Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखGaneshotsav : चैन पडेना आम्हाला...

Ganeshotsav : चैन पडेना आम्हाला…

महाराष्ट्रातील महाउत्सवाची शुक्रवारी सकाळी शांततेत सांगता झाली. राज्यभरातील गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. गेल्या काही दिवसांमध्ये सर्वत्र बाप्पामय वातावरण दिसत होते. या दिवसांत यथासांग पाहुणचार घेतल्यावर पुढच्या वर्षी लवकर येण्याचा शब्द देत गणपती बाप्पांनी भक्तांचा निरोप घेतला आहे. मुंबईतील महत्त्वाच्या मोठ्या गणेश मंडळांना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून भक्तगणांची रिघ लागली होती. शहरांत अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक ठिकाणी सकाळपासूनच गणेश विसर्जनाची लगबग सुरू झाली होती. ढोल – ताशे पथकांबरोबरच अनेक ठिकाणी डीजेंचा घणघणाट सुरू होता. मात्र काही ठिकाणी पारंपरिक ढोल आणि ताशाचे वादन सुरू होते. या पथकामध्ये तरुणांसोबत तरुणींचा मोठा सहभाग दिसला.

विशेष म्हणजे लालबागचा राजा, गणेश गल्लीतील मुंबईचा राजा, चिंचपोकळीतील चिंतामणी, गिरणगावचा राजा, रंगारी बदक चाळ परिसरातील बाप्पा, गिरगावचा राजा, खेतवाडीचा राजा, फोर्टचा राजा अशा सर्व राजा गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील अनेक भागांतून आणि शेजारी राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. या सर्व भाविकांची वाढती संख्या ध्यानी घेऊन व त्या सर्वांना दर्शन भेऊन माघारी परतणे शक्य व्हावे यासाठी रेल्वे आणि ‘बेस्ट’तर्फे रात्रकालीन विशेष लोकल ट्रेन व बसेसची सोय करण्यात आली होती. तसेच या तुफान गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार, अथवा दुर्घटना घडू नये यासाठी सगळीकडेच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याबरोबरच पालिकेचे अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा आणि अन्य यंत्रणा गेले अनेक दिवस राबत होत्या. त्यासाठी त्या सर्व यंत्रणांवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. अशा मोठ्या उत्सव काळात त्यांना भरपूर तयारी करावी, सुसज्जता, सतर्कता ठेवावी लागते. हे करताना सर्वांचीच कसोटी लागलेली असते. गणेशभक्तांचा सर्वोच्च जल्लोष लालबागच्या राजाच्या राजेशाही मिरवणुकीत पाहायला मिळाला. गेल्या दहा दिवसांत लालबागच्या राजाचे दोन कोटींहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सकाळी १० वाजता आरती केल्यानंतर सुरू करण्यात आली. त्यानंतर राजाची ही राजेशाही मिरवणूक लालबाग मार्केटमधून निघून लालबाग गिरणगावच्या परिसरातून वाजत-गाजत फिरत तब्बल २४ तासांहून अधिक काळ फिरून शुक्रवारी सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचली. राजाचे प्रस्थान झाल्यावर खोल अरबी समुद्रात कोळी बांधवांनी नेत्रदीपक असे राजेशाही विसर्जनही केले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. राजधानी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावात निरोप दिला गेला. अभिनेते आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बाप्पाची आरती करत निरोप दिला.

बाप्पांना असा जल्लोषात निरोप दिला जात असताना काही अघटित अशा घटनाही घडल्याने चांगल्या वातावरणाला विनाकारण गालबोट लागते. गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त वाहून गेल्याची घटना रायगडमध्ये घडली आहे. कर्जत तालुक्यातील उल्हास नदीत पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे चौघे वाहून गेले. यातला एक जण सुखरूप बचावला, तर एकाचा मृतदेह सापडला व अन्य दोघे अद्याप बेपत्ता आहेत. तर रत्नागिरीत ब्रेक फेल झाल्याने एक टेम्पो विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने १५ पेक्षा जास्त भाविक जखमी झाले.

पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडलं. गणपती बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यांनी गणेश भक्तांनी निरोप दिला. असं असताना पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे गणपती विसर्जन सुरू असताना चार वर्षीय चिमुकल्याचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. मोशीतील मंत्रा सोसायटीमधील गणपती विसर्जन टाकीच्या शेजारी उभा राहून तो सर्व काही बघत होता. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असताना अचानक अर्णव हा टाकीत पडला हे कोणाच्याच लक्षात आले नाही, हे दुर्दैव आहे. अशा अनेक घटना थोडी काळजी व जबाबदारी बाळगली तर टाळणे सहज शक्य आहे, तर हिंजवडीत एका तरुणाचा मिरवणुकीत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.राज्यात जल्लोषात गणेशोत्सव पार पडला. मात्र शेवटच्या दिवशी काही अप्रिय घटनांमुळे कर्णकर्कश्य आवाजांमुळे, अति उत्साही कार्यकर्त्यांमुळे गालबोट लागले असे म्हणावे लागेल. सध्या अनेक मंडळांमध्ये आवाजात आणि डॉल्बी सिस्टिमवरून स्पर्धा दिसून येते. कोणाचा आवाज मोठा यावरून अनेकदा वाद बघायला मिळतो. मात्र हाच आवाज अनेकांचा जीव घेत असल्याचे गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांमधून समोर आले आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी कटाक्षाने टाळून सर्वच उत्सव सुखनैव पार पडावेत व तशी बुद्धी आम्हा सर्व भक्तांना गणरायाने द्यावी हीच त्याच्या चरणी प्रार्थना. बाप्पा आपल्या गावाला गेले असले तरी अनेक संकटे आ वासून समोर उभी आहेत. त्यांना तोंड देण्याची शक्ती तो देईलच आणि म्हणूनच तो पुढील वर्षी येईपर्यंत भक्तगणांना चैन पडणार नाही हे मात्र निश्चित.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -