Wednesday, May 22, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यराजकारणातील घोडे आणि घोडेबाजार!

राजकारणातील घोडे आणि घोडेबाजार!

अरुण बेतकेकर

राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार मांडला गेला, घोड्यांचे भाव लागले, हरभरे टाकले, हरभरे खाण्यासाठी घोडे कुठेही जातात, हरभरे अपक्ष आमदारांना खाऊ घातले गेले वगैरे वगैरे… इति. शिवसेनेचे विश्वप्रवक्ते, वाचाळ संजय राऊत. गेले काही दिवस घोडे-घोडेबाजार हे शब्द सातत्याने कानावर पडत राहिले. येथे घोड्यांची तुलना राजकारण्यांशी होते. हा राजकारण्यांचा अपमान की घोड्यांचा अपमान हा संशोधनाचा विषय. या तुलनेने राजकारणी क्रोधीत होतात तसेच प्राणीप्रेमीसुद्धा. घोड्याविषयी थोडक्यात…

घोडे, खेचर, गाढव या प्रजातीतील प्राण्यांचे बाजार हजारो वर्षांपासून चालत आले आहेत. लांबचे पल्ले गाठून व्यापारी, विकणारे, खरीदणारे, जाणकार तसेच हवसे-गवसे-नवसे बाजारात लोटतात. मोठी आर्थिक उलाढाल होते. हे प्राणी विविध जनउपयोगी कामांसाठी वापरले जातात. सामान्य घोडे ओझे वाहण्यासाठी, तर असामान्य जातीचे घोडे शर्यतीत धावण्यासाठी आणि राजे-राजवाडे सजविण्यासाठी. घोड्यांना वरातीसाठी सजवले, नटवले जाते. तसेच घोड्यांना सर्कसीत संगीतावर नाचवले जाते. अशा घोड्यांची उत्पत्ती रस्त्यावर ते एखाद्या कुबेराच्या घरातील लग्नसोहळा ते मधुचंद्राप्रमाणे. उच्च प्रतीच्या घोड्यांच्या ऐतिहासिक पिढ्यांची नोंद ठेवली जाते. त्यांच्या मीलनासाठी, उच्चभ्रू घराण्यातील ज्या प्रथा-सोहळे आयोजित होतात, त्याचप्रमाणे अशा घोड्यांचेही होते. घोड्यांच्या किमती काही हजारांपासून कोटी-कोटी रुपयांपर्यंत असतात. सामान्य घोडे मैदान, राना-वनांत चरून उदारनिर्वाह करतात. गरज भासते तेव्हा मालक यांना शोधून आणतो. उंची घोड्यांना बदाम, पिस्ते, अक्रोड, खजूर, खारीक असा खुराक द्यावा लागतो. शरीराला मालिशसाठी बदामाच्या तेलापासून तेल-तुपाची आवश्यकता असते. प्रशिक्षित, परंपरागत तज्ज्ञ सेवक त्यांच्या सेवेत तसेच निवाऱ्यासाठी प्राणी सोयीस्कर राजवाडे.

घोडेबाजारात घोड्यांचे भाव लागतात. त्यावर वाटाघाटी होतात. घोडे लिलावात विकले जातात. घोडेबाजार दिवस-ठिकाण ठरवून तसेच जत्रेतही लागतात. घोड्यांचा व्यवहार दोघांत होतो. घोडे धमकावून पळवले जातात. चोरून नेले जातात. आमिष दाखवून नेले जातात. मालकास परवडत नाही म्हणूनही घोड्यांचे हस्तांतरण होते. घोड्यांची उत्पत्ती ठरवूनही केली जाते. शिंगरू समसंख्येत झाल्यास समान वाटप, तर असमान संख्येत झाल्यास तडजोड. याचप्रमाणे उच्च प्रतीच्या घोड्यांची उत्पत्ती शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचा पूर्वोइतिहास, वंश पाहून एखाद्या मोठ्या सोहळ्याप्रमाणे. सामान्य-असामान्य अशा दोन्ही प्रकारच्या घोडे व्यवहारात एक घटकही कार्यरत असू शकतो, तो म्हणजे दलाल.

घोडेबाजाराबद्दल एवढे सर्व असताना संजय राऊत हे राजकारण्यांना कोणत्या दर्जात बसवू पाहतात? राजकारण्यांना घोड्यांची उपमा दिली गेल्यास या घोड्यांचा दर्जा एकच. “सब घोडे बारा टक्के.” प्रसंगानुरूप आवश्यकतेनुसार त्यांचे भाव निश्चित होतात, चढ-उतार होतात. जे आपले नाहीत ते बिकाऊ, असे राऊतांना म्हणायचे आहे का? हा राजकारण्यांचा त्याचबरोबर त्यांना मते देऊन निवडून देणाऱ्या मतदारांचा अपमान नव्हे का? राऊतांच्या पत्रकारितेपासून राजकारणी, या प्रवासात त्यांचे गुरू राहिले आहेत, शरद पवार हेच. शरद पवार यांचा राजकारणातील पाच दशकांचा प्रवास पाहता राजकारण्यांची खरेदी, विक्री आणि या व्यवहारास घोडेबाजार संबोधले जाणे याचे जनक शरद पवारच. या म्हणण्यापृष्ठर्थ काही ठळक घटना. शरद पवार यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवातच वसंतदादांच्या म्हणजेच स्वतःच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करत, १८ जुलै १९७८ रोजी महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस सरकार स्थापन करत, यात पवारांची समाजवादी काँग्रेस, जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्ष सहभागी करून घेत झाली. या बिगर-काँग्रेस आघाडीचं नाव होतं पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद. घोडेबाजाराची ही सुरुवात. तद्नंतर १९९६ मध्ये अटल बिहारी वाजपेयी देशाचे ११वे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे सरकार केवळ १३ दिवस चालले. काँग्रेसने आणलेल्या अविश्वास प्रस्तावामुळे त्यांचे सरकार १ मताने कोसळले. संसदेतील फ्लोअर टेस्टमध्ये सरकारच्या बाजूने २६९ आणि विरोधात २७० मते पडली. बहुसंख्य जनतेने निवडून दिलेल्या या सरकारला पाडण्याची सुपारी सोनिया गांधी यांनी शरद पवारांनाच दिली. त्याचे एकमेव कारण म्हणजे शरद पवार हे घोडेबाजारातले पारंगत तज्ज्ञ म्हणूनच. लागलीच पवार युतीतीलच अण्णा-द्रमुक पक्षप्रमुख जयललिता यांना चेन्नईत जाऊन पटवले अन् अगतिक घडले. अलीकडे २६ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्रात पवारांच्याच पुढाकाराने महाविकास आघाडी स्थापन झाली. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचे मतदान केले म्हणणाऱ्या पवारांनी सत्ता स्थापन केली.

हाही घोडेबाजाराचाच प्रकार नव्हे का? पवारांच्या राजकीय प्रवासाचा ऊहापोह केल्यास खंजीर, विश्वासघात, घोडेबाजार, चमत्कार असे शब्द प्रकर्षाने लिहिले जातील. ते स्वतः यासही आपली भूषणावह कृती असे मानतात. त्यांचे खुशमस्करे-भाट त्यांच्या या गुणाची अभिमानाने साखरपेरणी करत असतात. आमचे पवारसाहेब आहेत, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. या म्हणण्यामागील त्यांची प्रेरणा ही, शरद पवारातील घोडेबाजाराच्या गुणामुळे. आज त्यांच्या याच गुणास प्रत्येकवेळी शह आणि मात मिळत आहे. त्यांच्यातील हा गुण, गुन्हा ठरत चालला आहे. त्याचमुळे त्यांचे खुश मुस्करे, अन्यांवर दोष मढत त्यांनी घोडेबाजार करत विजय संपादन केला अशी पळवाट शोधत असतात.

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “संजय राऊत यांची मतसंख्या ही भाजपच्या तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारापेक्षा कमी, अशी त्यांची स्थिती”, तर त्यांचेच छगन भुजबळ म्हणतात, “संजय राऊतच काठावर वाचले, नाहीतर आणखी उलटे झाले असते की, संजय पवार जिंकले व संजय राऊत मागे राहिले.” अशा वागण्याचा फटका आपणास लागलीच २० जूनला होणाऱ्या परिषदेच्या निवडणुकीतही बसणारच. आजच्या सोशल मीडियाच्या विश्वात प्रत्येक राजकारण्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ असे सर्व काही उपलब्ध आहे. त्यातून कोण किती विश्वासार्ह व अविश्वासार्ह याचा उलगडा होणे सहज सोपे झाले आहे. यात शरद पवारांचे स्थान कोठे हे वेगळे सांगणे नको. नियती कोणासही सोडत नाही. ती पाठ धरून त्यास गाठतेच. मग ते संजय राऊत असतील वा शरद पवार!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -