Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGajanan Maharaj : दु:ख न करावे यत्किंचित l आम्ही आहो येथे स्थित...

Gajanan Maharaj : दु:ख न करावे यत्किंचित l आम्ही आहो येथे स्थित ll

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

महाराजांनी भक्तांना गणेश चतुर्थीच्या दिवशी बोलावून गणेश पुराणाचा दाखला देऊन सांगितले की, या पार्थिव देहाला तुम्ही आनंदाने बोळवा. तुम्ही दुःख करू नका. आम्ही तुमचा सांभाळ करण्याकरिता येथेच स्थित आहोत, असे बोलून महाराजांनी तो दिवस भक्तमंडळींसोबत आनंदात व्यतीत केला. बाळाभाऊंचा हात हातात घेऊन त्यांना आपल्यासमवेत गादीवर आपल्या बाजूला बसविले. शेवटी महाराज पुनश्च एकवार भक्तांना म्हणाले :
मी गेलो ऐसे मानू नका l
भक्तीत अंतर करू नका l
कदा मजलागी विसरू नका l
मी आहे येथेच ll

एवढे बोलून श्री गजानन महाराजांनी योगशक्तीच्या माध्यमाद्वारे प्राण रोखला आणि मस्तकी धारण (स्थापित) केला. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार शके अठराशे बत्तीस, साधारण नाम संवत्सर.

महाराजांनी प्राण रोखताना ‘जय गजानन’ असा शब्दोच्चार केला आणि महाराज सच्चीदानंदी लीन झाले. प्राण मस्तकी धारण केल्यावर देहाचे चलन वलन पार मावळून गेले. स्वामी समाधीस्थ झाले असे पाहून सर्व भक्तमंडळी हळहळ व्यक्त करू लागली. ही वार्ता सर्व गावात श्रुत झाली. लोक दुखा:तिरेकाने छाती बडवून, धाय मोकलून रडू लागले व म्हणू लागले :
गेला गेला साक्षात्कारीl
चालता बोलता श्रीहरी l
गेला गेला कैवारी l
आज दिन जनांचा ll१७ll
गेला आमुचा विसावा l
गेला अमुचा सौख्यठेवा l
विझला हा ज्ञान दिवा l
काल रूपी वाऱ्याने ll१८ll
अहो गजानन स्वामी समर्था l
आता आम्हास कोण त्राता? l
का रे इतक्यात पुण्यवंता l
गेलास आम्हा सोडून? l

महाराजांचे निस्सीम भक्त जसे की मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूसा, बंकटलाल, महाराजांचा अतिशय प्रेमळ भक्त ताराचंद, श्रीपतराव कुलकर्णी आणि इतरही काही भक्त मठात जमले. त्यांनी विचार केला की, आजची पंचमी आहे. आज स्वामींना समाधी देऊ नये, आसपासच्या भक्त मंडळींना महाराजांचे दर्शन मिळावे. आता ही मूर्ती लोप पावणार आहे, त्यामुळे आज अस्तमानापर्यंत लोकांना दर्शन मिळावे याकरिता वाट पाहावी. ज्यांच्या नशिबात असेल त्यांना दर्शन घडेल. मात्र आता वेळ करू नका. महाराजांच्या समाधीची वार्ता ठिकठिकाणी कळवा. त्यावेळी तिथे डोणगाव येथील गोविंद शास्त्री हे विद्वान ब्राह्मण उपस्थित होते. ते म्हणाले की, महाराज आवडत्या भक्तांना निश्चित दर्शन देतील. तोपर्यंत ते आपले प्राण मस्तकी धारण करतील. या गोष्टीची प्रचिती पाहावयास कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. स्वामींच्या शिरावर लोणी ठेवून पाहा आणि काय चमत्कार, श्री महाराजांच्या शिरोभागी लोणी ठेवताच ते पिघळू लागले. महाराजांच्या योगशास्त्राच्या बळानेच हे घडून आले. गोविंद शास्त्री पुढे असे देखील म्हणाले की, एका दिवसाची काय कथा, हे अशा स्थितीत वर्षभर सुद्धा राहतील, पण असे करणे उचित नाही. स्वामींचे आवडते भक्त आले म्हणजे स्वामींना समाधी देण्यास हरकत नाही.

हे गोविंद शास्त्रींचे बोलणे सर्वांना मान्य झाले. त्या सर्वांनी महाराजांच्या समोर आदरयुक्त अंतःकरणाने भजन सूर केले. या ठिकाणी भजनात किमान हजार तरी टाळकरी भाविक जमले होते. मधल्या वेळात दूरदूरच्या अनेक भक्तांना महाराजांनी स्वतः जाऊन दृष्टांत देऊन आपल्या समाधीची वार्ता कळविली. त्या ऋषीपंचमीच्या दिवशी शेगावात महाराजांच्या दर्शनाकरिता भक्त मंडळींचा अपार मेळावा जमला होता. महाराजांची समाधीपूर्व मिरवणूक काढण्याकरिता भक्त मंडळींनी रथ सजवून तयार केला.

अनेक भजनी दिंड्या शेगावात दाखल झाल्या. नाना प्रकारची वाद्ये ज्यामध्ये सनया, संवादिनी, चौघडे, ढोल, टाळ, चिपळ्या, एकतारी, तंबोरे, झांजा, तुतर्या, शिंग, भेरी अशी अनेक वाद्ये होती. जागोजागी स्त्रियांनी गोमयाचे सडे टाकून सुंदर रांगोळ्या काढून दिव्यांची आरास करून मार्ग सुशोभित केले होते. शेगावात जणूकाही दीपोत्सवच साजरा होत होता. महाराजांची मूर्ती (शरीर) रथामध्ये ठेवण्यात आली.

महाराजांवर भक्तांनी अबिर, गुलाल, तुळस, फुले, हार यांची इतक्या मोठ्या प्रमाणात उधळण केली की, महाराजांचे संपूर्ण शरीर या पुष्पभाराने झाकून गेले होते. भजनी दिंड्यांनी पहाडी खड्या आवाजात भजने म्हणण्यास सुरुवात केली. नानाविध वाद्ये वाजू लागली. वाद्यांच्या आणि भजनांच्या, विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला.

सुवासिनी ठिकठिकाणी महाराजांना औक्षण करून दर्शन घेत होत्या. प्रत्येक ठिकाणी पेढे, खडीसाखर, गूळ, मिठाई अशा अनेक प्रकारच्या खिरापती वाटण्यात येत होत्या. काही लोकांनी मिरवणुकीवर रुपये, पैसे उधळले. मिरवणुकीत असा सर्व आनंदीआनंद संपूर्ण रात्रभर सुरू होता. सूर्योदयसमयी मिरवणूक फिरून मठात आली. महाराजांची मूर्ती (देह) समाधीस्थळी नेऊन ठेवण्यात आला. महाराजांना रुद्रपाठाने अभिषेक करण्यात आला. महाराजांची पंचोपचार पूजा करण्यात आली. आरती झाली. भक्तांनी श्री महाराजांच्या नावाचा मोठ्याने जयजयकार केला.

जय जय अवलिया गजानना l
हे नर देह धारी नारायणा l
अविनाश रूपा आनंदघना l
परत्परा जगतपते ll

असा जयजयकार केल्यावर महाराजांची मूर्ती शास्त्रमार्गाप्रमाणे उत्तराभिमुख आसनावर ठेवण्यात आली. सर्व उपस्थित भक्तांनी श्री महाराजांचे अखेरचे दर्शन घेतले. मीठ, अर्गजा, अबिर यांनी गार भरण्यात आली. वर शिळा ठेवून द्वार बंद करण्यात आले.

समाधी दिवसापासून पुढे दहा दिवसांपर्यंत तिथे समराधना चालली होती. या काळात अनेक भक्तांना महाराजांच्या प्रसादाचा लाभ मिळाला. असा हा भाव विभोर करणारा समाधी सोहळा पाहण्याचे आणि अनुभवण्याचे सद्भाग्य ज्यांना प्राप्त झाले ते सर्व थोर महात्मे होत.

खरोखरीच संतांचा l
अधिकार तो थोर साचा l
सार्वभौम राजाचा l
पाड नाही
त्यांच्या पुढे ll

(क्रमशः)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -