड करत असतात. नारी शक्तीचा आविष्कार प्रत्येक बाबतीत आज देशात दिसतो आहे.

आज महिला किती मनमोकळेपणाने वावरत असतात. बैठकांमध्ये महिला अधिकारारूढ होऊन चर्चा करत असतात. हे चित्र दिसेल, असे पन्नास वर्षांपूर्वी कुणी कल्पना तरी केली असेल काय? त्याचे उत्तर नाही असे आहे. नारी शक्ती आज सर्वत्र नवीन झेंडे गाडत आहे. चंद्रावरही याच नारी शक्तीने झेंडा रोवला आहे. महिलांचा गौरव करतानाच पंतप्रधान मोदी यांनी नेहमीप्रमाणे आपली खेळात असलेली रुचीही दाखवली. विद्यापीठ स्पर्धेत गौरवशाली ठरलेल्या महिला खेळाडूंशी त्यांनी संवाद साधला आणि क्रीडा क्षेत्र किती महत्त्वाचे आहे, हेच दाखवून दिले. त्याबाबतही मोदी यांचे आभार क्रीडाप्रेमी देशाने मानले पाहिजेत.

महिला खेळाडूंची थेट संवाद साधून त्या प्रेरणा देण्याचे कार्य मोदी यांनी याही वेळी ‘मन की बात’मध्ये करून महिला खेळाडूंना नवी प्रेरणा दिली. यातून काँग्रेसच्या काळात जितक्या पदकांची संख्या असे, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पदके या खेळाडूंनी एकाच वर्षात कशी मिळवून दिली, याचा मोदी यांनी गौरवपूर्ण उल्लेख करून काँग्रेसने खेळाडूंची कशी गळचेपी चालवली होती, याचे माप काँग्रेसच्या पदरात पुरेपूर टाकले. ते आवश्यकच होते. कारण त्याशिवाय देशाला वस्तुस्थिती समजली नसती. मोदी यांनी याही ‘मन की बात’मध्ये खेळाडू आणि नारी शक्ती यांना प्रेरणा देऊन एक प्रेरणादायी कार्य पुढे सुरू ठेवले आहे. मोदी यांची करावी तितकी प्रशंसा थोडीच आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -