Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सOnline Fraud : वृद्ध जोडप्याच्या पीएफच्या ४ कोटी रुपयांवर डल्ला

Online Fraud : वृद्ध जोडप्याच्या पीएफच्या ४ कोटी रुपयांवर डल्ला

  • गोलमाल : महेश पांचाळ

जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगाराचा काही भाग तुमच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यात जमा होत असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सायबर चोरांनी विविध मार्गांनी लोकांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. आता अशा पीएफ खात्यावरही सायबर ठगांची नजर असण्याची शक्यता आहे. नुकतेच सायबर ठगांनी एका ज्येष्ठ जोडप्याची सुमारे ४ कोटी ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुंबईत घडली आहे.

दक्षिण मुंबईतील सत्तर वर्षीय हे वृद्ध जोडपे मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करून निवृत्त झाले होते. एके दिवशी एका अनोळखी महिलेने वृद्ध महिलेला फोन केला आणि सांगितले की, ती कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची कर्मचारी आहे. कंपनीने २० वर्षांपूर्वी तिच्या पतीच्या पीएफ खात्यात ४ लाख रुपये ठेवले होते, जे आता सुमारे ११ कोटी रुपये झाले आहेत, असे त्या महिलेकडून सांगण्यात आले होते. वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी फोन करणाऱ्या महिलेने पतीचे नाव, जन्मतारीख, निवृत्तीची तारीख आणि पॅन क्रमांक देखील सांगितला होता. त्यामुळे आपल्या पतीची ही सर्व माहिती ऐकून वृद्ध महिलेचा फोन करणाऱ्या महिलेवर विश्वास बसला होता. त्यानंतर संबंधित कॉल करणाऱ्या महिलेने टीडीएस, जीएसटी आणि आयकर भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या महिलेने या वृद्ध जोडप्याकडून सुमारे ४ महिन्यांत सुमारे ४ कोटी ३५ लाख रुपये उकळले होते.

यानंतरही फसवणूक करणाऱ्यांनी आणखी पैसे न दिल्यास त्यांची सर्व बँक खाती गोठवली जातील आणि आयकर विभागकडून कारवाई केली जाईल, अशी धमकीही दिली. मात्र तोपर्यंत या जोडप्याने आतापर्यंत कमावलेली सर्व कमाई संपल्याने व त्यांची खासगी बँकेतील खाती रिकामी असल्याचे आढळून आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या पत्नीने कफ परेड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार पाहून पोलीसही अवाक झाले. पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण सायबर विभागाकडे वर्ग करण्यात आले असून कसून तपास सुरू आहे.

पोलिसात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, तक्रारदार महिलेचा पती या आधी एका प्रख्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा आणि सल्लागार कंपनीत काम करत होता. त्याच्या निवृत्तीनंतर, या जोडप्याने मुदतपूर्तीनंतर गुंतवणूक केलेला निधी काढून घेतला होता. या वर्षी मे महिन्यात एका अनोळखी महिलेचा कॉल आला होता. त्यानंतर कॉलर महिलेने वृद्ध महिलेला टीडीएस, जीएसटी आणि आयकर भरण्यासाठी आवश्यक पैसे जमा करण्यास सांगितले. मे ते सप्टेंबर दरम्यान अनेक वेळा वेगवेगळ्या बहाण्याने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले गेले. तिच्यावर विश्वास ठेवून महिलेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले. चार महिन्यांत या जोडप्याची बँक खाती रिकामी करण्यात आली. यानंतर तक्रारदाराने फोन करणाऱ्याला आपल्याकडे पैसे शिल्लक नसल्याचे सांगितल्यावर त्याने धमकावणे सुरू केले. मुंबईत आणि पुण्यात सायबर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. वैयक्तिक पातळीवर एवढी मोठी सायबर फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. फसवणूक करणाऱ्यांना पैसे देऊ नका आणि संशय आल्यास ताबडतोब पोलिसांत तक्रार करा आणि बदनामी किंवा इतर कोणत्याही कारणाने फसवणूक करणाऱ्यांना बळी पडू नका, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

maheshom108@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -