Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजगावामधले ‘घर कौलारू’

गावामधले ‘घर कौलारू’

सतीश पाटणकर

पूर्वीच्या काळी कोकणात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे पाहायला मिळत असत; परंतु आधुनिक युगात कौलांची जागा आता सिमेंटच्या व लोखंडाच्या पत्र्यांनी घेतली असून, खेड्यात या पत्र्यांना मोठी मागणी आहे. यामुळे खेड्यातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पावसाचे वेध लागले की, ग्रामस्थांचे छप्पर साकारणीकडे पाय वळतात. साधारण वैशाख महिना सुरू झाला की, ही कामे सुरू होतात. पाऊस सुरू झाला की, ग्रामीण भागात बरीचशी छप्परे गळायला लागतात. पावसाचे आगमन होण्याआधी खेडेगावात सर्वांना वेध लागायचे, ते आपल्या घरावर असलेले छप्पर अर्थात कौले व्यवस्थित करण्याचे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती घरावर असलेली कौले सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची; परंतु बदलत्या काळात कौलारू घरे दिसेनाशी झाली आहेत. प्रत्येकजण घर बांधताना कौले न वापरता सिमेंटच्या व लोखंडाच्या पत्र्यांचा उपयोग करीत आहेत. घराच्या आकारानुसार कौलांची संख्या ठरायची. मोठ्या घरासाठी भरपूर कौलं लागायची. यामुळे कौलं बसविण्यात वेळ जास्त जात होता; परंतु सिमेंटचे पत्रे बाजारात उपलब्ध झाल्याने त्यांना पसंती मिळत आहे.

पूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत होता; परंतु आता कोकणातही पावसाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. यामुळे पूर्वीची मातीची कौलं आता इतिहासजमा होऊ लागली असली, तरी काही ठिकाणी मात्र जुनी कौलं आणि कौलारू घरे अल्प प्रमाणात पाहावयास मिळतात. शहरासह आता खेडेही बदलत चालले आहेत. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. कौलारू घरात उन्हाळ्यात गरम होत नाही. यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची. मातीची कौलंही उन्हाची झळ स्वत: शोषून ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहोचवतात; परंतु याचे भान न ठेवता प्रत्येकजण सिमेंटच्या व लोखंडाच्या पत्र्यांना पसंती देत आहेत. शहरांशी तुलना करायची झाली, तर खेड्यामधल्या त्या कौलारू घरात काहीच खास नसते. शहरातील उंच इमारतींचा खूप डौल असतो. चकचकाट असतो, भरपूर उजेड असतो, योजना असतात, अस्वच्छता नसते. पण तरीही माणसाला ते गावाकडचे घर कौलारू का आठवते? स्मरण रंजनाचा भाग सोडला तरीही त्या कौलारू घरात असे काय असते, की प्रत्येकच सुज्ञ व्यक्तीच्या मनाच्या कोपऱ्यात ते घर ‘घर करून’ असते का?

खेड्यातल्या त्या घराला अंगण असते. अंगण म्हणजे  काय? असा प्रश्न मला एकदा बहिणीच्या नातीने विचारला होता. अंगण ते शेणाने सारवलेले असते. त्याला आजूबाजूने झाडी लावलेली असतात. मेंदीच्या झाडांचे कुंपण असते. मधे तुळशी वृंदावन असते. त्यात तुळशीचे रोप वाढलेले असते व मिणमिणता दिवा लावलेला असतो. आजी देवाची आरती म्हणते, आजोबा गोष्टी सांगतात. मुले सागरगोटे खेळतात, मुले विटीदांडू खेळतात. मधे गोपद्म व रांगोळी काढलेली असते. गायीच्या शेणीचा वास व त्या गोवऱ्या! त्या घरातील जमीन खेड्यातल्या घरात शेणाने सारवलेले असल्याने पावले दुखत नाहीत, देवघरात समई असते, अंघोळीला तांब्या-पितळ्याची चकचकीत भांडी व लिंबाची पाने टाकलेले ते तपेलीतील गरम पाणी मन शांत करते. अगदी स्पा किंवा हेल्थ सलूनचा फील नसला तरीही खेड्यातील वातावरण ताजेतवाने करणारे असते. चुलीच्या धुरामुळे वाळवी वाटेला फिरकत नाही. शहरातील गडबड गोंधळाचा कंटाळा आलेला असतो. मोकळी शुद्ध हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटते. कारण, काहीही असू दे, गावामधले घर कौलारू प्रत्येकच संवेदनक्षम माणसाला साद घालत राहते. सेकंड होम्स लोकप्रिय होण्याला तेच कारण असावे.

आज यांत्रिकीकरणाच्या कोलाहलात खेड्यांचं शहरीकरण होत आहे, अशी नेहमीच बोंब उठवली जाते. रस्त्यांची लालमाती जाऊन तिथे डांबरीकरण झाले आहे. विहिरीवर पंप बसून घरात पाणी आलं. आज कोकणातल्या घराघरात मोबाइलवर संभाषण होताना दिसते. हा झालेला भौतिक बदल म्हणजे वरपांगी असावा. शहरीकरणाच्या कोलाहलातदेखील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ती म्हणजे कोकणातली घरे. कोकणात मुख्यतः सिंधुदुर्गात जून-जुलै महिन्यात ढोल-ताशांच्या गजरात पाऊस पडतो. असाच काहीसा पाऊस कोकणात पडतो म्हणूनच बहुतेक कोकणातली घरं ही उतरत्या छपराची असतात आणि उतरत्या छपराची म्हणजे कौलारूच होय. कित्येक आधीची वर्षे कोकणातली घरं मातीच्या भिंतीची आणि नळ्यांच्या छपरांची होती. पण गेल्या कित्येक वर्षांपासून तळकोकणातली बहुतेक घरं ही जांभ्या दगडाच्या भिंतीची आणि कौलारू छपराची दिसू लागलीत. कौलांची जागा आता सिमेंटच्या व लोखंडाच्या पत्र्यांनी घेतली आहे. आज खेड्यापाड्यातही सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहिली आहेत.

घर म्हणजे गावातल्या लोकांना मुक्त वावर. घरात एखादा माणूस तरी नेहमी असल्याने घराला कधी कुलूप लागले असेल, तर शप्पथ! घराचा मुख्य भाग म्हणजे लोटा म्हणतात. लोट्यावर विशेष म्हणजे एखाद्या भिंतीवर पूर्वजांचे फोटो, त्याच्या खालच्या बाजूला भिंतीत खुटे ठोकले असून त्यांचा मुख्य उपयोग अंगातले कपडे काढले की, त्याला लटकवून ठेवायचे. एखाद्या खुटीला कोयता किंवा तत्सम वस्तू ठेवण्याची आकडी ठेवलेली असायची. एखाद्या खुटाला अशी आकडी टांगलेली असली की, समजायचे या घरातली शेती अजून जिवंत आहे. उजव्या बाजूला बसायला मोठा लाकडी बाक ठेवलेला असायचा. कुठल्या तरी खुटीला आलेली पत्रं, इलेक्ट्रिकची बिलं लावलेली असायची. या लोट्यावरून घरासमोरचा रस्ता थेट दिसायचा. लोट्याच्या आजूबाजूला दोन-तीन खोल्या, अशी ही पुढच्या बाजूची रचना. लोकांचा तसा घरात राबता कमीच. लोट्यापेक्षा खळ्यात वावर जास्त. तरीदेखील लोट्याचं महत्त्व आबाधीतच‌! जुन्या घराला लोटा असा लांब असायचा. कविता ऐकू यायची. लोट्याच्या आत आल्यावर वळई लागायची, वळईत कोणीतरी पेज पीत बसलेलं असायचं किंवा न्याहारी खात बसलेलं असायचं. दुपारच्या आणि रात्री पाच-पंचवीस लोकांची पंगत उठू शकेल, एवढी मोठी वळई, तिचा थोडा भाग आता टीव्हीने व्यापला आहे. वळईत पहाटे किंवा दुपारी घरातील बायका माणसे दळण दळत बसलेली असायची. त्या दळणाचा वास नाकात भरून राहायचा.

सकाळी जाग यायची तीच कोंबड्यांच्या कलकलण्याने. पडवीतून बाहेर पडलं की, मागील दार. मागील दाराला पाटल्यादार म्हणतात. पाटल्यादारी उभं राहिलं की, सुकवण्याचं खळं दृष्टीला पडायचे, त्या खळ्यात कोकम, खारावलेले आंबे, फणसाची साटं असं काहीतरी सुकत घातलेलं असायचं. खळ्याच्या बाजूला गुरांसाठी गवताचा गोठा असायचा. पडवीत लाकडी झोपाळा, जागोजागी भिंतीत कोनाडे, भिंतीतील कपाटे, भिंतीत बसवलेल्या लाकडी खुंट्या, देवघरात वरती टांगलेली माटवी, माडीवर जाणारा चिंचोळा जिना, लाकडी फळ्या वापरून केलेली माडी अशा मोजक्याच गोष्टी. घर सजवण्यासाठी दरवाजात रांगोळी, भाताच्या लोम्ब्यांचे दरवाजाला तोरण, नक्षीकाम केलेले दरवाजे, कधी खिडकीत किंवा झरोक्यात रंगीत काचा बसवलेल्या असायच्या. निसर्ग, भक्ती, प्रीती याचा संगम कोकणातल्या कौलारू घरातून दिसायचा. आज ग्लोबलाझेशनमुळे कोकण बदलू लागले असले तरी कोकणात पर्यटनामुळे मूळ कोकण संस्कृतीची हॉटेल्स आणि मोटेल्स उभी राहत आहेत, ही सुखावणारी बाब आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -